
सोमवार दि.१६ नोव्हेंबर २०२६


जागेच्या वादातून विहिरीत पोहताना दगडफेक, एकावर गुन्हा.
उत्तूर : प्रतिनिधी
जागेच्या वादातून विहिरीत पोहत असलेल्या हेमंत गंगापूरे यांच्या डोक्यात दगड फेकून मारल्याची घटना उत्तूर येथे रविवारी घडली. याप्रकरणी मारुती दत्तू वैभरी याच्याविरोधात उत्तूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी सकाळी आठच्या सुमारास गंगापूरे हे विहिरीत पोहत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. पाण्यातून बाहेर आल्यानंतरही मारुतीने शिवीगाळ करत त्यांच्या खांद्यावर दगड फेकून मारला. जागेच्या वादातून गेल्या चार महिन्यांपासून गंगापूरे व त्यांच्या कुटुंबीयांना धमकी आणि शिवीगाळ केली जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी हेमंत गंगापूरे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हजारे करीत आहेत.


आजरा तालुक्यात यश उमेद अभियानांतर्गत दोन नूतन महिला प्रभाग संघांचे उद्घाटन

आजरा : प्रतिनिधी
उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत रणरागिणी महिला प्रभाग संघ, आजरा आणि सह्याद्री महिला प्रभाग संघ, कोळींद्रे या दोन नूतन प्रभाग संघांच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि वास्तू प्रवेश सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या पंचायत समिती सभापती यशोदा पोवार होत्या. त्यांच्या हस्ते नूतन वास्तूचे उद्घाटन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना यशोदा पोवार यांनी आजची ग्रामीण महिला केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती कुटुंबाचा आणि समाजाचा आर्थिक कणा बनत असल्याचे सांगितले. उमेद अभियानाने महिलांना एकत्र येण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुवर्णसंधी दिली आहे, असे त्यांनी नमूद केले.
महिलांनी पारंपरिक शेतीपूरक व्यवसायांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया उद्योग, हस्तकला, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यांसारखे लघुउद्योग सुरू करावेत आणि आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रभाग संघांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या नवीन कार्यालयांमुळे महिलांच्या बैठका, प्रशिक्षण शिबिरे, आर्थिक व्यवहारांचे नियोजन आणि शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यालय मिळणेकामी गटविकास अधिकारी सुभाष सावंत, जि. प. सदस्य.शिरीष देसाई, सुधीर देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारधे, विकास चोथे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक प्रवीण बोकडे यांनी प्रस्तावना केली, तर आभार प्रदर्शन प्रभाग समन्वयक उषा पाटील यांनी केले. यावेळी प्रभाग संघ पदाधिकारी, केडर, बचत गटातील महिला, तालुका स्टाफ शांताराम आणि मिलिंद यांच्यासह ग्रामसंघांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दुचाकीवर फिरता छोटा बाजार, सतरा वर्षांपासून दारोदारी जाऊन उदरनिर्वाह

आजरा: प्रतिनिधी
गावोगावी फिरून दैनंदिन वापराच्या वस्तू विकून उदरनिर्वाह करणारे विक्रम बंडू मंगल, रा. बेलेवाडी हुll, ता. आजरा हे नाव आजरा तालुक्यात अनेकांना परिचित आहे. गेल्या सतरा वर्षांपासून ते हाच व्यवसाय करत आहेत.
विक्रम मंगल यांची दुचाकी म्हणजे एक प्रकारचा छोटा फिरता बाजारच आहे. त्यांच्या दुचाकीवर प्लास्टिकच्या बादल्या, टब, खुर्च्या, झाडू, फडके, पाईप, तसेच घरात दररोज लागणाऱ्या इतर अनेक वस्तू बांधलेल्या असतात. गावात आल्यानंतर ते गल्लीगल्लीत फिरून आवाज देतात आणि महिला, गृहिणी त्यांच्याकडून गरजेच्या वस्तू खरेदी करतात.
मोठ्या बाजारात जाण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे गावातच घरपोच वस्तू मिळाल्याने ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना, याचा मोठा फायदा होतो. अलीकडे मोठमोठ्या बाजारांच्या काळातही असे छोटे विक्रेते गावोगावी फिरून आपला व्यवसाय सुरू ठेवतात.
सकाळी घरातून निघाल्यापासून ते दिवसभर एका गावातून दुसऱ्या गावात फिरतात. उन्हा-पावसाची पर्वा न करता प्रामाणिकपणे केलेल्या या कष्टातूनच त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे. सातत्य, प्रामाणिकपणा आणि माफक दर यामुळे गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला आहे.
आजच्या काळात मोठ्या मॉल आणि ऑनलाईन खरेदीचे आकर्षण असले तरी दारोदारी जाऊन वस्तू पोहोचवणाऱ्या विक्रम मंगल यांच्यासारख्या छोट्या विक्रेत्यांमुळे ग्रामीण भागातील बाजारपेठ अजूनही जिवंत आहे.

निधन वार्ता
सुखदेव कांबळे

मडिलगे ता. आजरा येथील सुखदेव सखाराम कांबळे ( वय ५२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे.


आजचे पंचांग
दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (१७ नोव्हेंबर पहाटे ४.१९ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (१७ नोव्हेंबर पहाटे २.१६ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : गण्ड योग (सकाळी ७.१५ पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : गराजा करण (दुपारी ३.१३ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : तूळ राशी (रात्री ७.४३ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ८.११ ते सकाळी ९.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४७
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


वाटंगी स्पोर्ट्सने पटकावले कानोली क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

आजरा : प्रतिनिधी
कानोली क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत वाटंगी स्पोर्ट्स, वाटंगी संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचा अंतिम सामना भैरीदेव स्पोर्ट्स, आर्दाळ आणि वाटंगी स्पोर्ट्स, वाटंगी या दोन संघांत झाला. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भैरीदेव स्पोर्ट्स आर्दाळ संघावर मात करत वाटंगी स्पोर्ट्सने विजेतेपदावर नाव कोरले.
श्री.भैरीदेव स्पोर्ट्स आर्दाळ संघाने द्वितीय, आजरा स्पोर्ट्स आजरा संघाने तृतीय, तर यजमान कानोली क्रिकेट क्लबने चतुर्थ क्रमांक पटकावला. स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीसाठी युवराज पवार याची उत्कृष्ट फलंदाज, तर वाटंगीच्या प्रथमेश नरापगोळ याची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुदास पाटील, विनायक सावरतकर, दिग्विजय भोसले, किरण देसाई यांच्यासह सर्व क्रिकेट संघांचे सदस्य, पुणे-मुंबईस्थित मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. 
