गुरुवार दि.१६ आक्टोंबर २०२५

वाय.बी. चव्हाण यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रवळनाथ कॉलनी/पेरणोली येथील श्री. यशवंत बाळासो उर्फ वाय.बी.चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवारी रात्री निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ५८ वर्षे होते.
जनता बँकेचे माजी अधिकारी असणाऱ्या चव्हाण यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यांना रात्री हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यावर गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवण्यात येत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
आजरा शहरामध्ये सामाजिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग रहात असे.

पावसाचा पुन्हा धिंगाणा
सुगी अडचणीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील शेतकरी वर्ग भात कापणी व मळणीच्या गडबडीत असताना पावसाने पुन्हा एक वेळ यामध्ये व्यत्यय आणला आहे. बुधवारी तालुक्यामध्ये ठीक-ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात सुरू असलेल्या हजेरीमुळे बळीराजाच्या सुगीवर पाणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळातच यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने वैरणीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सध्याही बहुतांशी शेतकऱ्यांची कापणी व मळणीची कामे सुरू आहेत.
मंगळवार पर्यंत उघडीप दिल्यानंतर बुधवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी हजेरी लावली. पावसाच्या या हजेरीमुळे आता मात्र शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. भागातील अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत कारखानेही गळीताच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे ऊस वाहतुकीची अडचण निर्माण होणार असल्याने गळीत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

स्मार्ट मीटर विषयावर आजरा येथे ग्राहकांची बैठक संपन्न
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या मागणीनुसार महावितरण विभागाची कार्यवाही
आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग गडहिंग्लज यांच्यावतीने नवीन स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
ही बैठक काल बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आजरा हायस्कूल परिसरातील आण्णाभाऊ सांस्कृतिक भवन येथे पार पडली. या वेळी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग गडहिंग्लज उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नागरिकांनी नवीन स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या भावना व तक्रारींचा आदर राखत, ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर बसविण्यात येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी, तसेच आजरा शहरातील अनेक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विद्युत पुरवठा, बिलिंग प्रणाली, तसेच तक्रार निवारण प्रक्रिया या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
यावेळी नागरिकांच्या प्रश्नासाठी पुढील काळातही नागरिकांच्या अडीअडचणीसाठी अन्याया विरोधात हा लढा सतत चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे कायम आपले पाठीशी राहील असा निर्धार अध्यक्ष बामणे भाऊजी यांनी व्यक्त केला .
बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुधीर कुंभार,बंडोपंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर,दत्तात्रय मोहिते यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.

आजरा कारखाना गळीताची तयारी पूर्ण : अध्यक्ष मुकुंदराव देसाई
बॉयलर अग्नीप्रदीपन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगामाची पूर्ण तयारी झालेली असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने मशनरी सज्ज झाली आहे. त्याचप्रमाणे ऊस तोडणी ओढणीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याकडे गाळपास पाठवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. बॉयलर अग्नीप्रदिपनापूर्वी कारखान्याच्या संचालिका सौ. मनीषा रवींद्र देसाई व त्यांचे पती रविंद्र रघुनाथ देसाई यांचे शुभहस्ते विधिवत होम हवन पूजा पार पडली.
यावेळी माजी चेअरमन वसंतराव धुरे, जेष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीरभाऊ देसाई, संचालक.. मधुकर देसाई, मारुती घोरपडे, अनिल फडके, दीपक देसाई, रणजीत देसाई, हरिभाऊ कांबळे, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, काशिनाथ तेली, रशीद पठाण, दिगंबर देसाई, संचालिका रचना होलम, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, जनरल मॅनेजर(टेक्नि.)एम. आर. पाटील, चीफ केमिस्ट सुजय देसाई, मुख्यशेतीधिकारी विक्रमसिंह देसाई, चीफ अकाउंटंट प्रकाश चव्हाण,खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कंत्राटदार व कर्मचारी उपस्थित होते.

उत्तूरचा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार का?
गावसभेत फक्त चर्चा,अंमलबजावणीचा पत्ता नाही !

उत्तूर :मंदार हळवणकर
‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो’ ही म्हण सध्या उत्तूरवासीयांना तंतोतंत लागू पडत आहे. गावातील मुख्य रस्ता जुने स्टॅन्ड ते नवीन स्टॅन्ड आणि भुदरगड पतसंस्था ते पाटील गल्ली कोपरा हा भाग आता पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाखाली गेला आहे. दुकानांचे फलक, छपऱ्या, रस्त्यापर्यंत ठेवलेला माल आणि काही ठिकाणी थेट रस्त्यावर लावलेले दुकानाचे खांब यामुळे मोठे रस्ते आता अरुंद झाले आहेत. त्यात भर म्हणजे बेशिस्त पार्किंग त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार रोजचेच झाले आहेत.
गावसभेत या विषयावर पाच मिनिटे चर्चा होते, पण त्यानंतर काहीही कृती होत नाही. त्यामुळे व्यापारी व वाहनचालक बिनधास्त झाले आहेत. अतिक्रमणाला सर्वांचा मूक पाठिंबा मिळतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.उत्तूर ही आसपासच्या बावीस गावांची बाजारपेठ, वैद्यकीय व शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जाते. मात्र, वाढती लोकसंख्या, वाढती वाहने आणि वाढणारी दुकानांची संख्या याचा विचार कुणीच करत नाही. विकास म्हणजे फक्त ठराविक कामे अशी संकुचित कल्पना झाली असून इतर मूलभूत गोष्टींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावातून एस.टी. सेवा हवी अशी मागणी होत असली तरी एस.टी.ला जाण्यासाठी रस्ताच शिल्लक नाही, हे कोणी मान्य करायला तयार नाही. दोन वाहनांमुळे रस्ता बंद होतो, पार्किंगची सोय नाही, परिणामी बाहेरगावचे लोक गावात खरेदी न करता थेट शहराबाहेरच्या बाजारात वळतात ही वस्तुस्थिती आहे.अतिक्रमणाचे लोण आता सर्वत्र पसरत असून उत्तूरसारख्या मोठ्या गावात पार्किंग सह बाजारपेठेत नियोजनाची अत्यंत गरज भासत आहे.
विशेष म्हणजे, गावातील काही मंदिरांच्या समोर खासगी पार्किंग कायमस्वरूपी केलेले दिसते. या बेकायदेशीर पार्किंगवरही प्रशासन मौन बाळगते, हे अधिक चिंताजनक आहे. ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी ठोस पावले उचलली नाहीत, तर उत्तूरचा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेण्याचं स्वप्न केवळ कागदावरच राहील.

खानापूर ग्रामपंचायतीला विभागीय मूल्यमापन समितीची भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या खानापूर ग्रामपंचायतीला विभागीय आयुक्त कार्यालय पुणे कडील विभागीय मूल्यमापन समितीने भेट देऊन ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचे मूल्यमापन केले.यावेळी सदर समितीच्या अध्यक्षा श्रीमती दिपाली देशपांडे अप्पर आयुक्त (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय पुणे रवींद्र कणसे , सहाय्यक आयुक्त (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, श्री शैलेश सराफ सहाय्यक प्रशासन अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे व श्री विशाल ब भुरकुडे, कनिष्ठ सहाय्यक आयुक्त कार्यालय पुणे यांनी खानापूर गावात केलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांची व दप्तरी कामाची पाहणी केली.
यावेळी सौ.माधुरी परीट , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) जिल्हा परिषद कोल्हापूर श्री. सुभाष सावंत गटविकास अधिकारी (वर्ग १) पंचायत समिती आजरा,श्री.बी. टी. कुंभार,विस्तार अधिकारी पंचायत समिती आजरा श्री.निशांत कांबळे जिल्हा समन्वयक, श्री. सर्जेराव घाटगे तालुका समन्वयक त्याचबरोबर आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभागा कडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खानापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केलेल्या विविध कामांची माहिती खानापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कल्पना डोंगरे, उपसरपंच श्री आनंदा राणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री विशाल दुंडगेकर,ग्रामपंचायत सदस्य श्री.विश्वास जाधव, श्रीमती माधुरी गुरव, सौ.अलका चव्हाण, सुशीला जाधव यांनी दिली. सदर समितीच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघामार्फत दिले जाणारे “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” आजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांच्यासह कोल्हापुर जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांना पुरस्कार सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी प्रा.बी.एस.पाटील सचिव,प्रा.पुंड सी.व्ही.,प्रा.सी.व्ही जाधव,प्रा.गुरबे एस.व्ही.,प्रा.पी.डी.पाटील,प्रा.सी.एम.गायकवाड जिल्हा संघाचे उपाध्यक्ष प्रा.विठ्ठल नाईक, प्रा.विजय मेटकरी, खजानिस प्रा.संग्राम पाटील, प्रा.विनायक चव्हाण, प्रा.बी.आरपाटील, प्रा.एच.बी.जवळे, प्रा.राहुल बुनाद्रे, प्रा.पी.बी. रक्ताडे, प्रा.निळकंठ एस.एम., प्रा.सौ. रश्मी यादव उपस्थीत होते.
निधन वार्ता
विठू जोशीलकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आल्याचीवाडी या. आजरा येथील विठू आप्पा जोशीलकर ( वय ७८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सूना,नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष जोशीलकर व शिक्षक सुधाकर जोशीलकर यांचे ते वडील होत.


