mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

मंगळवार दि.१७ नोव्हेंबर २०२६ 

ट्रकची कारला समोरासमोर धडक, चालक जखमी

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील गावसे गावाजवळ दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ट्रकने कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने कार चालक जखमी झाला.

फिर्यादी दीपक कांकरेकर हे आंबोली – आजरा मार्गे पुण्याकडे जात असताना गावसेजवळ समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून त्यांच्या आय २० कारला समोरून धडक दिली.

या अपघातात कार चालक वहाब सय्यद जखमी झाला. त्याच्यावर गडहिंग्लज येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी ट्रक चालक चिदानंद मन्यागोळ, रा. कोणेकेरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव याच्याविरोधात आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

चतुरंग २०२६’ बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

उत्तूर : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित ‘चतुरंग २०२६’ आंतरशालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. १४ व १७ वर्षांखालील दोन वयोगटांत झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बुद्धिबळाच्या डावपेचांतून विद्यार्थ्यांनी एकाग्रता, नियोजन आणि निर्णयक्षमता यांचे दर्शन घडविले.वर्षा होनकट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी होते. बुद्धिबळ हा केवळ राजा आणि राणीचा खेळ नसून विचारशक्ती, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची कला शिकविणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रासोबत शैक्षणिक प्रगतीलाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन वर्षा होनकट्टी यांनी केले. प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमुळे आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळत असल्याचे नमूद केले.

स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात न्यू हायस्कूल, कोल्हापूरच्या अर्णव पोर्लेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. सर्वोदय पब्लिक स्कूल, गडहिंग्लजच्या श्रीयांश हराडे याने द्वितीय, तर रोझरी हायस्कूल, आजराच्या रायन कुतिनो याने तृतीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील गटात वि. दि. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लजच्या स्वरूप साळवी याने प्रथम क्रमांक पटकावला. सरस्वती हायस्कूल, इचलकरंजीच्या आर्यन पोळ याने द्वितीय, तर सर्वोदय पब्लिक स्कूल, गडहिंग्लजच्या समर्थ कोरे याने तृतीय क्रमांक मिळविला.विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी वर्षा होनकट्टी, श्रुती देसाई, प्रियांका ठोमके आणि कपिल ठोमके यांनी पंच म्हणून काम पाहिले.

संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी सुरेश मुरगुडे आणि संचालक मंडळाच्या नियोजनातून स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. वैशाली पाटील आणि विजय नाईक यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक एम. यू. शिकलगार आणि बाळासो जाधव यांनी आभार मानले.

संभाजी पाटील ठाकरे गटाच्या सहसंपर्क प्रमुखपदी

आजरा : प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, कागल, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवड जाहीर करण्यात आल्या. यामध्ये चंदगड, कागल, राधानगरी विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी संभाजी पाटील यांची निवड झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने निवड करण्यात आली आहे.

पाटील यांनी यापूर्वी आजरा तालुका शिवसेना प्रमुख, उपजिल्हा प्रमुख या पदावर काम केले आहे. ते आजरा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत.

आजरा शहरातील  श्री मरगुबाई देवीची यात्रा सोमवारपासून

‘सलाम महाराष्ट्र’ कार्यक्रमाचेही आयोजन

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरातील मानाची श्री मरगुबाई देवीची यात्रा  सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर पासून आयोजित करण्यात आली आहे. श्री मरगुबाई देवालय उत्सव कमिटी, सुतार गल्ली, आजरा यांच्यातर्फे यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि.२३  नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता श्री जुगारी महादेव मंदिर येथे कार्तिक लावणेचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सायं. ६ वाजता श्री मरगुबाई देवीची महापूजा होणार आहे. सायं. ८ ते ९.३९ वा. सन्मित्र भजनी मंडळ, आजरा यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ९.३० वा. श्री रवळनाथ भजनी मंडळ, आजरा यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दु. १२ ते ४ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री ८ वाजता स्वर स्वामी प्रस्तुत ‘सलाम महाराष्ट्र – सुवर्ण संस्कृतीचा लोकोत्सव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

यात्रेनिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री मरगुबाई देवालय उत्सव कमिटी, सुतार गल्ली, आजरा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

पेठेवाडी व वेळवट्टी येथे बांधले ‘वनराई कच्चे बंधारे’

आजरा : प्रतिनिधी,

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज आणि परम पूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून, रामानंद संप्रदाय आजरा तालुका सेवा समितीच्या वतीने रविवारी (दि. १५) पेठेवाडी व वेळवट्टी या परिसरात सामाजिक उपक्रमाअंतर्गत चार वनराई कच्चे बंधारे बांधण्यात आले. दुष्काळजन्य परिस्थितीत राबवलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

रामानंद संप्रदाय आजरा तालुका सेवा समितीच्या वतीने अशा प्रकारे एकूण १५ वनराई बंधारे बांधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे, ज्याचे ग्रामस्थांमधून स्वागत होत आहे.

या उपक्रमात कोल्हापूर जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख श्री. महेश पाटील, आजरा तालुका अध्यक्ष श्री. आकाराम देसाई, आजरा तालुका सचिव श्री. शिवाजी सरंबळे, आजरा तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख श्री. महादेव कुंभार, आजरा तालुका महिला अध्यक्षा सौ. उज्वला कळेकर यांच्यासह आजरा तालुक्यातील विविध सेवाकेंद्रांमधील असंख्य भक्तगण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

होनेवाडी येथे रस्ता कामाचे उद्घाटन

आजरा : प्रतिनिधी

भाजपा नेते  जयवंत मसणू सुतार यांचे विशेष प्रयत्नातून होनेवाडी ता. आजरा येथे रु ३० लाख मंजूर असलेल्या रस्त्याचे उद्घाटन आज तालुक्याचे नेते अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते आणि जयवंतराव सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या कामाकरिता सह पालकमंत्री नाम.माधुरीताई मिसाळ तसेच चंदगड चे लोकप्रिय आमदार  शिवाजीराव पाटील  यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी समीर पारदे, प. स. सदस्य,संभाजीराव सरदेसाई, हर्षवर्धन महागावकर, सरपंच प्रियंका आजगेकर, उपसरपंच रेश्मा पाटील, नामदेव पाटील, सदस्य गंगाधर बटकडली, तानाजी पाटील,ग्रामसेवक अजितराव देसाई ,विश्वास सुतार,सुनील पाटील, दिनकर कातकर,कृष्णा सुतार,मारुती पाटील,अरुण पाटील,तानाजी शंकर पाटील, बळवंत सुतार,सुनील पाटील, स्वप्नील शेंडे, तानाजी यशवंत पाटील,इंजि.ज्ञानेश्वर पाटील,सुरेश पाटील, विलास कातकर, प्रवीण कातकर, प्रमोद पाटील आदी प्रमुख उपस्थित..

आजचे पंचांग

दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (१८ नोव्हेंबर सकाळी ०६.०४ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (१८ नोव्हेंबर पहाटे ०४.३४ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : वृद्धि योग (सकाळी ०७.५३ पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : विस्ती भद्रा करण (सायंकाळी ०५.१७ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मकर राशी (दुपारी ०३.२९ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : वृश्चिक राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०३.११ ते सायंकाळी ०४.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४६
सूर्योदय : सकाळी ०६.४८
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता

रुक्मिणी  औंधकर 


उत्तूर : प्रतिनिधी 

रुक्मिणी पांडुरंग औंधकर (वय ८२) यांचे आज सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सोमवार-सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखाना बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण अटकेत… धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’.कार्यकारी संचालकासह पाचजण गजाआड

mrityunjay mahanews

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!