रविवार दि.१२ आक्टोंबर २०२५


काजू प्रक्रिया कारखान्यामधून एक लाख ८२ हजार यांचे काजूगर लंपास

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होन्याळी ता. आजरा येथील भरतेश्वर देशभूषण देशमाने यांच्या मालकीच्या नारायण ॲग्रो इंडस्ट्रीज या काजू प्रक्रिया कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ८२ हजार ५०० रुपयांचे तयार काजूगर लंपास केले.याबाबतची फिर्याद देशमाने यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारखान्याचा दरवाजा उचकटून कारखान्यातील २४० किलो तयार काजूगर लंपास केले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी भेट दिली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

कानोली विकास सेवा संस्थेची ७५ वर्षांची वाटचाल गौरवास्पद : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कानोली विकास संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच कानोली ता. आजरा येथील कानोली सहकारी विकास सेवा संस्थेची स्थापना झाली. कानोलीसारख्या छोट्याशा गावात स्थापना होऊनही गेल्या ७५ वर्षांची या संस्थेची वाटचाल गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या संस्थेने शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत- जास्त कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जावं, असेही ते म्हणाले.
कानोली ता. आजरा येथील कानोली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी दोनच वर्षे झाली असताना या गावातील लोकांना एखाद्या विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतीला अर्थपुरवठा करता येईल असं वाटलं. त्या विचारातूनच या संस्थेचा जन्म झाला. कै अमृतकाका देसाई यांनी ही संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्य केले. एवढ्या छोट्याशा गावात आजघडीला दीड कोटी रुपयांचा अर्थपुरवठा होत आहे. दीड लाख नफा आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ९९ टक्के वसुली आहे. या बाबी कौतुकास्पदच आहेत. अशा सर्वच विकास सेवा संस्थांच्या पाठीशी केडीसीसी बँक हिमालयासारखी उभी राहील. केडीसीसी बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शेतकरी कल्याणाच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करा, असेही ते म्हणाले.
आजरा तालुका कागल विधानसभा मतदारसंघात यावा…!
भाषणात केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, आजरा तालुक्यातील उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघ मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्या कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहे. या जिल्हा परिषद मतदार संघात कानोलीसह सुलगाव, चांदेवाडी, मुंगूसवाडी, खेडे, हजगोळी बुद्रुक, हाजगोळी खुर्द, पेद्रेवाडी, कोवाडे, निंगुडगे, गजरगाव, सरोळी ही गावे अलीकडेच समाविष्ट झालेली आहेत. विधानसभा मतदारसंघांच्या नव्या पुनर्रचनेत येत्या विधानसभा निवडणुकीला आजरा तालुका मंत्री मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट व्हावा, म्हणजे या भागाचे नंदनवन होईल.
कार्यक्रमात कानोली विकास सेवा संस्थेच्या संचालक मंडळासह सभासदांचा सत्कार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाला. तसेच; युवा नेते अनिकेत कवळेकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार झाला.
यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सरपंच माजी सरपंच राजेंद्र मुरकुटे यांची भाषणे झाली.
कार्यक्रम प्रसंगी गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, अल्बर्ट डिसोजा, अनिल फडके, सुभाष देसाई,एम.के.देसाई, दौलती पाटील, दिगंबर देसाई, रशीद पठाण हरिबा कांबळे, काशिनाथ तेली, दीपक देसाई, शिवाजी नांदवडेकर, गोविंद पाटील, मधुकर येलगार, विठ्ठल देसाई,उत्तम रेडेकर, मनोहर जगदाळे, अनिकेत कवळेकर, संतोष चौगुले विश्वास निंबाळकर, केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे , संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण देसाई, परशुराम आपगे, सुधीरकुमार पाटील, संभाजी आपगे, बाबुराव पाटील, राजेंद्र पाटील, विलास मुरकुटे, श्रीपतराव देसाई, पांडुरंग भोसले, रमेश भोगण, मारुती पाटील, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्वागत माजी सरपंच व आजरा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मुरकुटे यांनी केले. प्रास्ताविक परशुराम आपगे यांनी केले. सूत्रसंचालन जनार्दन बामणे यांनी केले. आभार पंडित पाटील यांनी मानले.

निधन वार्ता
देवजीभाई पटेल

आजरा येथील देवजीभाई राजाभाई पटेल (वय १०० वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे
आजरा येथील ज्येष्ठ व्यापारी मुळजीभाई (बुधुभाई),पुरुषोत्तमभाई ,तुलसीभाई यांचे ते वडिल होत.
रक्षा विसर्जन उद्या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आजरा येथे आहे.
शालू बारदेस्कर

धनगरमोळा येथील शालू परसु बारदेस्कर
( वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुन, नातवंडे. दोन विवाहीत मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य मायकल बारदेस्कर/ फर्नांडिस यांचे ते वडील होत.
शंकर खवरे

वेळवट्टी ता. आजरा येथील शंकर भागोजी खवरे ( वय ७५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले,दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
ते आजरा पंचायत समितीचे सेवानिवृत्त शिपाई होते.

पोश्रातवाडी येथून बांधकाम साहीत्य लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोश्रातवडी येथे नरसु बाबु शिंदे यांच्या गट नं. १२४ येथून सिमेंटची पोती,शेडनेट जाळे, लोखंडी सळी असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी आजरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.
पुन्हा पावसाने झोडपले
आजरा शहर व परिसराला शनिवारी दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपले. या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची मोठी अडचण होऊ लागली आहे भात कापणीसह मळणीची कामे वेगावली असतानाच पाऊस जोरदार हजेरी लावत असल्याने सुगीमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत.

जनता गृहतारण संस्थेकडून पूरग्रस्त निधी सुपूर्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठवाडा-विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवित व वित्त हानी अपरिमित झाली आहे. लोकांचे संसार उद्धव झालेत. अन्न – धान्याची, चा-याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा वेळी आपल्या बांधवाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे परम कर्तव्य आहे. याच उदात्त भावनेतून पूरग्रस्तांना जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखाचा धनादेश आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी हा धनादेश दिला.
यावेळी बोलतांना ना. प्रकाश आबिटकर म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती, संस्था संघटनानी उभे राहण्याची गरज आहे, हे ओळखून आपल्या आजरा येथील जनता गृहतारण संस्थेने मदतीचा हात पुढे केला, अनेक सहकारी व सामाजिक संस्थासाठी हा आदर्श आहे. संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक बाचूळकर, संस्थेचे संचालक व गारगोटी शाखेचे चेअरमन आनंद चव्हाण, व्हाईस चेअरमन डॉ. संजय देसाई, संचालक महादेव मोरुस्कर, सत्यजित चोरगे, रणजित पाटील, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.

व्यंकटराव मध्ये “ग्रीन डे” व ,”अर्थ मिनिट ” निमित्त प्रतिज्ञा व प्रभात फेरी संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज ग्रीन डे व अर्थ मिनिटनिमित्त शासनाच्या आदेशानुसार व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे या संदर्भात माहिती श्री एस वाय भोये यांनी दिली. तसेच प्राचार्य श्री. एम.एम. नागुर्डेकर यांनी पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी आपण व आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. जवळच्या अंतरापर्यंत शक्यतो चालत जाणे दूरच्या पल्ल्यासाठी शक्य तितक्या वेळेला एसटी बस अशा मोठ्या वाहनांचा प्रवासासाठी वापर केले पाहिजे. सायकलचा वापर करणे अंगीकृत केले पाहिजे त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. व शक्य तितक्या प्रमाणात विजेचा काटकसरीने वापर केला पाहिजे. याबाबत माहिती सांगितली.
एनसीसी ऑफिसर श्री.एम.एस.पाटील यांनी पर्यावरण पूरक ग्रीन डे प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली.
यानंतर विद्यार्थ्यांनी आजरा शहरामध्ये फेरी काढून घोषणा देत जनजागृती केली.य फेरीला आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.सुभाष सावंत आणि त्यांचे अधिकारी यांनी भेट दिली.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही
जे.शेलार,सौ.व्ही.ए.ववळेकर, सौ.ए.एस.गुरव, श्री.कृष्णा दावणे, सौ. एस.डी. इलगे , श्रीम.एन.ए.मोरे, श्री. व्ही.एस.गवारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पूरग्रस्त शाळेला हेल्पिंग हँड्स फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिंदखेड/सोलापूर येथे पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या सिंदखेड परिसरातील मराठी शाळेला हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त परिस्थितीत या शाळेला मदतीची अत्यंत गरज होती. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेत ४० डझन वह्या, पेन, कंपास किट, व इतर शैक्षणिक साहित्य पोहोचवले.
या उपक्रमास स्थानिक नागरिक, शिक्षक व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘हेल्पिंग हँड्स फाउंडेशन’ दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवत असते. मात्र यंदा मराठवाड्यातील पूरस्थिती पाहता संस्थेने आपला वार्षिक शैक्षणिक उपक्रम पूरग्रस्त भागात राबवण्याचा निर्णय घेतला आणि ही मदत खऱ्या अर्थाने गरजूंना पोहोचली.


