

३१ डिसेंबर रोजी कुरकुंदेश्र्वराची यात्रा
१ जानेवारी रोजी महाप्रसाद
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आजरा तालुक्यातील पेरणोली येथील श्री. कुरकुंदेश्वर यात्रेचे शनिवार दिनांक ३१ व रविवार दिनांक १ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
शनिवार दिनांक ३१ डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी भर यात्रा असून रात्री बारा वाजता गाराणे घालण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर रविवार दिनांक १ जानेवारी रोजी पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत महाप्रसाद कार्यक्रम यात्रा स्थळावर होणार आहे. रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम व दुपारी गाव स्तरावरील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचेही संयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदार जनजागृती रॅली

आजरा महाविद्यालय आजराचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे चित्रानगर-बुरुडे येथे 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. शिबिराचे घोषवाक्य युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास हा आहे याला अनुसरून चित्रानगर या गावातील सर्व ग्रामस्थांनी नवमतदार नोंदणी करण्याकरीता व मतदारांची जागृती करण्यासाठी गावातून सुमारे 100 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी विविध घोषणा देत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार जनजागृती पदयात्रा काढली यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग सहभागी झाले होते याप्रसंगी जानबा मिसाळ लक्ष्मण वरगळे सुरेश लाड अर्जुन सरदेसाई उपस्थित होते.

फसवणूक झाली तर नुकसान भरपाई मागा – प्रा. देसाई
आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक जागरण पंधरवडा

आजरा : वस्तूच्या खरेदीपासून उपभोगापर्यंत जागरुकता बाळगा. जागरूक असतानाही तुमची फसवणूक झाली तर नुकसान भरपाई मागितली पाहिजे. यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचे कवच तुमच्याभोवती आहे असे स्पष्ट प्रतिपादन आजरा महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मनोज देसाई यांनी केले. ते राष्ट्रीय ग्राहक जागरण पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
ऑनलाइन युगातही वस्तूंची खरेदी करताना फसवणूक होत आहे. सर्वांनी जागरूक रहा व फसवणूक टाळा असे आवाहन प्रा. रत्नदीप पोवार यांनी केले. स्वस्तातल्या वस्तूंपेक्षा दर्जेदार वस्तू निवडा व चांगले ग्राहक बना असे अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी सांगितले. प्रमाणित वस्तू व दर्जेदार वस्तूंची खरेदी करा, आपल्या हक्काबरोबर जबाबदारीची जाणीव ठेवा, तुम्ही जागरूक व्हा व सर्वांना जागरूक करा, महागड्या वस्तू खरेदी करताना आम्ही व आश्वासनाबाबत जागरूक रहा असेही आवाहन प्रा. मनोज देसाई यांनी केले.
प्रा. अनिल निर्मळे यांनी प्रास्ताविक, प्रा.वैशाली देसाई यांनी स्वागत केले. मलिकार्जुन शिंत्रे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास उपप्राचार्य दिलीप संकपाळ, प्रा. विनायक चव्हाण, प्रा.अर्चना चव्हाण यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शोभा केंद्रे यांनी आभार मानले.

व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे गणित दिवस साजरा

भारताचे जेष्ठ गणित तज्ञ श्रीनिवास रामानूजन यांच्या जयंतीनिमित्य विविध उपक्रम राबविले.प्रतिमापूजन प्राचार्य एस.जी. खोराटे व पर्यवेक्षक एस.एन .पाटील व गणित विषय शिक्षकांच्या हस्ते झाले.
यावेळी गणितीय रांगोळी,विविध गणितीय अभ्यास साधने प्रदर्शन व मांडणी केली होती गणितीय उखाणे, गणित प्रतिज्ञा सौ.श्रुती पूंडपळ यांनी घेतली.गणित विषय व त्याचे महत्त्व या विषयावर सिमरन पाटील,निवेदिता खोराटे, श्रावणी आर्दाळकर यांची भाषणे झाली,गणितीय म्हणी,सुविचारही सादर करण्यात आले. जवळपास ८० विद्यार्थ्यांनी ‘गणित जत्रा’ या उपक्रमात सहभाग घेऊन वेगवेगळे गणिती मॉडेल सादर करून प्रशालेच्या मैदानावर दिवसभर सादरीकरण केले या उपक्रमाचा प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
अनुष्का हेब्बाळकर यांनी सुत्रसंचलन केले,नियोजन सांस्कृतिक विभाग व गणित विषय समितीने केले.गणित दिनाची माहिती श्रीमती ए.बी. पुंडपळ यांनी दिली आभार पी.एस.गुरव यांनी मानले.
🔴राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक…भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींची टीका

पंढरपूर – वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पंढरपूर कॉरिडॉर होणार, असे वक्तव्य केले आहे. या कॉरिडॉरचा आराखडा देखील जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. मात्र, या कॉरिडॉरला पंढरपूरातील स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात काही नेत्यांनी भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची मुंबईत येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर स्वामी यांनी आज पंढरपूर येथे भेट देऊन नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, प्रकल्पाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तरीही स्थानिकांवर हा प्रकल्प लादल्यास देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. या सरकारने अहंकारात काहीही करू नये. त्याऐवजी पंढरपूर सुंदर करण्यावर त्यांनी भर द्यावा. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबाबत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, राज्यात एक पक्ष मोडून-तोडून शिंदे-फडणवीस सरकार बनवण्यात आलेले आहे. हे अनैतिक सरकार आहे.
यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, मंदिरे सरकारमुक्त करण्याबाबत पंतप्रधानांची भेट घेणार का? त्यावर उत्तर देताना स्वामी म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे कोणाचेच ऐकत नाहीत, त्यांनी उत्तराखंडमधील सर्व मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत, ज्यांना असे वाटते की पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत, ते सर्व मोदींचे चमचे आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज सरकारने मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत. मग सरकार चर्च आणि मशीदी आपल्या ताब्यात का घेत नाहीत? वक्फबोर्डात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, ते सरकार ताब्यात का घेत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला. तसेच पंढरपूरातील पायाभूत सुविधांकडे सरकारने लक्ष द्यावे, चंद्रभागा नदी प्रदुषण मुक्त करावी, रस्ते सुसज्ज करावेत, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
(Source-https://chat.whatsapp.)



