mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार  दि.२१ नोव्हेंबर २०२६ 

धामणेजवळ ट्रॉलीचा हुक तुटून दुचाकीला भीषण धडक…

दोघांचा मृत्यू…

चालक पसार.

उत्तूर : प्रतिनिधी 

धामणे (ता. आजरा) येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास धामणे गावाजवळील बेलेवाडी रस्त्यावरील डीपीसमोर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला.

महादेव दिनकर करवळ (वय ४९, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड) आणि बचाराम शिवाजी सुतार (वय ६५, रा. मिठाचे खुर्द, ता. भुदरगड) हे दोघे एचएफ डिलक्स दुचाकीवरून प्रवास करीत होते. यावेळी अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. KA-23-TC-7048) ट्रॉलीसह धामणेच्या दिशेने जात होता.दरम्यान, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक अचानक तुटल्याने ट्रॉली वेगाने मागे आली आणि दुचाकीला जोरदार धडकली. या धडकेत दोघेही ट्रॉलीखाली सापडल्याने गंभीर जखमी झाले. मात्र, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर चालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी संदीप नारायण पोवार (वय ३८, रा. धामणे) यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली असून, अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे तपास करीत आहेत.

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू… दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : प्रतिनिधी

खानापूर ता. आजरा येथे शेताभोवती लावलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा प्रवाह दिल्याने त्याचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आजरा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भागोजी सदू जाधव ( वय ६४ रा. खानापूर ता. आजरा ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा दिगंबर भागोजी जाधव रा. खानापूर यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजता आंबेशेत नावाच्या शेतात ही घटना घडली. फिर्यादी व त्यांचे वडील तसेच इतर लोक असे पळून गेलेल्या बैलाचा शोध घेत असताना ही घटना घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या शेताभोवती तारेचे कुंपण करून त्याला आपल्या शेताच्या घरातील विजेचा पुरवठा दिला होता. त्या कुंपणाला स्पर्श झाल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही बेजबाबदारपणे विजेचा पुरवठा दिल्याने त्या तारेच्या कुंपणास फिर्यादी यांच्या वडिलांचा स्पर्श होऊन त्यांना विजेचा धक्का बसून ते मयत झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी सुषमा सुभाष राणे आणि जितेंद्र सुभाष राणे दोघे रा. खानापूर ता. आजरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि सरवदे हे करीत आहेत.

पेरणोलीत मधमाश्यांच्या हल्यात शेतकरी जखमी

पेरणोली : प्रतिनिधी

पेरणोली (ता. आजरा) येथे मधमाश्यांच्या हल्यात नामदेव सिताराम कालेकर हे जखमी झाले. आज दुपारी हरपवडे येथील शेतात घटना घडली. श्री. कालेकर हे ऊसाला पाणी पाजवण्यासाठी शेतात गेले होते. वीज पंप सुरु करतांना अचनाक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामधे ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय आजरा येथे हलवण्यात आले आहे.

महावितरणच्या वीज बिल आकारणीबाबत उत्तूरमध्ये ग्राहकांचा आक्षेप :
पूर्ण महिन्याचे बिल देण्याची मागणी.

उत्तूर : प्रतिनिधी

महावितरणकडून ग्राहकांना महिन्याच्या पूर्ण ३० दिवसांच्या वीज वापराची आकारणी होत नसल्याचा मुद्दा उत्तूरमध्ये उपस्थित झाला आहे. प्रत्यक्षात ३० दिवसांचा महिना असताना मीटर रीडिंग केवळ २६ दिवसांनी घेतले जात असल्याने उर्वरित चार दिवसांच्या वीज वापराची आकारणी नियमित बिलात होत नसल्याचा ग्राहकांचा आक्षेप आहे.

या पद्धतीमुळे ग्राहकांना महिन्याच्या पूर्ण वीज वापराची आकारणी एकाच बिलात दिसत नाही. उर्वरित दिवसांचा वापर पुढील बिलात समाविष्ट होत असल्यास बिलिंगचा कालावधी बदलतो. मात्र तो समाविष्ट न झाल्यास ग्राहकांच्या वीज वापराच्या नोंदी आणि आकारणीमध्ये तफावत निर्माण होऊ शकते. तसेच बिलिंग कालावधी कमी झाल्याने स्थिर आकार, वीज वापराचे स्लॅब आणि इतर आकारांच्या गणनेवरही परिणाम होतो का, याबाबत महावितरणने स्पष्टता देणे आवश्यक आहे.

याबाबत संदेश रायकर, प्रदीप लोकरे आणि विश्वजीत घेवडे यांनी महावितरणच्या उत्तूर कार्यालयातील निशा मडावी यांच्याकडे लेखी निवेदन दिले. ग्राहकांची दिशाभूल न करता योग्य ती चौकशी करून कारवाई करावी आणि महिन्याच्या पूर्ण ३० दिवसांच्या वीज वापराची योग्य आकारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.ग्राहकांकडून पूर्ण वीज बिलाची वसुली अपेक्षित असताना प्रत्यक्ष वीज वापराच्या संपूर्ण कालावधीची पारदर्शक आकारणी होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे महावितरणने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार 

आजरा : प्रतिनिधी

शिवसेना उपनेते  संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्य संघटक नवेज मुल्ला व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण नूतन शिवसेना पदाधिकारी सत्कार  सोहळा पार पडला.

यावेळी नूतन सह संपर्कप्रमुख संभाजी पाटील, जिल्हा संघटक संभाजी भोकरे, चंदगड विधानसभा उपजिल्हाप्रमुख युवराज पोवार, कागल विधानसभा उपजिल्हाप्रमुख जयसिंग टिकले, राधानगरी विधानसभा उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, तसेच नूतन तालुकाप्रमुख कागल अजित मोडेकर , अशोक पाटील , राधानगरी तालुका प्रमुख उत्तम शेटके, विक्रम पाटील, गडहिंग्लज तालुकाप्रमुख भरत जाधव, भुदरगड तालुकाप्रमुख विक्रम आरडे, आजरा तालुका प्रमुख संजय येसादे, चंदगड तालुकाप्रमुख महेश पाटील, चंदगड उपजिल्हा संघटक डॉक्टर संजय पाटील, चंदगड तालुका संघटक महादेव गावडे ,भुदरगड तालुका समन्वयक सुरेश पाटील, कागल उपजिल्हा संघटक दिलीप पाटील, उप जिल्हा समन्वयक महाळूकरी कट्टी यांचा सत्कार करण्यात आला.

. यावेळी उपनेते संजय पवार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर निष्ठा ठेवून काम करावे पक्षात शिस्त असली पाहिजेत शिस्त हीच शिवसेनेची ओळख आहे असे मार्गदर्शन केले. राज्य संघटक नवेज मुला यांनी नूतन पदाधिकारी यांनी जोमाने काम करावे व शिवसेनेला गत वैभव प्राप्त करून द्यावे असे आवाहन केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी आपण जुन्या  पदाधिकाऱ्यांना बढती देऊन नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देऊन जुनी आणि नवे असा मेळ घालून ताकदीने काम करावे त्यामुळे शिवसेनेला नव संजीवनी मिळेल आणि उद्धव ठाकरे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवून गद्दारी करणारा शिंदे गट व भाजप यांना धडा शिकवूया असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवराज पोवार सूत्रसंचालन शहर प्रमुख समीर चांद तर आभार तालुका प्रमुख संजय येसादे यांनी मानले.  यावेळी आजरा पंचायत समिती सभापती यशोदा पोवार, सेना जिल्हा युवा अधिकारी अवधूत पाटील, आजरा तालुक्यातील दिनेश कांबळे, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव, शहर प्रमुख सागर नाईक, महादेव सुतार, महिला संघटिका मीना पुजारी, शितल कांबळे, राजश्री होण्याळकर यासह तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

आजरा तालुक्यात ६७३ निराधारांची पेन्शन मंजूर

आजरा:

आजरा तालुक्यातील ६७३ निराधारांची पेन्शन मंजूर केल्याची माहिती निराधार समितीचे अध्यक्ष सुनील दिवटे यांनी दिली. तालुक्यातून ७०२ अर्ज समितीकडे आले होते. पैकी २९ अर्ज अपूर्ण कागदपत्रे व इतर विविध कारणांनी फेरचौकशी साठी मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. मंजूर प्रकरणात २१५ संजय गांधीची,तर ४५८ श्रावण बाळची प्रकरणे आहेत.

बैठकीसाठी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते,सदस्य संतोष चौगले, किशोर जाधव,मनोहर राणे, सांगडे, बागवान उपस्थित होते. 

‘ बिरेश्वर ‘च्या आजरा शाखेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात 

आजरा : प्रतिनिधी

बिरेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित एकसंबाच्या आजरा शाखेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. 

 संस्थेकडे गेल्या तीन वर्षात २७ कोटी २१ लाखांच्या ठेवी जमा झाल्या असून सर्व प्रकारचे कर्ज वाटप केले जात असल्याची माहिती संस्थेचे शाखा अध्यक्ष श्री. ज्योतिप्रसाद सावंत यांनी दिली.

संस्थेचे संस्थापक माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, सहसंस्थापिका कर्नाटकच्या माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ. शशिकलाताई जोल्ले, अध्यक्ष आप्पासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या आजरा शाखेची वाटचाल अतिशय उत्तम पद्धतीने सुरू असून सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकाच्या बळावर चौथ्या वर्षात यशस्वी पदार्पण करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या एकूण २३६ शाखा असून ₹ ५८५० कोटींपेक्षा जास्त ठेवी असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक सुरेश मिटके, महेश कुरुणकर अनिकेत शिंत्रे, सुनील डोणकर, सुशांत निकम, नंदकुमार देसाई, मानसिंग देसाई, विलास पोवार यांच्यासह सभासद, ठेवीदार हितचिंतक व मान्यवर उपस्थित होते.

शाखा व्यवस्थापक दत्तात्रय सुतार यांनी आभार मानले .

कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास गनिमी काव्याने उत्तर देऊ :
शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा सरकारला इशारा…

आजरा : प्रतिनिधी

शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याची प्रक्रिया राबवणाऱ्या महसूल यंत्रणेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना कोणतीही कल्पना न देता आज अचानक मोजणी पथक इसापूर येथे आले होते. शेतकऱ्यांना बेसावध ठेऊन अशी मोजणी करण्याचा शासनाचा हा प्रयन्त शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आहे. आमचे महसूल विभागाला सांगणे आहे की त्यांनी सांगून मोजणीसाठी यावे आम्ही त्या पथकाला शेतकरी हिसका दाखवतील. पोलीस बळाचा वापर करून आजरा तालुक्यातही शक्तीपीठची मोजणी करण्याचे नियोजन सरकारी पातळीवर सुरू असल्याचे समजते. शेतकऱ्यांना बेसावध ठवून मोजणीचा प्रयत्न केल्यास आम्ही तो हाणून पाडू.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक मोर्चे आंदोलनातून आपला विरोध दाखवून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून पोलीस बळाचा वापर करायचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो संघटितपणे शांततामय मार्गाने हाणून पाडू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कॉ संपत देसाई, प्रा सुनील शिंत्रे, युवराज पोवार, तानाजी देसाई, प्रकाश मोरुस्कर यांनी पत्रकातून दिला आहे.

शेतकऱ्यांनी दबावाला बळी पडू नये…

आज शनिवारी ज्या ठिकाणी इसापूर येथे शेतकऱ्यांना बेसावध ठेऊन मोजणी करण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही कांही कार्यकर्ते भेट देणार आहोत. शेतकऱ्यांनी दबावाला अजिबात बळी पडू नये संघर्ष समिती आपल्यासोबत ठामपणे उभी राहील.

आजचे पंचांग

दिनांक : २१ नोव्हेंबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (२२ नोव्हेंबर सकाळी ०४.५६ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (२२ नोव्हेंबर सकाळी ०५.५४ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : सिद्धि योग (२२ नोव्हेंबर सकाळी ०२.२० पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : भाव करण (सायंकाळी ०५.४९ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मीन राशी ((२२ नोव्हेंबर सकाळी ०५.५४ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : वृश्चिक राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ०९.३७ ते सकाळी ११.०१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०२ ते दुपारी १२.४६
सूर्योदय : सकाळी ०६.५०
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

करवाढीविरोधात आजरेकर एकवटले

mrityunjay mahanews

Crime News

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

BIG BREAKING

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!