सोमवार
२० जुलै २०२६


भटक्या कुत्र्यांनी घेतला ४२ जणांचा चावा..
आठ जणांना सर्पदंश
रस्त्यावर भटकी कुत्री तर बांधावर सापांचा उपद्रव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेती कामे वेगावली असतानाच सर्पदंशाचे प्रमाणही वाढले आहे. आठवडाभरात सात जणांना सर्पदंश झाला आहे, तर भटक्या कुत्र्यांनी ४२ जणांचा चावा घेतल्याची नोंद आजरा ग्रामीण रुग्णालयात झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागामध्येही भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांपासून होणारे हल्ले हे नित्याचे बनले आहेत. गेल्या आठ दिवसात तब्बल ४२ जणांचा चावा भटक्या कुत्र्यांनी घेतला आहे. हीच परिस्थिती सापांच्या बाबत आहे. खरिपाच्या घाईत असलेल्या शेतकरी वर्गाला सापांच्या दंशापासून स्वतःचा बचाव करण्याचे मोठे आव्हान शेतात काम करताना दिसू लागले आहे.
दरम्यान आजरा ग्रामीण रुग्णालयात सर्प दंश व रेबीज प्रतिबंधक औषधांचा पुरेसा साठा असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. असे प्रकार घडल्यास तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

रामतीर्थ परिसरात पर्यटकांची मांदियाळी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसात पावसामध्ये वाढ झाल्याने वर्षा पर्यटनासाठी रामतीर्थ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी दिसू लागली आहे. मध्यंतरी आठ-दहा दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर पुन्हा एक वेळ पावसाने जोर धरला असल्याने रामतीर्थ परिसराला भेट देण्यासाठी जिल्ह्यासह कर्नाटक व आजूबाजूच्या जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.
काल रविवारी विक्रमी संख्येने पर्यटक रामतीर्थ परिसरात आले होते. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.
आंबोली व्हाया रामतीर्थ…
आंबोलीकडे जाणारे पर्यटकही मोठ्या संख्येने रामतीर्थ परिसराला भेट देत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या गाड्यांची गर्दी परिसरात दिसू लागली आहे.

कुठली ही अन्याय निवारण समिती? नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचा सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्यातील अन्याय निवारण समिती केवळ स्टंट व प्रसिद्धी करुन मोठेपणा मिळवत आहे. सभागृहात सर्व विकास कामांच्या चर्चेत भाग घेऊन कामांना पाठिंबा दर्शवायचा आणि सभागृहाबाहेर भूमिका बदलायची असा प्रकार या समितीकडून सुरू आहे. समिती सदस्यांनी कधी निधी आणला नाही पण दुसऱ्यांनी केलेल्या कामांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत असा प्रकार सुरू असल्याची टिका नगराध्यक्ष अशोकण्णा चराटी यांनी पत्रकार परिषदेत करत कुठलीही अन्याय निवारण समिती ? असा सवालही उपस्थित केला..
चराटी म्हणाले, सभागृहामध्ये अन्याय निवारणचे दोन सदस्य आहेत. सभागृहातील चर्चेत ही मंडळी भाग घेतात. सर्वांनुमते निर्णय घेतला जातो असे असतानाही मंडळी नंतर सत्ताधाऱ्यांची बदनामी करतात. अधिकाऱ्यांवर दादागिरी करत ही मंडळी दबाव निर्माण करतात हे चूकीचे आहे. आता सुरु असलेली कामे मागील आहेत.यातील ८० टक्के कामे झाली आहेत.उर्वरित सुरु आहेत. सभागृहामध्ये येवून सहा महिने झाले.विकास कामांची आता सुरुवात आहे.जी कामे झाली ती मागील आहेत मात्र विनाकारण खापर फोडण्याचा प्रयत्न अन्याय निवारण करत आहे.आंदोलने करण्याचा त्यांना अधिकार आहे मात्र आंदोलन करताना त्यामागील सत्यताही तपासून घेणे आवश्यक आहे.अन्याय निवारणच्या वतीने जी नगरपंचायतीची बदनामी सुरु आहे ती थांबवावी असे चराटी यांनी सांगितले.
शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे.अनेक कामांचे नियोजन केले आहे.शहर एक माॅडल बनविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आरोग्याबाबतची प्रक्रिया मंजूरी पातळीवर आहे ते झाल्यानंतर आरोग्याबाबतचे प्रश्न निर्गत होणार आहे नगरपंचायतीच्या वतीने २ गाड्या व मंत्री आबिटकर ५ इलेक्ट्रिक गाड्या देणार आहेत त्यामुळे वेळेत कचरा उचलण्यासाठी अडचण येणार नाही. येत्या पाच वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
यावेळी नगरसेवक अनिकेत चराटी,परेश पोतदार यांच्यासह संजय चव्हाण,बाळ केसरकर,आरिफ खेडेकर, महेश खेडेकर,अश्विन डोंगरे, समीर चाॅंद उपस्थित होते.

डॉन बास्को सामाजिक संस्था गोवा यांचेकडून कानोलीत रेशन किटचे वाटप…..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डॉन बास्को सामाजिक संस्था, गोवा यांचे मार्फत गरीब, विधवा, परितक्त्या आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना रोजच्या वापरातील रेशन किटचे वाटप कानोली ( ता. आजरा ) येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील होत्या.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले, आणि या सामाजिक उपक्रमाबद्दल डॉन बास्को यांचे गावच्या वतीने आभार मानले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरूस्कर यांनी उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. कानोलीसह हारूर येथील कुटुंबानाही या किटचे वाटप करण्यात आले,
यावेळी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, शिवाजी पाटील, तानाजी पाटील हेमंत पाटील,सौरभ भोगण यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते..

निधन वार्ता
बंडु मगदूम

निंगुडगे ता. आजारा येथील बंडू गणपती मगदुम ( वय ८८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, दोन विवाहित मुले, जावई,नातवंडे असा परिवार आहे. येथील रामदास व रवींद्र मगदूम यांचे ते वडील होत.

देवस्थान इनाम जमीन धारक देवस्थान पुजारी व शेतकऱ्यांचा मुंबई येथे भव्य यलगार मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र व अखिल भारतीय गुरव समाज संघटना आयोजित देवस्थान इनाम जमीन धारक देवस्थान पुजारी व शेतकऱ्यांचा भव्य यलगार मोर्चा व धरणे आंदोलन २१ जुलै २०२६ रोजी
आझाद मैदान -मुंबई येथे होत असून यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन कांबळे शिवाजी गुरव व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
देवस्थान इनाम खालसा झालंच पाहिजे, कायदा त्वरित अमलात आला पाहिजे
या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे हा मोर्चा गांभीर्याने घेऊन सर्वांनी सहभाग नोंदवावा असेही गुरव यांनी म्हटले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २० जुलै २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (२१ जुलै पहाटे ०४.०२ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : हस्त नक्षत्र (सायंकाळी ०७.०९ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग : शिवा योग (सायंकाळी ०६.३६ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : गराजा करण (दुपारी 03:40 पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५० ते सकाळी
०९.२९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
विशेष सूचना
बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.
कांही वेळा ट्राफिक जाममुळे/सर्वर मधील अडथळ्यामुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
….मुख्य संपादक


