सोमवार ३० जून २०२५


पाऊस आला मोठ्ठा…
ठेकेदार ठरला खोटा…
पहिल्याच पावसाने शहरातील विकास कामांची दुर्दशा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मान्सूनपूर्व पावसासह मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील विकास कामांमधील पितळ उघडे पडले असून यामुळे विकास कामे करणारे ठेकेदार, त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी, बिले मंजूर करणारे अधिकारी या सर्वांचाच एकंदरीत कारभार चव्हाट्यावर आला आहे.
जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील स्वच्छता, गटर्स व रस्ते बांधकाम, नवीन पाणीपुरवठा योजनेचा उडालेला बोजवारा सर्वच काही पावसामुळे शहवासीयांसमोर आले आहे.
अद्यापही सुमारे अडीच महिन्यात त जोरदार पावसाची अपेक्षा आहे. जून महिन्यातच जर विकास कामांची अशी अवस्था झाली असेल तर पुढच्या अडीच महिने चिखल पाण्याची डबकी व अस्वच्छतेमुळे आरोग्य विषयक प्रश्न गंभीर होणार हे निश्चित.
शहरातील उपनगरात तर चिखल आणि दूषित पाणी यामुळे रहिवासी जेरीस आले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेत झालेली खुदाई, चिखल व खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापारी वर्गासह तालुकावासीयांचे प्रचंड हाल होत आहेत.
भाजी मार्केटमध्ये पत्र्याचे शेड उभा केले आहे. पावसापासून भाजी विक्री त्यांची सुटका झाली असा समज असतानाच या शेडमधून परस्पर पाणी बाहेर जाण्याकरता कोणतीच व्यवस्था नसल्याने वर पत्रे परंतु बैठकीच्या ठिकाणी पाणीच पाणी अशी अवस्था होत आहे.
एकंदर पावसाने ठेकेदारांच्या कामावर बोट ठेवण्यास भाग पाडले आहे.


एकाच शेतात हत्तीचा पंधरा दिवस धुमाकूळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले पंधरा दिवस टस्कर घाटकरवाडी (ता. आजरा) येथील शेतकरी रामचंद्र मटकर यांच्या शेतात धुडघुस घालत आहे. त्यांने ऊसासह भाताचे तरवे फस्त केले आहेत. डोळ्यासमोर पिक उध्वस्त होत असल्याने शेतकरी मटकर व त्यांची कुटुंबीय वैतागून गेले आहे. शासनाने आता सांगावे आम्ही कसं जगायचं ? असा उद्धिग्न सवाल उपस्थित केला आहे.
दोडामार्ग परिसरात असलेला टस्कर घाटकरवाडी, धनगरमोळा परिसरात आला आहे. या टस्कराने ऊस, बांबू पिकावर ताव मारत डोळ्यांदेखत नुकसान करत आहे. घाटकरवाडीतील शेतकरी रामचंद्र मटकर यांच्या शेतात तो गेले पंधरा दिवस उतरत आहे. त्यांने मटकर यांचा ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचबरोबर भाताचे तरवे त्यांने फस्त केले आहेत. मटकर यांना भाताची रोपलावण कशी करावयाची याची चिंता लागून राहीली आहे. टस्कराचा उपद्रव कमी होत नसल्याने मटकर वैतागले आहेत. वनविभागाने शेती ताब्यात घ्यावी. शेतीचे वार्षिक उत्पन्न द्यावे अशी मागणी केली आहे.

साळगाव येथे गव्याच्या हल्ल्यात मृत वारसांना माजी सैनिकाकडून मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव ता आजरा येथे गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेले शेतकरी धोंडीबा व्हळतकर यांच्या वारसांना जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लज व चितळेचे उपसरपंच उदयसिंह सरदेसाई यांच्याकडून १०००० रू.ची आर्थिक मदत करण्यात आली.
व्हळतकर यांचा ३ मे रोजी शेतात गव्या रेड्याच्या हल्ल्यात मृत्यु झाला होता.तसेच महिन्याभरात त्यांचा मुलगा चंद्रकांत व्हळतकर यांचेही निधन झाले.दोन्ही कर्ते पुरुष एकापाठोपाठ गेल्याने व्हळतकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी मदत केल्याचे सरदेसाई व गडहिंग्लज सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरपंच धनंजय पाटील,विश्वास व्हळतकर, रामकृष्ण शेंडे, अमोल पाटील,भरत येळ्ळूरे,धनाजी चव्हाण,बाळु पोवार आदी उपस्थित होते.

उत्तुर येथे रक्तदान शिबीर उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुप,उत्तूर व कै. मुकुंदराव दादा आपटे फौंडेशन उत्तूर यांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले.
या शिबिरामध्ये ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिराचे उदघाटन जि. प. सदस्य मा श्री उमेश आपटे, सरपंच किरण आमनगी , ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संजय उत्तूरकर,भैरू कुंभार,मिलिंद कोळेकर,बाळू सावंत व लेखक प्रकाश नावलकर यांच्या हस्ते झाले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संग्राम घोडके, वैभव सावंत,सत्यजित देसाई,अमित येसादे,ओंकार उत्तूरकर,विनय उत्तूरकर,वेदांत मोरे,सतीश चोरगे,विजय वांद्रे,तुषार रावळ, अमोल बांबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नदीकाठच्या शिवारात रोप लावणीला सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात नदीकाठाच्या शिवारात कृषी पंपाच्या सहाय्याने भात रोप लागणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
नदीकाठाच्या शिवारात मे महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे पेरले होते. मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाला सुरवात झाल्याने तरवे रोप लागणीसाठी लवकर आले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तरवे तरारले होते.
कृषी विद्युत पंपाच्या सहाय्याने रोप लागणीत शेतकरी मग्न झालेला असताना माळरानावरील शेतातील तरव्यात पाणी साठले आहे. हे तरवे उगवण्यास अडचण येणार असल्याने रोप लागणीलाही विलंब लागणार आहे.
तरवे कुजले… वाहूनही गेले…ओला दुष्काळ जाहीर करावा
तालुक्यात सर्वच भागातील माळरान व डोंगराकडील भागातील तरवे कुजले आहेत तर काही वाहूनही गेले आहेत.दुबार पेरणी करूनही उपयोग झालेला नाही. विशेषतः पश्चिम भागात अवस्था बिकट आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

पायल मोरबाळे व श्री. व्ही. ए. पोतदार यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ कोल्हापूर आयोजित जिल्ह्यातील इयत्ता दहावी मध्ये मराठी विषयात ९६ पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा नुकताच कोल्हापूर येथे संपन्न झाला.
आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी पायल अनिल मोरबाळे हिने मराठी विषयात ९६ गुण मिळवून सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान मिळवला. तिला शाळेतील मराठी विषय शिक्षक श्री. व्ही. ए. पोतदार यांनी मार्गदर्शन केले. मराठी विषयात तालुक्यात ९० पेक्षा जास्त गुण मिळवणारे ४७ विद्यार्थी देखील याच शाळेचे आहेत याबद्दल कोल्हापूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते यांचा सत्कार संपन्न झाला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस. पी. होलम, उपमुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर, पर्यवेक्षिका सौ. एच. एस. कामत यांचे मार्गदर्शन लाभले.

संवेदना फाऊंडेशन मार्फत आजऱ्यातील अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सालाबादप्रमाणे पं. दिनदयाळ विद्यालय आजरा येथे कै.भूषण गुंजाळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना भूषण टिम प्रमुख श्री. संजय हरेर होते तर प्रमुख पाहुणे श्री परशुराम बामणे, अध्यक्ष अन्याय निवारण समिती आजरा व श्री. संजीव देसाई मुख्याध्यापक दिनदयाळ विद्यालय आजरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.तानाजी पावले सर यांनी करून संवेदना कार्याचा आढावा दिला. कै. भूषण गुंजाळ स्मृतिदिनानिमित्य भूषण गुंजाळ मित्र मंडळ व संवेदना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा तालुक्यातील आई वडिल दोन्हीही हयात नसलेल्या इ. १ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नित्योपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये १७ अनाथ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व मोफत वैद्यकिय आरोग्य तपासणी , औषधोपचार संवेदना डॉक्टर टीम व मेडिकल असोसिएशन आजरा यांच्या मार्फत करण्यात आले. आतापर्यंत हा कार्यक्रम आजरा तालुका मर्यादित होता. मात्र चालू वर्षापासून अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आजरा तालुक्याबरोबरच चंदगड, गडहिंग्लज व भुदरगड याही तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी गडहिंग्लज तालुका संवेदना प्रतिनिधी श्री. एम. ए. पाटील सर तसेच चंदगड संवेदना प्रतिनिधी श्री. अजित गणाचारी व श्री. गोपाळ गडकरी श्री सुधीर कुंभार संचालक, दिनदयाळ विद्यालय, संवेदना सदस्य श्री. कृष्णा खाडे , श्री. जीवन आजगेकर , अन्याय निवारण समितीचे सर्व सदस्य, पालक ,विद्यार्थी उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री तानाजी पावले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संवेदना सचिव श्री.संतराम केसरकर यांनी केले.



