mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार   दि. २४ जानेवारी २०२५  

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हीच सावरकरांची भूमिका : शरद पोंक्षे 

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ‘स्वातंत्र्यवीर सावकरांना सर्व धर्मग्रंथ पूजनीय होते.धर्मग्रंथातील सर्वच गोष्टी आचरणीय असाव्यात, याबद्दल त्यांचे मतभेद होते. त्यागोष्टींबाबत कालसुसंगत बदलाप्रमाणे आचरण करावे, विज्ञाननिष्ठ धर्म असावा, हे त्यांचे मत होते. सर्वच जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहावेत,’ हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असावे,’ अशी त्यांची भूमिका होती,’ असे प्रतिपादन प्रसिध्द सिने नाट्य अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.

      गजानन पतसंस्था व ब्राह्मण विकास मंडळाच्या वतीने येथील आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर पोंक्षे यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाला शहरवासीयांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.जयवंत केळकर यांनी प्रास्ताविक केले.

      पोंक्षे म्हणाले, ‘सावरकरांनी जीवनभर राष्ट्रहिताची भूमिका जोपासली. सावरकर समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर टीका करण्याचे काम काँग्रेस व त्यांची नेतेमंडळी करीत आहेत. पण, त्यांनी स्वातंत्र्यवीरांचा इतिहास तपासावा. देशहितासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना सूचना दिल्या होत्या पण त्याबाबत नेतृत्वाने दखल घेतली नाही. ती जर घेतली असती तर देशाची स्थिती वेगळी असती.’ याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नित्यनियमाने पूजा करणारे संदीप पारळे, सुरेश हुक्केरी यांचा पोंक्षे यांच्या हस्ते सत्कार झाला.

      यावेळी  डॉ .दीपक सातोस्कर, डॉ. अंजनी देशपांडे, मनोहर बापट, मधुकर क्रमित, प्रा. विजय बांदेकर यांच्यासह गजानन पतसंस्थेचे सर्व संचालक, ब्राह्मण विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

      वामन सामंत यांनी आभार मानले.

निधन वार्ता
बाबूराव घोरपडे

           उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     उत्तूरमधील प्रतिष्ठित डॉक्टर सुरेश घोरपडे यांचे वडील श्री बाबुराव लक्ष्मण घोरपडे (गुरुजी) यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, जावई, सून, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

   अंत्यविधी शुक्रवारी सकाळी ९ वाजता आहे 

बुधवार पर्यंत खात्यावर पेन्शन जमा न झाल्यास आंदोलन…
अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार स्त्री पुरुषांचा इशारा…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गेली तीन ते चार महिने अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार स्त्री पुरुषांना मिळणारी पेन्शन न मिळाल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आज तालुक्यातील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांनी एकत्र येत श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जाऊन आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले.

      निवेदनात म्हटले आहे की, लाडक्या बहिणीसारख्या लोकप्रिय घोषणा करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या सरकारला अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार स्त्री पुरुषांचा आज विसर पडला आहे. खरंतर या सामाजिक दृष्ट्या मागास विभागांना सन्मानाने जगता यावे यासाठी या योजना केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरित्या सुरू केल्या पण अलीकडे या समाज विभागांचा सरकारला विसर पडला आहे की काय अशी शंका आम्हाला आता येऊ लागली आहे. त्यामुळे येत्या बुधवार पर्यंत पेन्शनची रक्कम खात्यावर जमा न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

      यावेळी कॉ.संपत देसाई, निवृत्ती फगरे, सुशीला होरंबळे, शिवाजी चव्हाण, सरिता कांबळे, सुनीता सुतार, सुरेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वामी समर्थ महाराज पादुका, पालखी दर्शन सोहळा उत्साहात


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांची पादुका पालखी दर्शन सोहळा श्री दुरदूंडेश्वर मंगल कार्यालय आजरा येथे भक्तांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी भाविकांनी शिधा व रोख स्वरूपात मंडळाला मदत केली. सदर कार्यक्रम पार पाडणेसाठी लिंगायत गल्ली गणेश मंडळ व महिला मंडळ यांनी महत्वाची भूमिका बजावली.

      अभिषेक व आरतीसह विविध कार्यक्रम पार पडले.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

‘ रोझरी ‘चे स्नेहसंमेलन उत्साहात


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व रोझरी आनंदोत्सव हा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.

      विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा व बक्षीस वितरणाचा त्याचबरोबर खाद्य महोत्सव असा हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजरा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक नागेश यमगर, तहसीलदार समीर माने , प्रणिल भोसले व प्रकाश करवालो हे उपस्थित होते.

      नागेश यमगर यांनी विद्यार्थ्यांनी आपापली गुणवत्ता व शैक्षणिक प्रगती कशी साध्य करता येईल याकडे अधिक लक्ष देण्याचे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा याकडे लक्ष देऊन स्पर्धात्मक जगात आपला टिकाव कसा लागेल यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत हे सांगितले. तसेच आजरा तहसीलदार माने यांनी विद्यार्थ्यांनी चिकाटी आणि शिस्त यावर भर देऊन जीवन अधिक यशस्वी करण्यास भर द्यावा. केवळ डॉक्टर व इंजिनियर ही स्वप्ने न पाहता आपण अनेक गोष्टी करू शकतो यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत असे प्रतिपादन केले .या कार्यक्रम प्रसंगी दरम्यान ज्युनिअर केजी ते ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

      गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत विजय केसरकर व आशिष फर्नांडिस यांनी केले. तर शाळेचा वार्षिक अहवाल शाळेचे मुख्याध्यापक मनवेल बार्देस्कर यांनी सादर केला. शाळेचे प्राचार्य फादर अँथोनी डिसोझा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मेहनतीचे कौतुक करून वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत असल्याबद्दल आभार मानले.

      कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख  स्टीफन फर्नांडिस , सौ. लक्ष्मी पाटील व आनंद उत्सव प्रमुख फादर.विल्सन गोंसाल्वीस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. फादर मेल्वीन पायस यांचे प्रोत्साहन लाभले.

‘ व्यंकटराव ‘ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका,सौ.व्ही.जे.शेलार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करणेत आले. एस वाय भोये यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याबद्दल आपले विचार मांडले.
यावेळी व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका चव्हाण ,प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे मलिग्रे येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलिग्रे ता. आजरा येथे कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत , विशेष श्रम संस्कार शिबीर पार पडले .या शिबिराचे उद्घाटन मलिग्रेच्या सरपंच शारदा गुरव याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ‘ गोकुळ’ च्या संचालीका व केदारी रेडेकर शिक्षण -संस्थि समूहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर होत्या. त्यांनी श्रम संस्कार आणि आरोग्य अनुषंगाने ग्रामस्थाशी संवाद होण्यासाठी व विद्यार्थ्यांना सामाजिक भान येण्याकरिता शिबिराचे नियोजन मलिग्रे येथे केले असून, हे गाव आरोग्य सेवेकरीता दत्तक घेतले असल्याचे सांगितले,

      यावेळी मोफत आरोग्य तपासणी व हिमोग्लोबीन तपासणी, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, महिला साठी हळदी – कुंकू, बालविवाह प्रतिबंध माहितीपट इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ‘ किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारा रक्तक्षय ‘ या विषयी डाॅ. उदयकुमार कोळी यांचे व्याख्यान झाले.

      यावेळी प्राचार्य डाॅ. शिवानी गवंडे उपप्राचार्य डाॅ.पंकज विश्वकर्मा डाॅ.मनाली आंब्रे, डाॅ.अमृत इंजल, डाॅ.धनश्री कुंभार, गणेश एर॔डे, सृष्टी पेढेकर, उपसरपंच चाळू केंगारे, अशोक शिंदे, शिवाजी कागिनकर, आनंदा बुगडे, शिवाजी भगुत्रे, आपाजी बुगडे, रंजना बुगडे महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

      आभार किरण पाटील यांनी मानले.

आज आजरा बंदची हाक

    सकल हिंदू समाजाच्या वतीने लव जिहादच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक २४ रोजी आजरा बंदची हाक देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून (उबाठा) जिलेबी वाटप

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आजरा शिवसेनेमार्फत शिवाजीनगर येथील अंगणवाडीतील मुलांना जिलेबी वाटप करण्यात आले.

     यावेळी शिवसेनेचे संभाजी पाटील, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, दिनेश कांबळे, भाऊ कदम, चंद्रकांत पाटील, अमित गुरव, वसंत भुईंबर, विजय डोंगरे, महादेव गुरव, रवी सावंत व शिवसैनिक उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ.अशोक फर्नांडिस यांचे निधन

mrityunjay mahanews

पोलीस असल्याचे भासवून वृद्धा कडून 35 हजार रुपयांचे दागिने लंपास …पावसाचा पत्ता नाही… रामतीर्थ धबधबा मात्र सुरू…

mrityunjay mahanews

पंधरा दिवसाच्या आत उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे निर्देश- श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई यांच्यासह श्रमुदच्या प्रतिनिधींसोबत सातारा येथे आज मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता, सर्व प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!