mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार २३ मे  २०२६

गॅस पाठोपाठ डिझेल टंचाई सुरू…
पेट्रोल पंपावर झळकू लागले फलक


आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

एकीकडे सर्वसामान्य जनता गॅस सिलेंडर टंचाईने हैराण झाली असतानाच आता हळूहळू अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल संपल्याचे फलक झळकताना दिसत आहेत. उन्हाळी सुट्टी संपण्याचा शेवटच्या टप्प्यात सहली व देवदर्शनाचे नियोजन केलेल्या मंडळींच्या उत्साहावर चांगलेच पाणी पडू लागले आहे.

गेले दोन अडीच महिने तालुक्यात गॅस सिलेंडर वितरणाचा बोजवारा उडाला आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत येत असल्याने गॅस वितरण केंद्रांसमोर रांगा दिसू लागल्या आहेत. अनेक हॉटेल्स मध्ये चुली पेटताना दिसत आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा हंगाम सुरू असून अनेकांनी देवदर्शन व पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन केले होते. परंतु प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर पेट्रोल डिझेल मिळेल याची खात्री देता येत नसल्याने व हॉटेल्स उपलब्ध होतील याचीही फारशी हमी देता येत नसल्याने अनेक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.

गेल्या दोन दिवसापासून तर आजरा शहरांमधील पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल संपले असल्याचे फलक वारंवार झळकत आहेत.

बळीराजा अडचणीत…

खरी प्रचार तयारीला लागलेला बळीराजा डिझेल टंचाईने चांगलाच अडचणीत आला आहे. अलीकडे ९० टक्के शेती ही यंत्रांच्या सहाय्याने केली जात असल्याने पावर ट्रिलर, ट्रॅक्टर , पाणी उपसा पंप याकरता डीझेल मिळणे अडचणीचे झाले आहे. येत्या पंधरा दिवसात परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता हळूहळू वाढू लागली आहे. 

 अंगठा घेऊन बचत खात्यावरील पन्नास हजार रुपये लांबवले

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

रत्‍नाबाई महादेव रेडेकर या सुळे तालुका आजरा येथील महिलेचे ३५ हजार रुपये रोख व पंधरा हजार रुपये त्यांच्या पोस्टातील बचत खात्यावर असणाऱ्या रकमेपोटी अंगठा घेऊन रक्कम काढून फसवणूक करून पन्नास हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी प्रगती संपत मुंढे ( वय २२ वर्षे सध्या राहणार सुळे ता. आजरा जिल्हा कोल्हापूर/ मुळगाव रा. पोहाळे तर्फ बोरगाव तालुका पन्हाळा ) यांच्या विरोधात गणेश प्रभाकर चाटे यांनी केलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

उत्तूरमध्ये ‘एपीके फाईल’चा विळखा; ऑनलाइन फसवणुकीचा वाढता धोका

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पिंपरी येथे व्हॉट्सॲपवर आलेली एपीके फाईल डाऊनलोड करून ज्येष्ठ नागरिकाची पाच लाखांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच, उत्तूर व आजरा तालुक्यातही अशाच संशयित एपीके फाईल्सचा धुमाकूळ सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक युवकांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून एपीके फाईल्स पाठवण्यात येत आहेत.
ऑनलाइन भामट्यांकडून विविध आमिषे दाखवून या फाईल्स डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते. संबंधित फाईल ओपन करताच मोबाईलचा ॲक्सेस मिळवून बँकिंग माहिती, वैयक्तिक डेटा चोरी किंवा आर्थिक फसवणूक होण्याचा धोका निर्माण होतो.
सुदैवाने, उत्तूर परिसरात अद्याप कोणीही या फसवणुकीला बळी पडल्याची नोंद नाही. मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बँक ऑफ इंडियाच्या उत्तूर शाखेकडूनही नागरिकांना सावधतेचे आवाहन करण्यात आले आहे. अनोळखी नंबरवरून आलेल्या एपीके फाईल्स, लिंक किंवा मेसेज ओपन करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले.

एपीके फाईल म्हणजे काय?…

अँड्रॉइड मोबाईलमध्ये ॲप इंस्टॉल करण्यासाठी वापरली जाणारी फाईल म्हणजे एपीके फाईल. यात ॲपची माहिती, सेटिंग्ज, परमिशन, आयकॉन व इतर डेटा असतो. मात्र अशा फाईलमध्ये व्हायरस किंवा मालवेअर लपवलेले असू शकतात. त्यामुळे मोबाईल हॅक होणे, डेटा चोरी जाणे किंवा बँक खात्याला धोका निर्माण होऊ शकतो .

छाया वृत्त

पेरणोली येथे नियोजित अभ्यासिकेला जागा मिळणेबाबत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पेरणोली यांच्याकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले.

 महत्त्वाच्या बातम्या 

♦ ब्रह्मपुरी वन विभागातील शिंदेवाडी/चंद्रपूर वनपरिक्षेत्रात गुंजेवाडी जंगलात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ,तेंदू पत्ता तोडायला गेलेल्या चार महिलांवर चार बछड्यांसह वाघिणीने हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केले.

♦ सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. भाजपा व काँग्रेस पेक्षाही कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावरील फॉलोवर्स तब्बल दुपटीने वाढले आहेत.

♦ जर एखाद्या विद्यार्थ्याच्या आई-वडील दोघेही आयएएस अधिकारी असतील तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ कशासाठी ? असे अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

आयपीएल न्यूज

काल शुक्रवारी झालेल्या हैदराबाद विरुद्ध बंगळूर सामन्यांमध्ये हैदराबादने बंगळूरुला ५५ धावांनी नमवले.४६ चेंडू ७९ गावा काढणाऱ्या ईशान किशनला सामनावीर घोषित करण्यात आले.


गुण तक्ता

बंगळूरु. १८

गुजरात. १८ 

हैदराबाद १८

राजस्थान १४

पंजाब. १३

कोलकाता १३

चेन्नई १२

दिल्ली १२

मुंबई ८

लखनौ. ८


आजचा सामना

लखनौ विरुद्ध पंजाब

वेळ सायंकाळी ७.३० पासून

आजचे पंचांग

दिनांक : २३ मे २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी (२४ मे पहाटे ०४.२७ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : मघा नक्षत्र (२४ मे पहाटे ०२.०८ पर्यंत ) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
योग : ध्रुव योग (सकाळी ०६.१३ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : विस्ती भद्रा करण (दुपारी ०४.४० पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.१९ ते सकाळी १०.५७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

तर तालुका संघ निवडणूक लढण्याची तयारी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मुश्रीफ जिंकले… अण्णा हरले… जिल्हा बँकेचा आजरा तालुक्यातील निकाल धक्कादायक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!