mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि. १८ मार्च २०२६

आमची बदनामी नको…
जमत नसेल तर बदल्या करून घ्या…

मासिक सभेत नगरसेवक आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्पूज वृत्तसेवा 

पाणीपुरवठा विभागाच्या एकंदर कारभाराबाबत नगरसेवकांनी सभेसमोर प्रथमच गेलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार आर.डी.देसाई यांच्यासह या विभागाच्या प्रमुख कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तुमच्यामुळे आम्ही बदनाम होत आहोत तुम्ही काम करण्यास पात्र नाही असा आरोप करत अधिकारी श्रीमती कदम यांना थेट तुम्ही बदली करून घ्या अशी सूचना करण्यात आली. नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे, मुख्याधिकारी सूरज सूर्वे यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीची बैठक पार पडली.

विषयांचे वाचन निहाल नायकवडी यांनी केले.

सभेमध्ये नगरपंचायत मालकीच्या सुमारे १३५ दुकान गाळ्यांचे चे ८० ते १००% इतके भाडे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपंचायतीचे अनेक गाळे मुळ मालकांनी पोट भाडेकरु ठेवले आहेत.यावर जोरदार चर्चा झाली.मुळ मालकांना नोटीस पाठवून पोट भाडेकरु न काढल्यास सध्या असणाऱ्यांनाच मालक बनवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी आसिफ पटेल यांनी सर्वसामान्य दुकानदार, मार्केटची स्थिती पहाता निर्णय घ्यावा अशी सूचना मांडली. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून खोके व गाळे उभारण्यात आले आहेत नगरपंचायतीने आपल्या अधिकाराचा वापर करून ते तातडीने काढावेत अशा सूचनाही करण्यात आल्या.

कचऱ्याबाबत नगरसेवक परशुराम बामणे यांनी अधिकारी यांना धारेवर धरत आपण सद्यस्थितीस या योजनेत भाग घेण्यास पात्र आहोत का ? असा प्रश्न विचारुन अधिकाऱ्यांना गोंधळून टाकले. शेवटी अधिकाऱ्यांनी नगरपंचायत पात्र नसल्याची प्रांजळ कबुली दिली.

ठेकेदार आर.डी.देसाई यांना अखेर सभागृहात येण्यास नगरसेवकांनी भाग पाडले. रेंगाळलेल्ला योजनेबाबत सर्वच नगरसेवक व नगरसेविका यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.९० टक्के योजना पूर्ण असल्याचा दावा करणाऱ्या ठेकेदारांनी ९० घरात तरी पाणी पूर्ण क्षमतेने मिळते का  हे दाखवून द्यावे असे आव्हान नगरसेविका डॉ.स्मिता कुंभार यांनी केले. अधिकारी वर्गाला नेमके दररोज पाणी येते किती वापरले जाते किती व वाया किती जाते याबाबत चांगलेच धारेवर धरले.पटेल कॉलनीला टॅंकरने पाणी देण्याची मागणी केली. गळक्या गाळ्यांच्याही मुद्दा अनिकेत चराटी यांनी उपस्थित केला. आठवडा बाजाराचा फेर लिलाव करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

यावेळी झालेल्या चर्चेत परशुराम बामणे, अभिषेक शिंपी, आसावरी खेडेकर, अश्विनी चव्हाण, पुनम लिसन, परेश पोतदार,आसिफ सोनेखान,रेश्मा बुड्डेखान, विक्रम पटेकर, डॉ. इंद्रजीत देसाई, कलावती कांबळे, विक्रम पटेकर यांनी भाग घेतला.

गाळे भाड्याने की खरेदी…?

हनुमान संकुल येथील एका भाडेकरूने स्टॅम्पद्वारे आपल्या ताब्यातील गाळा दुसऱ्या दुकानदारास विकला असल्याने गाळे भाड्याने दिले आहेत की मालकीने दिले आहेत ? असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. कुमार भवन शाळेनजीक असणारे अनधिकृत गाळेही नगरपंचायतीची डोकेदुखी ठरत असल्याचे प्राधान्याने जाणवले. अतिक्रमण तर आहेच परंतु नगरपंचायतीकडून एक रुपयाचीही कर आकारणी होत नसल्याचा अजब प्रकार यावेळी उघडकीस आला.

महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर…

नगरपंचायत मालकीचे सुमारे दीडशे गाळे व रिकाम्या जागा असतानाही शहरात महिला स्वच्छतागृह नाहीत. मुख्य इमारतीच्या मधल्या पट्ट्यात असणाऱ्या दुकान गाळ्यांपैकी दोन दुकान गाळे खाली करून तेथे अद्ययावत स्वच्छतागृह बांधावे अशी सूचना नगरसेविका डॉ .कुंभार यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेच्या आजऱ्यात आगमन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरात नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेच्या नूतन शाखेचा शुभारंभ झाला असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने विशेष ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे.

संस्थेची स्थापना १९ ऑक्टोबर १९९१ साली झाली असून या संस्थेची स्थापना कै.दिगंबर उर्फ दादा कोरगावकर व कै.श्रीधर कुशे यांनी केली आहे.आजरा ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली शाखा आहे.या पतसंस्थेच्या एकूण १४ शाखा आहेत.या संस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे.

संस्थेचे ४८०० सभासद असून वसूल भागभांडवल ३ कोटी ८४ लाख इतके आहे. गुंतवणूक ५० कोटी, तर कर्ज वाटप १५२ कोटी ८७ लाख इतके आहे.

संस्थेच्या फोंडाघाट, कणकवली, कुडाळ, बांदा, खारेपाटण, वैभववाडी , सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड, मालवण,माणगांव,कट्टा,दोडामार्ग व आजरा येथे शाखा आहेत.

उत्तूर जवळील  माद्याळ -हुड्डा तिठा ठरतोय मृत्यूचा सापळा.
अपघातांची मालिका सुरूच…

उत्तूर : मंदार हळवणकर

उत्तूर परिसरातील माद्याळ – हुड्डा तिठा हा सध्या नागरिकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असून येथे वारंवार अपघात होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीव्र वळण आणि तीन रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहनचालकांना पुढील रस्ता स्पष्टपणे कळत नाही. परिणामी, दर पंधरा दिवसाला येथे अपघात होत असून अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींना जीवही गमवावा लागला आहे.

हा मार्ग उत्तूर, धामणे,माद्याळ, कापशी आणि निपाणी यांना जोडणारा मध्यवर्ती मार्ग असल्याने येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि वर्दळ असते. तसेच चाकणकरी देखील या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

या मार्गावर अनेक युवक भरतीसाठी धावण्याची प्रॅक्टिस करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यालगत शेती असल्यामुळे शेतकरी बांधवांनाही अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ बहिर्वक्र आरसा (Convex Mirror), रिफ्लेक्टर, तसेच दिशादर्शक फलक बसवणे अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा, भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाधव दांपत्याचा आज स्मृतिदिन…

आजरा : मृत्युंजय महान्पूज वृत्तसेवा

१८ मार्च २०१९ रोजी झालेल्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या निधनानंतर ३ एप्रिल २०१९ रोजी दु:खातून सावरत असतानाच अचानकपणे आजरा साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांचे निधन झाले.

आजरा तालुक्यातील अनेक संस्थाच्या उभारणीत आणि जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. राजकारण करताना स्वत:ला कोणते तरी पद मिळावे म्हणून नाही तर संस्था टिकावी. त्याचे फायदे लोकांना मिळावेत ही भावना त्यांनी कायम जपली. मला स्वतःला पद मिळण्यापेक्षा सहकार वाचला पाहिजे चेअरमन येतील जातील पण संस्था मोठी झाली पाहिजे, सामान्य जनतेला फायदा मिळाला पाहिजे म्हणूनच त्यांनी साखर कारखाना, राईस मिल, पतसंस्था, शाळा आणि अन्य विविध संस्था असोत तेथे निस्वार्थीपणे कार्य केले.

आजरा साखर कारखान्यांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

कधीही कोणताही आर्थिक लाभ न घेता आप्पासाहेबांनी वेगवेगळ्या अनेक संस्थेत होतकरू मुलांना नोकऱ्या दिल्या. त्या रुपी अनेक संसार उभे राहिले. त्यांच्यासह त्यांच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभा राहणाऱ्या लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!


गर्जना संघटनेच्या पाठपुराव्याला यश : उत्तूर–आरदाळ पाणंद रस्ता खुला करण्याचे आदेश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला उत्तूर–आरदाळ पाणंद रस्ता अखेर खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहसीलदार कार्यालय, आजरा यांनी शासकीय नकाशानुसार प्रत्यक्ष मोजणी करून संबंधित पाणंद रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तूर परिसरातील गट क्रमांक १०१०, ९८९, १०१९,११०२५,१०२६/१,१०२७,१०२८,१०२९,१०२१,१०२२,१०२३,१०१६/२,१०२४ या शेतजमिनींच्या परिसरातून जाणारा हा पाणंद रस्ता अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीमाल वाहतूक, शेतीकामासाठी यंत्रसामग्री ने-आण करणे यामध्ये अडथळे निर्माण होत होते.

या पार्श्वभूमीवर गर्जना संघटनेचे कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे, वैभव यादव, विनायक चिटणीस आणि सौरभ सावंत यांनी तहसील कार्यालय, आजरा येथे लेखी अर्ज देत शासकीय नकाशानुसार प्रत्यक्ष मोजणी करून पाणंद रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. संघटनेने या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाने या मागणीची दखल घेतली.

तहसीलदार कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय नकाशानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करून पाणंद रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी आवश्यक असलेली वाहतूक सुलभ होणार आहे.

गर्जना संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आजरा हायस्कूलच्या तीन खेळाडूंची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर पासिंग हॉलीबॉल असोसिएशन मार्फत जिल्हास्तरीय हॉलीबॉल निवड चाचणी मध्ये जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूलमधील तीन खेळाडूंची कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघात निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून या खेळाडूंचे कौतुक होत आहे.

१४ वर्षांखालील गटासाठी झालेल्या या निवड चाचणीत कु. श्रावणी इलगे, कु. निधी मोरबाळे आणि कु. मनिष पेंडसे या तीन खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा संघात स्थान मिळवले आहे. हे तिन्ही खेळाडू आता आगामी विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या खेळाडूंना शाळेतील क्रीडाशिक्षिका सौ. एम. पी. चव्हाण आणि श्री. एम. ए. गोरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

कौतुकास्पद…

आजरा : मृत्युंजय महान्पूज वृत्तसेवा

भूषण श्रीरंग हवालदार रा. दत्तवाड ता. शिरोळ हे दुचाकीवरून गोवा ते कोल्हापूर अशा दिशेने येत असताना माद्याळ फाटा येथे त्यांचा मोटोरोला कंपनीचा अंदाजे ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल रस्त्यात पडला होता. त्यांच्या पाठोपाठ येणारे आरिफ बशीर नसरदी रा. नाईक गल्ली,आजरा यांना सदरचा मोबाईल मिळाला. भूषण हवालदार हे पोलीस ठाणे येथे आले असता त्यांच्या मोबाईलवर फोन लावला तर आरिफ हे पोलीस ठाणे जवळ आलेले होते. त्यांनी मोबाईल भूषण हवालदार यांना परत केलेला आहे.

त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १८ मार्च २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (सकाळी ०८.२५ पर्यंत) त्यानंतर अमावस्या तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (१९ मार्च पहाटे ०५.२० पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : शुभ योग (१९ मार्च पहाटे ०४.०० पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : शकुनी करण (सकाळी ०८.२५ पर्यंत) त्यानंतर चतुष्पाद करण
चंद्र राशी : कुंभ राशी (रात्री ११.३५ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४७ ते दुपारी ०२.१७ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.४६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४८
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत

आजऱ्यात आज रंगपंचमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

प्रथेप्रमाणे आजरा शहर व परिसरात आज बुधवार दिनांक १८ रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे . दुपारच्या सत्रात बाजारपेठ बंद राहणार असून बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या मंडळींनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निधन वार्ता…

सौ. सविता उंडगे

भादवण ता. आजरा येथील सौ. सविता तानाजी उंडगे (वय ४८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी, जावई, मुलगा असा परिवार आहे.

ज्येष्ठ शिवसैनिक व देवस्थान कमीटीचे खजिनदार श्री. तानाजी उंडगे यांच्या त्या पत्नी होत. आज बुधवारी सकाळी ९ वाजता भादवण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

फोटो क्लिक…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लाकुडवाडी ता. आजरा गावाच्या बस स्टँड जवळून नव्याने होण्याऱ्या गडहिंग्लज ते चंदगड रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे .यामुळे वाहन धारक व ग्रामस्थ, व प्रवासी व्यक्तींना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे .

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी सात जणांना अटक

mrityunjay mahanews
error: Content is protected !!