बुधवार
१९ ऑगस्ट २०२६

ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करून बदली करा…
हाजगोळी खुर्द ग्रामस्थांची मागणी

हाजगोळी खुर्द येथील ग्रामसेवक एस.के.येळणे हे सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत असून उद्धट उत्तर देणे, मासिक मीटिंग वेळेवर न लावणे, पंधराव्या वित्त आयोगाचा मंजूर बजेट व झालेला खर्च याची माहिती न देणे यासह विविध प्रकारचे मनमानी वर्तन करत असून त्यांची पूर्ण चौकशी व्हावी व चौकशीपूर्वी बदली करून दफ्तर तपासणी व्हावी अशी मागणी हाजगोळी ग्रामस्थांनी व सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले असून निवेदनावर उपसरपंच प्रशांत कोटकर,सदस्य मनीषा कांबळे, सरिता केसरकर, लता जाधव आदींच्या सह्या आहेत.

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आजरा शिवसेनेचा शुक्रवारी तिरडी मोर्चा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्मार्ट मीटर सक्ती, जुने मीटर न सांगता बदलणे आणि त्यामुळे येणारी वाढीव वीज बिले यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी महावितरण कार्यालय आजरा येथे भव्य तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख श्री. युवराज पोवार व उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी दिली.

रखडलेल्या बसस्थानकासाठी शिवाजी गुरव यांचे धरणे आंदोलन सुरू.

उत्तूर येथील रखडलेल्या बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनस्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब सरोदे व वाहतूक नियंत्रक सतीश भूगोलकर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. बसस्थानकाच्या प्रश्नावर राजकारण न करता प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी गुरव यांनी केली.
बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल होत असून सामान्य जनता या प्रश्नात भरडली जात आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नाला राजकीय वास येत असल्याचा आरोप करत गुरव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आभाळच फाटले आहे तर ठिगळ कुठे-कुठे लावणार? सत्ता त्यांचीच आहे असा टोला लगावत त्यांनी सत्ताधाऱ्यांनीच हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावा, असे सांगितले. दरम्यान, परिवहन महामंडळाचे अधिकारी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी पत्र घेऊन आले होते. मात्र, पत्रातील मजकूर जुजबी स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. पत्र देण्यापूर्वी त्यातील मजकूर तपासणे आवश्यक होते, अशी चर्चा आंदोलनस्थळी झाली.
बसस्थानकाचा प्रश्न ठोस निर्णयाने मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका शिवाजी गुरव यांनी व्यक्त केली.

फाळणीची घटना ही देशाच्या इतिहासातील भळभळणारी जखम – डॉ. राम मधाळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला झालेली देशाची फाळणी ही आपल्या देशाच्या इतिहासातील अखंड भळभळणारी जखम आहे, असे प्रतिपादन डॉ. राम मधाळे यांनी व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग आणि समाजशास्त्र विभागाच्यावतीने फाळणीच्या ऐतिहासिक घटना व त्यातील त्याग या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ उपस्थित होते.
या परिसंवादात डॉ. राम मधाळे यांनी फाळणीची पार्श्वभूमी आणि वस्तुस्थिती, डॉ. सलाम अत्तार यांनी फाळणीचा भारतीय इंग्रजी साहित्यावरील परिणाम आणि डॉ. आप्पासो बुडके यांनी फाळणीची पार्श्वभूमी आणि परिणाम याविषयावर आपली मते मांडली.
या परिसंवादाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी तर डॉ. अविनाश वर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. शेखर शिवुडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. रमेश चव्हाण, प्रा. अनुराधा मगदूम, डॉ. रणजित पवार, प्रा. जिज्ञासा उफराटे, प्रा. भारतभूषण गावडे, प्रा. संजय गाईंगडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय समूह गीत वाचन स्पर्धा उत्साहात

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित शालेय समुहगीत गायन स्पर्धा उत्साहात पार पडल वाचनालयाचे अध्यक्ष श्री वामन सामंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
स्पर्धेत मडिलगे हायस्कुल, मडिलगे यांनी प्रथम क्रमांक मिळविला, आजरा हायस्कुल आजरा यांनी व्दितीय तर पी एम. श्री उर्दु प्राथमिक विद्यामंदिर आजरा यांनी तृतीय क्रमांक मिळवीला वाटंगी हायस्कुल वाटंगी व विद्यामंदिर यरंडोळ यांना उत्तेजनार्थ पाारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, विजय राजोपाध्ये यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निधन वार्ता
मुकुंदराव देसाई
शिरसंगी येथील प्रतिष्ठित नागरिक,तालुका संघाचे शाखाधिकारी व शिरसंगी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मुकुंदराव देसाई यांचे वयाच्या ७६ वर्षी निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, नातू, सून परिवार आहे , रक्षविसर्जन गुरुवारी आहे.
आजचे पंचांग
दिनांक : १९ ऑगस्ट २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (सायंकाळी ०७.१९ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (सकाळी ०६.४६ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : ब्रह्म योग (२० ऑगस्ट पहाटे ०३.४३ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : गराजा करण (सकाळी ०६.३० पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : तूळ राशी (२० ऑगस्ट पहाटे ०२.२९ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४२ ते दुपारी ०२.१७ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.३३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


