mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रठळक बातम्याराजकीयरोजगारविदेशसामाजिक

सातच्या बातम्या

बुधवार दिनांक ३ डिसेंबर २०२५

धनगरमोळाजवळील अपघातात एक जण ठार


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

संकेश्वर-बांदा महामार्गावर गडहिंग्लजला जाताना धनगरमोळा ता आजरा येथे भरधाव कार चि-याच्या ढिगाला आदळून झालेल्या अपघातात कर्नाटकमधील एक जण जागीच ठार झाला. लक्ष्मण शंकर कोटबागी वय ४२ रा. नागरमुनोळी ता चिक्कोडी जि बेळगाव असे त्याचे नाव आहे. शिवानंद शंकर कोटबागी यांनी आजरा पोलीसात याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, चालक सागर रुद्रापा नेली, व मयत कोटबागी दोघेही वय ४२ रा. नागरमुनोळी ता. चिक्कोडी जि. बेळगाव कारगाडीमधून गडहिंग्लजला जात होते.यावेळी मंगळवार दि २ डिसेंबर रोजी सकाळी ७ च्या दरम्यान धनगरमोळा येथील रस्त्याच्या डाव्या बाजूलाला वृदांवन फार्म समोरील चि-याच्या ढिगा-याला जोरात ठोकर मारुन वाहन पलटी झाले.त्यात कोटबागी यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत चालक सागर नेलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवालदार अनिल सरंबळे पुढील तपास करीत आहेत.

आजरा नगरपंचायतीसाठी ७७.८६ % मतदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीसाठी चुरशीने ७७. ८६ टक्के मतदान झाले. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले. १४ हजार ६८६ मतदारापैकी ११ हजार ४३४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ७ हजार ४१९ पुरुषांच्या पैकी ५ हजार ८२९ तर ७ हजार २६७ महीला मतदारापैकी ५ हजार ६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

सर्वात जास्त प्रभाग १४ मध्ये ८५.९७ टक्के मतदान तर या प्रभाग १३ मध्ये सर्वात कमी ७२.१९ टक्के मतदान झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवकपदासाठी ५७ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. त्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद झाले आहे. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

थंडीच्या वातावरणामुळे सकाळच्या सत्रात कुर्मगतीने मतदान झाले. सकाळी नऊ नंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. यामुळे अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. सकाळी साडे अकरा पर्यंत ३२ टक्के, साडेतीन वाजेपर्यंत सुमारे ६८ टक्के मतदान झाले. सर्वच उमेदवारांकडून मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. प्रत्येक मत
नोंदवण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती. बाहेरगावाहून मतदान आणण्यासाठी खासगी वहानांची सोय केली होती. मुंबई, पुणे, कोल्हापुर, बेळगाव येथील चाकरमान्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळच्या सत्रात मतदान करून घेण्यासाठी नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

प्रभागनिहाय झालेले मतदान : (एकूण मतदान, झालेले मतदान, टक्केवारी)

प्रभाग एक : ६१२, ४६०, ७५%

प्रभाग दोन : १०५९, ८३५, ७९%

प्रभाग तीन : ८६४, ७२६, ८४%

प्रभाग चार : ६०२, ४८५. ८१%

प्रभाग पाच : ४२४ ३५५, ८४%

प्रभाग सहा : ४४५, ३५९, ८१%

प्रभाग सात : ८८६, ६५८, ७४%

प्रभाग आठ : १५३५, ११४८, ७५%

प्रभाग नऊ : १३९८, १०६१, ७६%

प्रभाग दहा : १०१०, ८५६, ८५%

प्रभाग अकरा : ७५५, ५५६, ७४%

प्रभाग बारा : १०८६, ८४९, ७८%

प्रभाग तेरा : ११०८, ७९९, ७२%

प्रभाग चौदा : ४४२, ३८०, ८६%

प्रभाग पंधरा : ८३०, ६३५, ७७%

प्रभाग सोळा : ९१५, ६६७, ७३%

प्रभाग सतरा : ७१५, ६०६, ८५%

कार्यकर्त्यांची निराशा…

मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अकरा वाजण्याच्या सुमारास मतमोजणी पुढे ढकलल्याचे वृत्त समाज माध्यमातून व्हायरल झाले. सदरच्या वृत्ताची शहानिशा होताच मतमोजणी प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली.

प्रभाग ६ व १४ मध्ये हाय व्होल्टेज लढत…

प्रभाग सहा मधून परिवर्तन विकास आघाडीच्या सौ. साधना अमोल मुरकुटे, सौ. अन्वी अनिरुद्ध केसरकर आणि सौ. शाहीन फरहान तकिलदार यांच्यात तर प्रभाग १४ मध्ये अभिषेक जयवंतराव शिंपी, सिद्धेश विलासराव नाईक आणि सूर्यकांत नामदेवराव नार्वेकर यांच्यात हाय व्होल्टेज लढत झाली आहे.

या दोन्हीही प्रभागांमध्ये विजयी उमेदवार व स्पर्धक उमेदवारांमध्ये दहा- पंधरा मतांच्या आसपासचा फरक राहील असे दिसते.

हत्ती आला रे ssss…
ऊसतोड सुरू असतानाच फडात घुसला हत्ती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लाटगाव (ता. आजरा) येथील सुर्यकांत सरदेसाई यांच्या उसाच्या फडात ऊसतोड सुरूच असताना टस्कर घुसल्याने समीर सरदेसाई यांच्यासह ऊस तोडणी कामगारांची चांगलीच धावपळ उडाली. टस्कराच्या भितीने ऊस तोडणी थांबवण्यात आली आहे. दरम्यान वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचल्यावर टस्कराला जंगलाच्या दिशेन हसकावून लावण्यात आले.

सुर्यकांत सरदेसाई यांचे गावापासून एक किलोमीटर अंतरावर बांधवाट नावाचे ऊसाचे शेती आहे. येथील शेतामधील ऊसाची तोडणी आज सुरु होती. सायंकाळी अचानक ऊसाच्या फडातून जोराचा आवाज येवू लागला. टस्कराच्या चित्काराने परिसर हादरून गेला. ऊस तोडणी करीत असलेल्या मजुरांना याची कल्पना नव्हती. अचानकपणे ऐकू आलेल्या हत्तीच्या चित्कारामुळे ते गर्भ गळीत झाले. हत्ती आला रे… म्हणत ते सैरावैरा पळून गेले. दरम्यान याच वेळी समीर सरदेसाई दुचाकीवरून ऊस तोडणी पाहण्यासाठी शेतात आले होते. त्यांना समोरून टस्कर येतांना दिसला. त्याचे राद्ररुप पाहून त्यांनी दुचाकी जागेवर टाकली व सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. याची माहीती वनविभागाच्या पथकाला कळवण्यात आली. वनपाल संदिप शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी टस्कराचा शोध घेतला. त्याला
जंगलाच्या दिशेन हुसकावून लावण्यात आले. टस्कराच्या भितीने ऊस तोडणी बंद करण्यात आली असून परिसरात भितीचे वातावरण आहे.

आजरा हायस्कूलमध्ये ‘मासिक पाळी’ विषयी जागरूकता आणि सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पगारिया वेलफेअर फाऊंडेशन, मुंबई आणि राष्ट्रीय सेवा योजना, आजरा महाविद्यालय, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले, तसेच मासिक पाळीच्या आरोग्याविषयी आणि स्वच्छतेविषयी माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेचेही वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीबद्दलची जागरूकता वाढवणे, गैरसमज दूर करणे आणि योग्य आरोग्य व स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. यासोबतच शैक्षणिक साहित्याचे वितरणही करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी पगारिया वेलफेअर फाऊंडेशन, मुंबई आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व आणि या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल समाजात असलेली भ्रामक कल्पना दूर करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी आजरा महाविद्यालय, आजराचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, डॉ. एस. के. चव्हाण, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. स्वप्निल जाधव, सहाय्यक प्रकल्पाधिकारी श्रीमती व्ही. एस. देसाई व श्रीमती व्ही. एस. जांभळे, आणि आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. एन. तोडकर, उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पोतदार यांनी केले तर आभार प्रा. रत्नदीप पवार यांनी मानले.

उत्तूरमध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध उपक्रम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर (ता. आजरा) इंदिरानगर येथील श्री दत्त पंत समर्थ मंदिर दिव्तीय वर्धापन दिन व दत्त जयंती निमित्त दि. २ ते ४ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रम होणार आहेत. यामध्ये प्रेम ध्वजारोहण, दत्त दिंडी, रांगोळी स्पर्धा, सामुहिक ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायण, दत्त मूर्ती अभिषेक व पूजा, सामुहिक पारायण, दत्त जन्मकाळ व पुष्पवृष्टी, हरिपाठ, कीर्तन सोहळा, सामुदायीक मंत्रोचार महाआरती, सामुदायीक दीपोत्सव, महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमामध्ये पंचक्रोशीतील भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री अवधूत भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आजऱ्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन


आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०२५-२६ अंतर्गत मौजे देऊळवाडी/सातेवाडी येथील शेतकऱ्यांची खरीप हंगाम भात पीक शेतकरी शेतीशाळा वर्ग क्रमांक ४ आजरा घनसाळ राईस मिल असोसिएशन एमआयडीसी आजरा येथे आयोजित करण्यात आला.

या शेतीशाळा वर्ग कार्यक्रमात महादेव पोवार, चेअरमन आजरा घनसाळ राईस मिल असोसिएशन आजरा,प्रदीप माळी मंडळ कृषी अधिकारी आजरा, खलील नाईक सुपरवायझर आजरा घनसाळ राईस मिल असोसिएशन आजरा,अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आजरा यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया वृत्त

निंगुडगे येथील अमृतेश्वर सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संभाजीराव सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी श्री बसवेश्वर शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला.

 

संबंधित पोस्ट

द्राक्षायणी आप्पासाहेब रोडगी यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका विवाहित तरुणाचा आकस्मिक मृत्यू.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!