mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरूवार दि.१९ नोव्हेंबर २०२६ 

संयमी ‘ दादा ‘

स्व. बळीरामदादांचा राजकीय व सामाजिक वारसा, त्याला दिलेली सहकारातील अभ्यास व अनुभवाची जोड, संयमी वागणे याच्या जोरावर राजकारणात व समाजकारणात वेगळी ओळख निर्माण करत जनता बँकेसह आजरा साखर कारखान्याला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचे काम मुकुंददादा उर्फ उदयसिंह देसाई यांनी केले आहे. राजकारणात व समाजकारणात वावरताना कोणत्याही आरोप- प्रत्यारोपात न अडकता दिलखुलासपणे समोरच्या व्यक्तीला आपलेसे
करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. मुकुंददादा देसाई यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द अशीच आघाडीवर राहिली. जिल्हा बँकेत विभागीय अधिकारी या पदावर असताना त्यांनी नेतेमंडळींच्या सल्ल्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली.

विधानसभेचे माजी सभापती (कै.) बाबासाहेब कुपेकर, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आजरा तालुका राष्ट्रवादीची धुरा हाती घेतली. आजही ते तालुकाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तालुक्यात राष्ट्रवादीला बळ मिळवून दिले आहे. पंचायत समितीसह विविध संस्थांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. जनता बँकेचे अध्यक्ष, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष या पदांवर ते कार्यरत आहेत. कोणालाही न दुखावता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे त्यांचा विरोधी पक्षातही मित्र परिवार मोठा आहे. त्यांचे जिल्ह्यातील नेतेमंडळींबरोबर स्नेहसंबंध आहेत. पर्यावरण, चित्रपट, वाचन यांसह विविध विषयांचा त्यांना व्यासंग आहे. राजकारण व समाजकारणापलीकडे त्यांनी मैत्रीचे संबंध जपले आहेत. मित्रांच्या मैफलीत, गप्पांत ते अधिक खुलतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर अनेक जण अगदी रस्त्यावरही चर्चेचा फड रंगविताना दिसतात.आबालवृद्धांपासून युवकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. यात कधीही वयाची अडचण दिसत नाही. जीवनाच्या वाटेवर पत्नीचा वियोग, आई-वडिलांचे हरपलेले छत्र असे कित्येक कटू अनुभव वाट्याला आले, तरीत्यांनी आपल्या चेहऱ्यावरील हास्याची लकेर कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना भावत आले आहे

बहुजन समाजाची आर्थिक संस्था म्हणून जनता बँकेकडे पाहिले जाते. ही बँक मध्यंतरी अडचणीत आली होती. बँकेला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे याचे मोठे आव्हान मुकुंददादांनी पेलले. जिल्हा बँकेतील पाठीशी असलेल्या अनुभवातून त्यांनी बँकेची गाडी रुळावर आणली. पाठोपाठ आजरा साखर कारखान्याची सूत्रे हातात घेऊन कारखान्याची घडीही बसवली. दहा वर्षांत बँकेचा आलेख उंचावणारा असून, यातून त्यांचा सहकारातील व बैंकिंग व्यवसायातील दूरदृष्टीपणा दिसून येतो.

अशा या अजातशत्रू संयमी दादांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

…ज्योतिप्रसाद सावंत

संजय पाटील यांना
राष्ट्रीय नागरीरत्न पुरस्कार

आजरा : प्रतिनिधी

गवसे ता. आजरा येथील उद्योजक श्री. संजय पाटील यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय नागरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पाटील यांनी सिनर्जीक सेफ्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून गुणवत्तापूर्ण सेफ्टी साधनांची निर्मिती केली. विशेषता सिनर्जीक सेफ्टी शूज भारतामधील नामवंत कंपन्यांमध्ये वापरले जाते. त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना सदर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

होन्याळी येथील एकाची आत्महत्या

उत्तूर : प्रतिनिधी

होन्याळी (ता. आजरा) येथे प्रकाश दत्तात्रय मुळीक (वय ५० वर्षे ) याने बजरंगी नावाच्या शेत जमिनीत आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत वर्दीदार मारुती दत्तात्रय मुळीक (वय ६४, रा. होन्याळी) यांनी दिलेल्या वर्दीवरून आजरा पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ. हजारे हे करीत आहेत.

स्व. मुकुंददादा आपटे यांना अभिवादन


उत्तूर : प्रतिनिधी

आजरा तालुक्याचे लोकनेते स्व मुकुंददादा आपटे यांच्या 33 व्या पुण्यतिथी निमित्त दादांच्या स्मृतीस जिल्हा बँकेचे संचालक सुधीर भाऊ देसाई, जि प सदस्य शिरीष देसाई, माजी जि.प. अध्यक्ष श्री. उमेशदादा आपटे आजरा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री .सुनील दिवटे श्री. अनिकेत कवळेकर, वसंतराव धुरे, विश्वनाथ करंबळी,सौ.वैशाली आपटे यांच्यासह मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहिली.

श्री रवळनाथ मंदिराच्या २५ लाख रुपयांच्या कामाची चौकशी व्हावी !
पेरणोली ग्रामस्थांची मागणी

सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती

आजरा : प्रतिनिधी

ग्रामस्थांना विश्वासात न घेता रवळनाथ मंदिराचे काम करण्याचा निर्णय कोणी घेतला ? मंदिराचा जुना जिना कोणाच्या आदेशाने काढला? जुन्या साहित्याचे काय झाले? पावसाळ्यात मंदिराला गळती का लागते? असे विविध प्रश्न पेरणोली ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात असून  यामुळे सोशल मीडियावर याबाबत प्रश्नांची सरबत्ती होत असल्याने खळबळ उडाली आहे.

पेरणोली (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत असलेल्या श्री रवळनाथ मंदिराच्या सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या कामाची सखोल, निष्पक्ष व तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

श्री रवळनाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून संपूर्ण गावाच्या श्रद्धेचे, अस्मितेचे आणि एकोप्याचे प्रतीक आहे. अशा महत्त्वाच्या मंदिराचे काम करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणे, कामाचे स्वरूप स्पष्ट करणे, खर्चाचा तपशील जाहीर करणे आणि कामाचा दर्जा राखणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, मंदिराच्या कामाबाबत ग्रामस्थांच्या मनात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये प्राधान्याने ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम का करण्यात आले?मंदिराच्या कामासाठी सुमारे २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या रकमेचे काम करताना ग्रामसभा किंवा ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली होती का? मंदिराच्या कामाचे नियोजन कोणाच्या संमतीने करण्यात आले? कामाचा आराखडा कोणी तयार केला? याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली होती का?  २५ लाख रुपये खर्च होऊनही मंदिराला पावसाळ्यात गळती का लागते?  त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.
२५ लाख रुपयांच्या निधीतून नेमकी कोणकोणती कामे करण्यात आली? छताचे काम, जलरोधक उपाययोजना व इतर दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्यात आली होती का? काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अभियंत्यांनी तपासणी केली होती का?मंदिराचा पूर्वीपासून अस्तित्वात असलेला जिना ग्रामस्थांना विश्वासात न घेता काढून टाकण्यात आल्याबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिना काढण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला?जिना काढण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने किंवा समितीने परवानगी दिली? जिना काढण्याबाबत कोणताही लेखी ठराव करण्यात आला होता का?जिना काढण्यापूर्वी त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का ? याचबरोबर मंदिराच्या जुन्या साहित्याचे काय झाले?मंदिराचे काम करताना काढण्यात आलेले जुने बांधकाम साहित्य, लोखंड, लाकूड, दगड, फरशा व इतर वापरण्यायोग्य साहित्य यांचा नेमका हिशेब काय आहे? जुन्या साहित्याची नोंद करण्यात आली होती का? त्याचे मूल्यांकन करण्यात आले होते का? ते साहित्य कुठे ठेवण्यात आले ? त्याचा पुनर्वापर करण्यात आला की विक्री करण्यात आली? विक्री केली असल्यास त्यातून मिळालेली रक्कम कोणत्या खात्यात जमा करण्यात आली?

मंदिराच्या जुन्या साहित्याचा संपूर्ण हिशेब ग्रामस्थांसमोर सादर करण्यात यावा. कोणत्याही साहित्याची अनियमित विल्हेवाट लावण्यात आली असल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. मंदिराच्या कामासाठी मंजूर झालेला निधी, त्याचा स्रोत, मंजूर अंदाजपत्रक, कामाचा आराखडा, निविदा प्रक्रिया, ठेकेदाराचे नाव, मोजमाप पुस्तिका, अदा केलेली बिले आणि काम पूर्णत्वाचा दाखला या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी.

प्रत्यक्ष करण्यात आलेल्या कामाचे स्वतंत्र शासकीय अभियंत्यामार्फत मोजमाप करून मंजूर अंदाजपत्रकाशी तुलना करण्यात यावी. प्रत्यक्ष काम आणि खर्च यामध्ये तफावत आढळल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, संबंधित अधिकारी, ठेकेदार व निर्णय घेणाऱ्यांची चौकशी व्हावी. मंदिराच्या कामाचे नियोजन, मंजुरी, देखरेख, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि बिले मंजूर करण्याची जबाबदारी कोणाकडे होती, याची चौकशी होणे आवश्यक आहे.कामात निकृष्ट दर्जा, आर्थिक अनियमितता किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार किंवा इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, ग्रामस्थांसमोर खुली बैठक घेऊन सर्व माहिती द्यावी

मंदिराच्या कामासंदर्भातील सर्व कागदपत्रे ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. संबंधित अधिकारी, अभियंता, ठेकेदार व मंदिराच्या कामाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची खुली बैठक घेण्यात यावी.या बैठकीत कामाचा खर्च, जिना काढण्याचा निर्णय, जुन्या साहित्याचा हिशेब आणि मंदिराच्या गळतीबाबत स्पष्ट उत्तरे देण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

या प्रश्नांमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. एकंदर रवळनाथ मंदिर बांधकामाशी संबंधित मंडळी काय भूमिका जाहीर करणार याकडे पेरणोली ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

छाया वृत्त 

माणुसकी फाउंडेशनच्या वतीने आजरा येथील गंभीर जखमी अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीवर उपचार करण्यात फाउंडेशनचे अध्यक्ष अमित वसंत प्रभा,नगर पंचायत कर्मचारी संतोष कांबळे, धीरज ससाणे, गणेश कांबळे, किरण सम्यक  यांनी सदर उपचार केले.

निधन वार्ता
अहिल्याबाई सरदेसाई


कासार कांडगाव ता. आजरा येथील अहिल्याबाई बापुसो सरदेसाई ( वय वर्षे ९५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात विवाहित तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.बॅक निरीक्षक विजयराव सरदेसाई यांच्या त्या आई होत.

गुरुवारी सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १९ नोव्हेंबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी तिथी (सकाळी ०७.०५ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (२० नोव्हेंबर सकाळी ०६.५६ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : व्याघात योग (सकाळी ०७.४२ पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
करण : कौलव करण (सायंकाळी ०७.०५ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कुंभ राशी (२० नोव्हेंबर रात्री १२.४८ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : वृश्चिक राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०१.४७ ते दुपारी ०३.११ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४६
सूर्योदय : सकाळी ०६.४९
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

शनिवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शनिवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रविवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!