mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


तिघेही गजाआड…
गजेंद्र बांडे खूनप्रकरण

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       स्वतःचा मुलगा व अन्य एका साथीदाराच्या मदतीने प्रियकराला झोपेच्या गोळ्या घेऊन त्याचे हातपाय बांधून गळा आवळून खून करून मुमेवाडी (ता. आजरा) गावाजवळ मृतदेह जाळण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सुनीता सुभाष देवकाई (वय ४४, रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) हिच्यासह अमित पोटे (वय २८, रा. सुळे, ता. आजरा) व सुरज देवकाई (वय २४, रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) या तिघांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास खालापूर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

       याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (ता. २७) रोजी प्रियकर गजेंद्र सुभाष बांडे (वय ३८, ता. जिंतूर, जि. परभणी) याचा खोपोली येथे खून करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मृतदेह मुमेवाडी येथे जाळण्याच्या प्रयत्नात असताना पेट्रोलिंग करणाऱ्या आजरा पोलिसांना हा सगळा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन पोलीस विशेष खाक्या दाखवताच एका मोठ्या खून प्रकरणाचा उलघडा झाला होता. सुनिता व मयत गजेंद्र यांच्यात असणारे प्रेम संबंध, या प्रेमसंबंधातून गजेंद्र यांनी सुनीता यांच्याकडून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी उचललेले पैसे व सुनीताने लग्नासाठी गजेंद्र यांच्याकडे लावलेला तगादा, गजेंद्र याने दिलेला नकार व या सर्व प्रकरणातून घडलेले हे खून प्रकरण होते.

      झाला सर्व प्रकार पोलिसांच्या समोर कथन केल्यानंतर पोलिसांना या प्रकरणातील अन्य आरोपी अमित पोटे राहणार सुळे तालुका आजरा व सुनिता यांचा मुलगा सुरज सुभाष देवकाई राहणार खोपोली यांना अटक करण्यात यश आले आहे.

       सदर घटना खालापूर तालुक्यात घडली असल्याने आता हे सर्व प्रकरण आजरा पोलिसांकडून खालापूर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुकच…

       या सर्व प्रकरणांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, ठाणे अंमलदार दत्तात्रय शिंदे, बाजीराव कांबळे, संदीप मसवेकर, संतोष घस्ती, सुदर्शन कांबळे, दीपक किल्लेदार,राजेंद्र पाटील गृह रक्षक दलाचे जवान सतीश खोत, रोहित दळवी यांनी बजावलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.

पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी…?

घाटकरवाडी व धनगर वाडी पाटबंधारे तलावातील पाणी प्रश्न ऐरणीवर

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       एकीकडे उष्म्यात प्रचंड वाढ झाल्यामुळे पाण्याअभावी शेती पिके अडचणीत येत आहेत तर दुसरीकडे हिरण्यकेशी काठावरील गावांचा पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. घाटकरवाडी व धनगर वाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणी सोडल्यास स्थानिक शेतकऱ्यांनी काय करायचे, त्यांनी पिके कशी जगवायची, प्रकल्पासाठी जमिनी देऊन आम्हाला काय फायदा ? असा प्रश्न उपस्थित करत पाणी सोडण्यास विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सोहाळेसह हिरण्यकेशी नदी काठावरील काही गावांनी आता शेतीच्या पाण्याचा प्रश्न बाजूला ठेवा किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या अशी भूमिका घेतल्याने घाटकरवाडी व धनगरवाडी लघुपटबांधारे प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

      त्यातूनही पाटबंधारे विभागाने घाटकरवाडी बंधाऱ्यातून १.६० मीटर तर धनगरवाडी लघुपाटबंधारे तलावातून १.१० मीटर पाणी सोडले आहे. पाणी जरी सोडले असले तरी पाणी किटवडे सुळेरान, शेळप, दाभिल ,देवर्डे, साळगाव सोहाळे असा मार्ग असणाऱ्या या पाण्याचा प्रवाह सोहाळेपर्यंत पोहोचणार का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

       यामागचे कारण असे आहे की पाणी सोडताच ठिकठिकाणीच्या कोल्हापूर पद्धतींच्या बंधाऱ्यांवर बरगे टाकून स्थानिक शेतकरी शेतीसाठी पाणी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह पुढे जाऊ शकत नाही पाटबंधारे विभागाकडून बरगे काढले जात आहेत तर शेतकरी बरगे घालण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच पाटबंधारे विभागाचे, जलसंपदा विभागाचे अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी होऊन संघर्षाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. उपसा बंदीचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे. उपसा बंदी कायम करावी अशी भूमिका काही शेतकऱ्यांची आहे तर उपसा बंदी उठवावी अशी भूमिका घेणारे शेतकरी संख्येने मोठे आहेत.

       एकंदर आगामी दोन महिन्यांमध्ये तालुक्यात काही ठिकाणी शेतीसाठी तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष पहावा लागणार आहे हे स्पष्ट होत आहे.


ग्रामीण भागात रंगाची उधळण

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालूक्यात ग्रामीण भागात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. बालगोपाळांसह तरुण तरुणींनी रंगाची उधळण केली.लहान मुले,तरूण,तरूणींनी रंगपंचमीचा आनंद लुटला.

       आजरा शहरात गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.परंतु तालूक्यात रंगपंचमीलाच रंगांची उधळण केली जाते.रंगपंचमीनिमित्त युवक रस्त्यावर उतरून एकमेकावर रंगांची उधळण करत होते.
सकाळी लवकरच शाळकरी मुलांनी व युवकांनी विविध रंग व नैसर्गिक रंग पाण्यात मिसळून एकमेकावर उधळण करत होते. काही युवक एकत्र जमून रंगपंचमीचा उत्साह द्विगुणीत करताना दिसत होती. विशेषत: लहान मुलांच्या मध्ये कमालीचा उत्साह होता.लहान शाळकरी मुले हक्काने रंगपंचमीची वर्गणी गोळा करताना दिसत होते.

दुपारी बारा वाजेपर्यंत हा उत्साह कायम होता. रंगांची उधळण व संगीताच्या तालावर काही ठिकाणी तरुणांनी ठेका धरला.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रतिभाताई कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी सात जणांना अटक

mrityunjay mahanews
error: Content is protected !!