

अशोकअण्णा चराटी यांच्या रहात्या घरास आग.. प्रापंचिक साहित्याचे नुकसान
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या रहात्या घरास आज दुपारी शॉर्ट सर्किटने आग लागून आगीमध्ये प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.
मंगाळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चराटी यांच्या घराच्या वरच्या मजल्यामध्ये अचानक आग लागली. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. आगिची बातमी समजताच लिंगायत गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली व आग विझवण्याचे प्रयत्न केले. आजरा येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या बुलेट तैनात करण्यात आल्या परंतु यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात मर्यादा आल्या. अखेर गडहिंग्लज येथून अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. या आगीमध्ये चराटी यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे.आग वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

ग्रामीण शाश्वत विकास योजनेअंतर्गत खेडे येथे श्रीमती कांचनताई परुळेकर यांचे मार्गदर्शन

कै. माधवराव देशपांडे (भाऊ ) यांचे कुटुंबीय व डॉ.व्ही.टी.पाटील फाउंडेशन, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण शाश्वत विकास अंतर्गत खेडे, तालुका आजरा या गावची निवड केली असून त्यासाठी स्वयंसिद्धाच्या कांचनताई परुळेकर यांचे मार्गदर्शन शिबिर खेडे येथे संपन्न झाले.
स्वागत सौ. ज्योती सावरतकर यांनी केले. सदर शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना कांचनताईंनी संस्थे मार्फत करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. महिलांनी कुटुंबाची जबाबदारी पेलत आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी विविध उद्योगांची माहिती देऊन, त्यांचे प्रशिक्षण व त्यासाठी लागणारे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. तसेच युवक, युवतीं साठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, शेतकरी बांधवांसाठी रासायनिक खते मुक्त शेती व त्यातून पिकणाऱ्या शेतीमालासाठी बाजारपेठ कशी उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन दिले जाणार. टप्प्याटप्प्याने गांडूळ खत प्रकल्प , दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन , शेळीपालन यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करण्यात येतील असेही सांगितले.
डॉ. व्हि. टी. फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ सौम्या तिरोडकर यांनी स्वयंसिद्धा व फाउंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून महिला दहा हजार पासून दीड लाखापर्यंत अर्थाजन करीत असल्याचे सांगितले .
आजरा बँकेचे चेअरमन डॉक्टर अनिल देशपांडे यांनी खेडे गावचा सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. सौ. सुतार यांनी लोणावळा चिक्की व पॉपकॉर्न यांची प्रात्यक्षिके दाखवली. सदर कार्यक्रमामध्ये कांचनताईंनी पाच गरजू महिलांना तिरंगा धान्य पाकिटांचे व सर्व ग्रामस्थांना बियाणे पाकिटांचे वितरण केले.सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर संदीप देशपांडे, माजी सरपंच प्रकाश देशपांडे, उपसरपंच प्रकाश चव्हाण, डॉक्टर सौ अंजनी देशपांडे, सौ स्नेहल करंडे, सौ मिलन होळणकर व नवदुर्गा महिला मंडळ च्या सर्व पदाधिकारी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सौ साधना चव्हाण यांनी आभार मानले.






