

आजरा तालुक्यात एमआयएमचा प्रवेश
प्रस्थापित राजकीय पक्षांची गणिते विस्कटणार….?

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा येथे नुकतीच ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमिन (एम. आय. एम.) पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनानंतर एम. आय. एम.चा शहरासह तालुक्याच्या राजकारणात प्रवेश झाल्याने राजकीय पक्षांची स्थानिक राजकारणात चांगलीच गोची होणार असून प्रस्थापीतांची गणिते विस्कटणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
आजरा तालुक्यामध्ये प्रस्थापित पक्षांना राजकारण करताना मुस्लिम बांधवांच्या मतदानाचा प्राधान्याने विचार करावा लागतो. विशेषतः आजरा नगरपंचायती बाबतीत हे नाकारताच येत नाही.
आजरा शहरांमध्ये मुस्लिम बांधवांची व मतदारांची संख्या मोठी आहे. शहराच्या राजकारणात मुस्लिम समाजाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
प्रस्थापित सर्वच मंडळींनी अनेक वेळा या ‘एक गठ्ठा’ मतदानाचा फायदा उठवत आपली राजकीय वाटचाल यशस्वी केली आहे.याचाच एक भाग म्हणून मुस्लिम मतदानाचा फटका बसू नये म्हणूनही वेळोवेळी कांही पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर मतदानाला सामोरे जाण्याऐवजी स्थानिक आघाड्यांना प्राधान्य दिल्याचेही दिसते.
स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणूकांपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती आमदारकी, खासदारकी इथपर्यंतच्या निवडणूकीत मुस्लिम मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरत आली आहे.
संघटनेची शाखा उघडण्यात आली असली तरी संघटनेची बांधणी कशा पद्धतीने राहणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत. यामध्ये मुळातच स्थानिक मुस्लिम बांधव या संघटनेकडे कशा पद्धतीने पाहणार यावरही इतर पक्षांचा राजकीय नफा – तोटा अवलंबून राहणार आहे. असे असले तरीही भविष्यात ही संघटना निश्चितच अनेक पक्षांच्या दृष्टीने राजकीय वाटचालीत अडथळा ठरणार हे नक्की.
मुस्लिम मतदार विभागलेलेच
सद्यस्थितीस शिवसेना, भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध राजकीय पक्षांमध्ये मुस्लिम बांधव विभागलेले आहेत. याचाच परिणाम म्हणून सहकारासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुस्लिम बांधव प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्यामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये सक्रिय असणारी मंडळी तालुक्यातील नवख्या एम.आय. एम. ला कितपत गांभीर्याने घेणार यावरही अनेक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.
.
अमित ठाकरे आज आजऱ्यात
मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे हे आज दुपारी साडेतीन वाजता आजरा येथे येत असून त्यांच्या हस्ते आजरा तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले व तालुकाध्यक्ष अनिल नेउंगरे यांनी दिली.
आजरा- गडहिंग्लज मार्गावरील तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या देसाई बिल्डिंग येथे सदर कार्यक्रम होणार आहे.

पंचायतराज व्यवस्थेमध्ये सरपंचाची जबाबदारी मोठी : डॉ. पोपटराव पवार
आजऱ्यात नूतन सरपंच व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

अस्थिर राजकीय परिस्थितीचा फटका पंचायत राज व्यवस्थेला बसत आहे. ही व्यवस्था टिकवण्याबरोबर बळकट करण्यासाठी सरपंचांवरील जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पदमश्री डॉ. पोटपराव पवार यांनी केले.
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र, शाखा- आजरा यांच्यावतीने तालुक्यातील ३६ नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार झाला. या वेळी श्री. पवार बोलत होते.
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तालुकाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी सरदेसाई यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. पवार म्हणाले, सध्याच्या
काळात खेडयातून माणस परांगदा होत आहेत. माणसापासून माणूस दुरावत आहे. शहरे फुगत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महात्मा गांधीनी खेड्याकडे चला अशी हाक दिली होती. त्यांनी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून पंचायतराज व्यवस्थेबाबत विचार मांडला होता. राजकर्त्याचे दुर्लक्ष झाले. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. यामध्ये सरपंचाची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी गावातील सर्व घटकांसाठी काम करून शाश्वत विकास साधावा. सरपंचपद हे केवळ प्रतिष्ठेचे नसून गावच्या विकासासाठीच आहे.
श्री. काकडे म्हणाले. शहरांचा विकास साधताना खेड्यांचे शोषण होत आहे. माती, पाणी यावर सध्या काम करण्याची गरज आहे. यासाठी पर्यावरणपुरक विकास साधून गावांची आर्थिक उन्नती करणे गरजेच आहे. यावेळी तहसिलदार विकास अहिर, मुकुंदराव देसाई, राजू पोतनीस, मारुती मारे, संतोष बेलवाडे, वैशाली गुरव, शंकर कुराडे, संदिप चौगुले. सी. आर. देसाई, उत्तम देसाई यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अनिल कांबळे यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.
टेंडर भोवती फिरणारे राजकारण धोकादायकच
टेंडरभोवती फिरणारी व्यवस्था तयार झाल्यास गावचा विकास कामाचा दर्जाही टिकणार नाही व समाजाचे प्रश्न न सुटल्याने अनेक समस्या निर्माण होतील असेही यावेळी पोपटराव पवार यांनी सांगितले.

आजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय कथाकथन स्पर्धेत संयुक्ता फाळके प्रथम
येथील आजरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कथाकथन स्पर्धेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठवडगाव येथील विद्यार्थीनी संयुक्ता फाळके हिने प्रथम क्रमांक मिळविला. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि आजरा महाविद्यालय आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा पार पडली. फाळके हिने ‘म्हादू गेला’ ही कथा कथन केली. तिला तीन हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.आनंद बल्लाळ यांनी केले. आजरा महाविद्यालयाची विद्यार्थीनी आदिती देसाई हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. तिने संशय ही कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिला दोन हजार रूपये रोख देण्यात आले. तृतीय क्रमांक सातारा येथील यशवंतराव चव्हाण इनस्टीट्यूट ऑफ सायन्सच्या प्रसन्ना कुंभार याने मिळविला. त्याला एक हजार रूपये रोख रक्कम देण्यात आली. आजरा महाविद्यालयाचा विद्यार्थी कुलदीप पारळे, शिवराज कॉलेजची विद्यार्थीनी स्नेहा पाटील यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.या स्पर्धेचे परीक्षण डॉ. अविनाश वर्धन, डॉ. श्रद्धा पाटील, अनिल कांबळे यांनी केले. विनायक चव्हाण व डॉ. सर्जेराव पद्माकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचलन डॉ. आप्पासो बुडके यांनी केले तर बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले.

स्त्री- पुरुष समतेतून समाजाची प्रगती : प्रा. राजा शिरगुप्पे
आजरा महाविद्यालयात कार्यक्रम

महीलांनी विविध क्षेत्रात झेप घेतली आहे. पुरुषांनी महीलांचा आदर करावा. त्यांच्यातील क्षमता ओळखून संधी दयावी. दोघांनी सुसंवादातून समाजासाठी काम केले तर समाजाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.राजा शिरगुप्पे यांनी केले.
येथील आजरा महाविद्यालयात ‘समान संधी व लैंगिकता’ या विषयावर श्री. शिरगुप्पे यांचे व्याख्यान झाले. महाविद्यालयाच्या समान संधी या विभागाच्यावतीने याचे आयोजन केले होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ अध्यक्षस्थानी होते.
श्री. शिरगुप्पे म्हणाले, स्त्रीकडे जनन क्षमता ही एक वेगळा निसर्गाने बहाल केलेली क्षमता वगळता सर्व स्त्री पुरुष एक आहेत. पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रीवर घरातील विविध कामे सोपवली आहेत. ही कामे वेळखाऊपणाची असली तरी कौशल्यपूर्ण आहेत. या कामांना दुय्यम दर्जा दिला आहे. पण जेव्हा ही कामे अर्थाजनासाठी उपलब्ध होतील त्यावेळी ती पुरुषांची असतील. अलिकडे महीलांनी वंश सातत्याचा गुण टिकवून देखील सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. पुरुषांनी महीलांचा आदर करून त्यांना योग्य प्रकारे संधी दिल्यास समाजाची उन्नती होईल.
डॉ. बल्लाळ म्हणाले, हजारो वर्षापासून दबलेली स्त्री प्रगत व्हायची असेल तर सामाजिक प्रथांची जळमट त्यांनी आपल्या मनातून झटकली पाहीजेत. त्यावेळी समाजाची स्त्री आणि पुरुष चाके ही समान वेगाने धावतील.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. लता शेटे यांनी केले, पाहुण्याची ओळख प्रा. रागिनी राजमाने, आभार प्रा.मीना मंगळूरकर यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


