आजरा तालुक्यातील चाफवडे हायस्कूल प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक …
शाळा हलवण्यास विरोध राहणारच …
पत्रकार बैठकीत माहिती

१९९२ साली स्थापन करण्यात आलेल्या चाफवडे हायस्कूल चाफवडे या माध्यमिक शाळेच्या जडणघडणीत प्रत्येक चाफवडेवासीयाने खारीचा वाटा उचलला आहे . शाळा विनाअनुदानित पासून अनुदानावर येईपर्यंत सर्वतोपरी सहकार्य ग्रामस्थांनी केले आहे . अशावेळी ग्रामस्थांना विश्वासात न घेता संस्था चालकांचा शाळा इतरत्र स्थलांतरित करण्याचा सुरू असणारा प्रयत्न निश्चितच चुकीचा आहे संस्थाचालकांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून हा प्रकार थांबवावा असे आवाहन चाफवडे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच धनाजी दळवी, सुरेश पाटील व अन्य ग्रामस्थांनी केले आहे .
या विषयावर बोलताना सरपंच दळवी म्हणाले , उचंगी प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न उपस्थित करून शाळा स्थलांतर केले जात असल्याचे संस्थाचालक सांगत आहेत . जर जेऊर,चितळे व भावेवाडी या भागातील विद्यार्थ्यांची चाफवडे येथे येताना गैरसोय होणार असेल तर हाच प्रकार चाफवडे येथून जेऊरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अनुभवावयास येणार आहे हे सोयीस्कररित्या संचालक विसरत आहेत .

शाळा सुरू करताना ग्रामस्थांना ज्या पद्धतीने विश्वासात घेतले गेले त्या पद्धतीने शाळा अन्यत्र स्थलांतरित करताना विश्वासात का घेतले जात नाही? एकीकडे शाळेमध्ये मुलांची कमतरता आहे असेही सांगितले जाते तर दुसरीकडे याच संस्थेत कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले मात्र इतरत्र शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत हे योग्य आहे का? याचाही संचालकांनी गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे.
मुळातच आमच्या दोन पिढ्या उचंगी प्रकल्पच्या संघर्षात निघून गेल्या . आपली मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ग्रामस्थांनी शाळा उभारणीस वेळोवेळी सहकार्य केले .संचालकांकडून जेऊर येथे शाळा बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे असा युक्तिवादही केला जात आहे याबाबत जर चाफवडे ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा करून जागे संदर्भात विचारणा केली असती तर निश्चितच आम्ही देखील जागा उपलब्ध करून देऊ शकतो .चाफवडे ग्रामस्थांच्या शाळा स्थलांतर करण्यासंदर्भातील भावना तीव्र आहेत . म्हणूनच शाळेच्या कार्यालयीन इमारतीस टाळे ठोकण्यात आले आहे . याबाबत ग्रामस्थ शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही दाद मागणार आहेत . यातूनही जर सहानुभूतीपूर्वक विचार करून शाळा स्थलांतर प्रक्रिया थांबवली गेली नाही तर प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला . यावेळी सुरेश पाटील बाळकृष्ण आपटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
. ………

आजरा येथे बेडग व मणिपूर घटनेचा निषेध

बेडग ता मिरज येथील आंबेडकरी समाजाने ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन उभारलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान तोडण्याबरोबरच मणिपूर येथील कुकी आदिवासी स्त्रियांची नग्न धिंड काढून विटंबना केली जात असल्याचा व्हिडिओ, फोटो समाजमाध्यमावर फिरत आहेत. ह्या लज्जास्पद घटनांचा आजरा तालुक्यातील परिवर्तनवादी संघटनांकडून निषेध करण्यात आला. हे कृत्य करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करून कठोर शिक्षा करण्याचे निवेदन ही शासनाला देण्यात आले आहे.
गेले अनेक दिवस या देशात दलित, आदिवासी, मुस्लीम, अल्पसंख्याक आणि स्त्रियांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. आपल्या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आंबेडकरी जनतेने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन स्वागत कमान उभी केली होती. ही स्वागत कमान कांही जात्यांध लोकांना खुपत होती. त्यांच्या दबावाखाली येऊन ही स्वागत कमान प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली. ज्यांनी पाडली त्यांच्याकडून न्याय मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याने बेडग येथील आंबेडकरी जनतेने भर पावसात बायका पोरे, म्हातारे कोतारे, लहान मुलांसह गाव सोडून मंत्रालयाच्यादिशेने लॉंग मार्च सुरु केला आहे. आजही या देशात जात मानसिकता किती विखारी पध्दतीने काम करते हेच या घटनेवरून दिसून येते. अशा या जातीयवादी प्रवृत्तीचा आणि त्यांच्या दबावाखाली येऊन स्वागत कमान तोडणाऱ्या प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. या लॉंग मार्चची दखल घेत स्वागत कमान पडणाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आम्हालाही त्यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल याची नोंद घावी.
दलित, आदिवासी आणि मुस्लीम यांच्यावरील अत्याचाराच्या घटनाबरोबर स्त्रियांच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मणिपूर राज्यात गेले महिने दोन महिने जातीय आणि धार्मिक विव्देषातून मोठ्या प्रमाणात जातीय, धार्मिक दंगलीचा आगडोंब उसळला आहे. तिथले सामाजिक जीवन अस्थिर बनले आहे. अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत.
दोन दिवसापूर्वी तर तिथे कहरच झाला. देशाने शरमेने मान खाली घालावी अशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. कुकी आदिवासी जमातीतील दोन स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यातील एका स्त्रीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारी झुंडीला अडवणाऱ्या तिच्या भावाला ठार मारण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांची नग्न करून काढलेली धिंड आणि त्यांच्या गुप्तांगाशी केली गेलेली छेडछाड याचे व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर फिरवण्यात आले. ही घटना कोणत्याही संवेदनशील माणसाला चीड आणणारी आहे. या घटनेतील सर्वच गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
वरील दोन्ही घटनांचा आम्ही आजरा तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी व्यक्ती आणि संघटना तीव्र निषेध करीत असून या दोन्ही घटनातील गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आम्हालाही आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल याची नोंद घ्यावी. असेही या निवेदनात म्हटले असून सदरचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी कॉ संपत देसाई,प्रा.राजा शिरगुप्पे, डॉ. नवनाथ शिंदे, संजय घाटगे, कृष्णा सावंत, भीमराव पुंडपळ, संग्राम सावंत, दशरथ घुरे, युवराज जाधव, प्रकाश मोरुस्कर, निसार मुल्ला,बाळू जाधव, नारायण भडांगे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
. ……….

पात्रता प्राप्त बेरोजगारांना संधी द्या...
आज-यातील विविध संघटनेसह बी.एड.,डी. एड. बेरोजगार युवक आक्रमक

एकीकडे राज्यात नोकरभरती अभावी बी.एड. , डि.एड. धारक बेरोजगार युवकांची संख्या प्रचंड वाढली आहे.यातच राज्य सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेऊन त्यांच्यावर अध्यापनाची जबाबदारी सोपवण्याचा घेतलेला निर्णय हा सुशिक्षित बेरोजगारांची क्रूर थट्टा करणारा निर्णय आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी अध्यापनाची संधी द्यावी अशी मागणी आजरा तालुक्यातील विविध संघटनांसह डी.एड., व बी.एड. बेरोजगार तरुणांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडेआंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
आजरा पंचायत समितीच्या मुख्य इमारतीसमोर शिवाजी गुरव व प्रा. राजा शिरगुप्पे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. शिरगुप्पे म्हणाले,महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांची जवळपास ६० हजार पदे रिक्त आहेत. गेली काही वर्षे शिक्षक भरती नसल्याने कार्यरत शिक्षकांच्या कडून कामे करून घेतली जात आहेत. याचा परिणाम शिक्षकांच्या मानसिकतेवर होत असून मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर देखील होऊ लागला आहे. शिक्षक भरती होणार या आशेवर बी. एड., डी.एड. धारक आहेत. दोन महिन्यापूर्वी शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. तीस हजार पदे भरण्याची घोषणा देखील झाली आहे. मात्र मध्येच सेवानिवृत्ती शिक्षकांना वीस हजार रुपये मानधनावर कामावर घेण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट केले गेले आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी पासून वंचित राहणार आहेत. शाळा बंद पाडण्याचा विचार शासनाचा आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट तर दुसरीकडे नव्या शिक्षकांना रोखण्याचा डाव या सर्व गोष्टी खाजगीकरणाला खतपाणी घालणाऱ्या आहेत. या कृतीला आपला विरोध असल्याचेही जाहीर करण्यात आले. यावेळी संतोष कालेकर, निवृत्ती कांबळे, संजय घाटगे, लता कुंभार, माधुरी खोत मनीषा बिल्ले,शिवाजी इंगळे, गणपतराव येसणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
…………..




