
डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही : खा. प्रा.संजय मंडलिक

सद्यस्थितीला देशभरातील साखर उद्योग अडचणीत आहे.साखर उत्पादनात जगामध्ये देशाने आघाडी घेतली असली तरी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेचे दर वाढत नसल्याने साखर उद्योगासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत.साखर कारखान्यांना याची प्रचंड झळ बसू लागली आहे.यातून मार्ग काढण्यासाठी डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाहीअसे प्रतिपादन खा. प्रा.संजय मंडलिक यांनी केले.आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 24 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून खा.प्रा. मंडलिक बोलत होते.कारखान्याच्या गळीत हंगामाचा मा. डॉ. नृसिंह एकनाथ गोसावी महाराज व आ.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकपर आढावा घेताना कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी यावर्षी साडेचार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्येक पंधरवड्यात ऊस उत्पादकांची बिले अदा करण्यात येतील. असे सांगत आंबेओहोळ व उचंगी प्रकल्पावर उपसा जलसिंचन योजना कशा उभारण्यात येतील याबाबत शेतकरी वर्गास विशेष मार्गदर्शन करण्यात येईल असे स्पष्ट केले
यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले,कारखान्यावर असणाऱ्या 121 कोटी रु. कर्जाचे व्याज, कामगारांना द्यावा लागणारा 60 टक्के प्रमाणे पगार,कारखाना चालवत असताना सात कोटी रुपये इतका येणारा ऑपरेशन लॉस या सर्वातून बाहेर कसे पडायचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे केंद्राने पश्चिम भाग हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला आहे. त्यामुळे कारखान्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या संमतीचा अडथळा कायम राहणार आहे.सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून हा भाग जाहीर करण्यापूर्वीच कारखाना अस्तित्वात आला आहे हे प्रकर्षाने केंद्र सरकारला जाणवून दिले पाहिजे यासाठी संचालक मंडळाने एकत्र राहून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे हे शक्य झाले तरच या पुढे विविध प्रकल्प राबवता येतील. प्रकल्प राबवत असताना इथेनॉल प्रकल्पासाठी जिल्हा बँक वित्त पुरवठा करण्यास मागे पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी कारखान्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या टप्पा पार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येत्या हंगामामध्ये ऊस वहातुकीकरीता प्रामुख्याने नव्याने होऊ घातलेल्या रस्त्याच्या निर्मितीचा अडथळाही राहणार आहे. यासाठी खा.संजय मंडलिक यांनी स्वतः लक्ष घालून रस्त्याच्या डागडुजीसाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहनही आ.मुश्रीफ यांनी केले.
नृसिंह एकनाथ गोसावी महाराज यांनी कारखाना समाजकारण म्हणून चालविण्याबरोबरच कारखान्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावा असे सांगितले.
यावेळी आजरा साखर कारखान्याच्या प्रमुख संचालकांसह उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी उपसभापती शिरीष देसाई,राजू होलम, जनार्दन बामणे,कार्यकारी संचालक डॉ. टी.ए. भोसले, मनसेचे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले सुधीर सुपल, मारुती देशमुख, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर,युवराज पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे यांनी केले.तर आभार संचालक अनिल फडके यांनी मानले.
एकनाथ गिलबिले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
मागच्या देण्याच बोला…
हे सर्व तुम्हीच चालवा…
कारखाना दराबाबत .स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निश्चिंत राहावे असे यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर यांनी मागच्या देण्याचे बोला असा टोला मुश्रीफ यांना लगावला.याची तातडीने दखल घेत मुश्रीफ यांनी हे सर्व आता तुम्हीच चालवा अशी प्रतिक्रिया दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
…….
मान्यवरांची कार्यक्रमाकडे पाठ
आजच्या गळीत शुभारंभ कार्यक्रमास आ. राजेश पाटील आ. प्रकाश आबिटकर माजी मंत्री व आ. सतेज पाटील माजी मंत्री व आ. विनय कोरे,शिवसेनेचे उपजिल्हा संघटक संभाजी पाटील यांची निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख उपस्थितांमध्ये नावे होती प्रत्यक्षात मात्र या मान्यवर मंडळींसह कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका अंजनाताई रेडेकर, माजी अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, ज्येष्ठ संचालक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, भाजपा तालुका अध्यक्ष सुधिर कुंभार यांच्यासह इतर वेळी प्राधान्याने उपस्थित राहणाऱ्या अनेक मंडळींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट जाणवत होते.
……..
सर्फनाला प्रश्नी आ.आबीटकर यांची विशेष बैठक

आजरा तालुक्यातील सर्फनाला मध्यम प्रकल्प यावर्षी पुर्ण करून 100% पाणी आडविण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नाचे लवकरात-लवकर सोडविण्याच्या हेतूने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खालील विषयांवर चर्चा होवून तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ज्या जमिनी वाटप झालेल्या आहेत त्या कसण्यायोग्य करण्यासाठी त्यांचे तात्काळ सपाटीकरण करण्यात यावे,वाटप झालेल्या जमिनींचे दिशादर्शक नकाशे तयार करून त्यांचे तात्काळ वाटप करावे,संपादित केलेल्या शेत घरांची घसारा किंमत वाढीव दराने शेतकऱ्यांना मिळणेसाठी त्याचा प्रस्ताव तात्काश शासनाकडे सादर करावा,शेळप गावठाण मधील घरे बांधणेसाठी दिलेले प्लॉट हे घरे बांधण्यासाठी अयोग्य असून ते बदलून देण्यात यावेत,शेतजमिनीत गावठाण बाहेर बांधलेल्या घरांचे मुल्यांकन करून मोबदला देण्यात यावा अशा सूचना यावेळी आ.आबीटकर यांनी केल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी सौ.जिरंगे , कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, प्रातांधिकारी वसुंधरा बारवे, सुरेश मिटके, महादेव पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.




