mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरुवार 

२० ऑगस्ट २०२६

हाजगोळी खुर्द मध्ये सावळा गोंधळ …
दिवसा सील केलेले कार्यालय खोलण्यासाठी रात्री अधिकारी गावात… वातावरण तंग

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हाजगोळी खुर्द येथील ग्रामसेवक एस.के.येळणे हे सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत असून उद्धट उत्तर देणे, मासिक मीटिंग वेळेवर न लावणे, पंधराव्या वित्त आयोगाचा मंजूर बजेट व झालेला खर्च याची माहिती न देणे यासह विविध प्रकारचे मनमानी वर्तन करत असून त्यांची पूर्ण चौकशी व्हावी व चौकशीपूर्वी बदली करून दफ्तर तपासणी व्हावी अशी मागणी हाजगोळी ग्रामस्थांनी व सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार व पी. व्ही. चव्हाण यांनी काल दुपारी ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद करून सील ठोकले.

दरम्यान रात्री नऊ वाजता सील काढण्यासाठी हे अधिकारी गावामध्ये दाखल झाले. सदरची बातमी ग्रामस्थांना समजतात ग्रामस्थांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. यामध्ये रात्रीच्या वेळी सील काढण्याचे कारण काय ? या प्रश्नांचा भडिमार अधिकाऱ्यांच्यावर करण्यात आला. हळूहळू वातावरण तंग होत गेले. तातडीने जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे हाजगोळी येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने एक तर गटविकास अधिकाऱ्यांना बोलवा किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलवा व या प्रकरणाचा खुलासा करा अशी मागणी करत ग्रामपंचायत इमारती समोर ठिय्या मांडला.

रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू होता.

दप्तर सील करण्यास सांगितले होते… गटविकास अधिकारी सुभाष सावंत

याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारीच्या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यासाठी आपण संबंधितांना दप्तर सिल करण्यास सांगितले होते. पण त्यांनी ग्रामपंचायत इमारतच सिल केली असा खुलासा केला आहे्.

अहो आश्चर्यम्

शाळा व्यवस्थापन समितीचीही लागली निवडणूक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण आदर्श विद्या मंदीर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या १४ जागासाठी झालेल्या निवडणूकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी मुळ भाजप यांच्या युतीने उबाठा सेना राजे गट यांच्या युतीचा परभाव करत सत्ता खेचून घेतली आध्यक्ष म्हणून शिवसेनेचे श्री. निलेश सुतार यांची निवड करणेत आली त्याच बरोबर उपाध्यक्ष म्हणून खा. धनंजय महाडीक साहेबांचे कट्टर कार्यकर्ते सौ. पुजा हाळवणकर यांची निवड करणेत आली. शाळा समितीचीही निवडणूक घ्यावी लागल्याने याबाबत तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.

सदस्य म्हणून श्री.शैलेश मुळीक विजय पाटील, विजय खुळे, आविनाश कोलते, सुरेखा सुतार, ज्योती डोंगरे, पुजा पाटील, धनश्री कांबळे यांची निवड झाली विरोधी गटातून सौ. साधना केसरकर, शांताराम पाटील, आंकूश खवरे, सुनिता केसरकर यांची निवड झाली.

शिवसेना मित्र पक्षाच्या युतीचे नेतृत्व उपसरपंच संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाखा प्रमुख श्रीकांत देवरकर, प्रमोद घाटगे,महेश कोलते, राष्ट्रवादीचे संजय गाडे, सदाशिव पाटील,बाबूराव पाटील,भाजपचे शैलेश मुळीक,हरीष देवरकर, आमोल हाळवणकर यांनी केले विरोधी आघाडीचे नेतृत्व संजय केसरकर, राजू जोशिलकर, रणजीत गाडे यांनी केले.

नविन सदस्याांसमोर शाळा इमारत बांधण्याचे आवाहन समोर असून नविन सदस्य शाळेच्या भौतिक विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी कसे प्रयत्न करतात हे बघावे लागेल.

आजरा आंबोली   मार्गावर  ट्रकची कारला धडक‌; दोघे जखमी

आंबोली : विशेष प्रतिनिधी

आंबोली-नांगरतास येथे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रकने विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या वॅगन आर कारला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून संतोष रामचंद्र धुरी यांना गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबोली नांगरतास येथील मायकल डिसोजा यांच्या फार्महाऊसजवळ ट्रक ( क्रमांक MH-10-AW-7943) हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालविला जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या  कारला (क्रमांक MH-04-HM-0217)  ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात केशव दत्ताराम केसरकर (वय 27) हे जखमी झाले असून संतोष रामचंद्र धुरी (वय 32) यांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघेही माणगाव कट्टावाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे व लक्ष्मण काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक मायकल डिसोझा, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, दीपक मिस्त्री व विशाल सुतार यांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबोली येथे दाखल करण्यात आले. 

गवसे येथे कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

 

गवसे : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी अंतर्गत गवसे येथे कॅन्सरचे लवकर निदान, जनजागृती व आवश्यक मार्गदर्शनासाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना कॅन्सर तपासणीची सुविधा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.

शिबिराचे उद्घाटन उपसभापती  सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य श्री. सुधीर देसाई तसेच गवसे सरपंच सौ. रेखा रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती मध्ये झाले.

यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. देशमाने व दंतचिकित्सक डॉ. जिरगे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, आजरा डॉ. श्री.सुधाकर जाधव, वैद्यकीय अधिकारी, वाटंगी डॉ. श्री.आर. जी. गुरव व डॉ. एम. ए. शेख यांची उपस्थिती होती.

शिबिरामध्ये एकूण ३६ रुग्णांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. तसेच मुख, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत आवश्यक तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. कॅन्सरची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच संशयित रुग्णांनी पुढील तपासणी व उपचारासाठी वेळेत संदर्भ सेवा घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अतुल पाथरवट यांनी केली, तर आभार प्रदर्शन श्रीमती गीतांजली सुतार यांनी केले.

निधन वार्ता

शंकर खटावकर

उत्तूर….

उत्तूर येथील ज्येष्ठ, मनमिळावू शिक्षक शंकर गणपती खटावकर (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांनी उत्तूर, महागोंड, बेलेवाडी, चंदगड व गवसे येथे शिक्षक म्हणून सेवा बजावली. गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रवीण खटावकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सोनाबाई केसरकर

उत्तूर…

उत्तुर तालुका आजरा येथील सोनाबाई बापू केसरकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : २० ऑगस्ट २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (रात्री ०९.१८ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (सकाळी ०९.०७ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : इन्द्र योग (२१ ऑगस्ट पहाटे ०४.२४ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०८.१५ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१७ ते दुपारी ०३.५२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.२२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

फोटो क्लिक

बोलकेवाडी येथे‌ आयोजित रानभाजी महोत्सवाला जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात महिला ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!