mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि.१० जून २०२५       

धनगरमोळा सुळेरानमध्ये हत्तीचे पुनरागमन…
नुकसान सत्र सुरू

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गेले चार महिने पश्चिम विभागातून गायब झालेला हत्ती पुन्हा एक वेळ सूळेरान- धनगरमोळा परिसरात दाखल झाला आहे. हत्तीच्या या पूनरागमनाने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

      गेले दोन दिवस हत्तीकडून उसासह केळी व इतर पिकांचे नुकसान सुरू आहे. बाळकृष्ण बाबुराव पाटील, संभाजी शंकर पाटील, जयवंत डेळेकर, राजाराम पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या ऊस व केळी पिकांचे नुकसान केले आहे. वनविभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

शेती कामावर मर्यादा…

     एकीकडे खरिपाच्या गडबडीत शेतकरी वर्ग असताना हत्तीचे आगमन झाल्याने शेती कामावर मर्यादा येणार आहेत.आता पावसाळाभर हत्तीच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

शरद पवार यांच्या पुढाकारामुळे वन हक्काचे प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा…
पुणे येथे विविध संघटनांची बैठक

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      प.महाराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर येथील आदिवासी बिगर आदिवासी समूहाचे वन हक्काचे प्रश्न समजून घेण्यासाठी पुणे येथे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आदिवासी विकास केंद्रामार्फत जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रतिभा शिंदे, कॉ.संपत देसाई, दत्ता बाळसराफ, प्रकल्प सहसंचालक प्रदीप देसाई,अशोक आढाव, शोभा कारंडे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

      सुरुवातीला प्रतिभा शिंदे यांनी प्रास्तविक करून बैठकीमागचा उद्देश सांगितला. वैयक्तिक आणि सामूहिक प्रश्न समजून घेणे. काम करणाऱ्या सर्व संस्था संघटनांची व्यापक आघाडी करणे आणि हा प्रश्न पुढे घेऊन जाणं हा बैठकीचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

      कॉ. संपत देसाई म्हणाले, प.महाराष्ट्र आणि कोकण विभागात वन हक्काचे वैयक्तिक आणि सामूहिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रशासनाकडून त्याला म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात तर एकही कम्युनिटी फॉरेस्ट राईटच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. बेळगाव परिसरात वन हक्काचे दावे मराठी भाषिक लोकांचे असल्याने कानडी प्रशासकीय अधिकारी मदत करत नाहीत. यासंदर्भात चर्चा होऊन आपण काहीतरी ठरवण्यापर्यंत जायला हवे.

     सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी आपण याबाबत वन मंत्री यांच्यासोबत बोलतो, स्थानिक आणि धोरणात्मक प्रश्न वेगळे काढून दोन वेगवेगळ्या बैठका घेऊ असे म्हणून त्यांनी ताबडतोब सुटणारे प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीतूनच पुणे विभागीय आयुक्तांना फोन करून दहा पंधरा दिवसात बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वन मंत्री यांच्याशीही संपर्क करून बैठक बोलवावी असे सांगितले.

     जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री यांनी या प्रश्नी विशेष लक्ष घातल्याने वन हक्काचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता तयार झाली आहे.

      यावेळी अशोक आढाव, राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर, किरण लोहकरे, शोभा कारंडे, नामदेव गंभीरे, मनीषा पाटील यांनीही अनेक सूचना मांडल्या. यावेळी प.महाराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर विभागातील पन्नास हुन अधिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

दुग्ध व व्यवसायातील आर्थिक बाबी व बारकावे समजावून घ्यावेत : चेतन नरके

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शेती पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची ओळख आहे. या व्यवसायातील आर्थिक बाबी व बारकावे समजावून घ्यावेत. जातीवंत जनावरे, त्यांचे आरोग्य व चारा व्यवस्थापन हे काळजीपुर्वक केल्यास शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात. असे प्रतिपादन गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी केले.

       येथील डॉ .जे. पी. नाईक सांस्कृतिक सभागृहात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना यांच्यावतीने दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन मेळावा झाला. दुध व्यवसायातील समस्या व आव्हाने या विषयावर श्री. नरके यांनी मार्गदर्शन केले. गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, कॉ. संपत देसाई प्रमुख उपस्थित होते.

      नरके म्हणाले, जिल्ह्याच्या ग्रामिण अर्थकारणाला दुग्ध व्यवसायाने चालना दिली आहे. हा व्यवसायासाठी प्रत्येक शेतकऱ्यांने दररोजचे नियोजन केले पाहीजेत. यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. जातीवंत जनावरे खरेदी करण्याबरोबर त्यांचे आरोग्य, चारा व्यवस्थापन तितकेच महत्वाचे आहे. बेरोजगार युवकांना हा व्यवसाय किफायतशीर आहे. त्यांनी एकत्रीत येवून गटशेती करावी. कृषी कंपनी स्थापन करून पशुपालन करावे. संचालिका श्रीमती रेडेकर यांनीही मार्गदर्शन केले. शेतकरी, दुधउत्पादकांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. नरके यांनी उतरे दिली.

      यावेळी कृष्णा येसणे, ओमकार माद्याळकर, दयानंद भोपळे, दिनेश कांबळे, पांडुरंग सरदेसाई, संजय देसाई, डॉ. धनाजी राणे, आनंदा कुंभार, महादेव सुतार, महादेव होडगे, संजय सावंत, तातुअण्णा बटकडली, सुनिल सरदेसाई, सरिता कांबळे, गंगाराम डेळेकर, बाळू आगा यांच्यासह दुध उत्पादक उपस्थित होते.

      उपतालुका प्रमुख संजय येसादे यांनी आभार मानले.

सेवानिवृत्त पोलीस बांधवांचे आझाद मैदानावर न्याय मागण्यांचे निवेदन आंदोलन

.               मुंबई : विशेष प्रतिनिधी

      राज्यातील सेवानिवृत्त व कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित न्याय मागण्या संदर्भात आझाद मैदान, मुंबई येथे सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी शिखर संस्थेच्या (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) वतीने अध्यक्ष श्री संपतराव जाधव यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भव्य असे निवेदन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राज्यभरातून सुमारे २ ते ३ हजार सेवानिवृत्त पोलीस बांधव सहभागी झाले होते. गृह व वित्त विभागाशी निगडित विविध प्रलंबित मागण्यासाठी हे आंदोलन शांततेत पार पडले.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:-

      एस १४ वेतनश्रेणी लाभ मिळावा,सेवानिवृत्ती नंतर पेन्शन विक्री रकमेच्या परतफेडीचा अन्यायी कालावधी कमी करावा, तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या पोलिसांना एक जुलैची वेतन वाढ फरकासह त्वरित लागू करावी,सेवा कालावधीतील अर्जित रजेचा फरक मिळावा, कार्यरत पोलिसांप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांनाही वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा,कार्यरत पोलिसांची ड्युटी आठ तास करावी, सुधारित आस्वासीत प्रगती योजना १०.२०.३० प्रमोशन अंमलबजावणी त्वरित सुरू करावी. डीजी लोन योजना पुन्हा सुरू करावी,राष्ट्रपती पोलीस पदक धारकांसाठी आर्थिक योजना राबवाव्यात इत्यादी. सेवानिवृत्त व कार्यरत पोलिसांच्या विविध न्याय मागण्यांबाबत यापूर्वी वेळोवेळी निवेदने/ आंदोलन/चर्चा करूनही, आश्वासनाच्या पलीकडे कोणताही ठोस निर्णय शासनाकडून झाला नाही. पोलीस दलाच्या वतीने हे पहिलेच मोठे आंदोलन असून काही मागण्यां बाबत न्यायालयीन निर्णय झाले असूनही शासनाने अद्याप कृती केली नसल्याने न्याय निर्णयाचा अवमान होत असल्याचेही यावेळी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तरीही शासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

      आंदोलनामध्ये शिखर संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव, उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी पेठे , सुभाष तोडकर,रविद्र कामटे असे पदाधिकारी यांचेसह विविध जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, सभासद यांचेसह कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष नजीर पटेल, उपाध्यक्ष बाळासाहेब आंबी, सचिन दत्तात्रय कौलवकर, खजानिस तानाजी सकटे आदी ३० ते ३५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह एकूण सुमारे ३००० ते ३५०० सेवानिवृत्त पोलीस बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

छायावृत्त

      आजरा शहरांमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवप्रतिष्ठान,सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवमूर्ती अभिषेक व नित्व पुजन शिवतीर्थ आजरा येथे करण्यात आले. साखर पेढे वाटप, देवदर्शन पदयात्रा पार पडली. शिवतीर्थ येथे देवदर्शन पदयात्रेची सांगता ध्येयमंत्र शिवसुर्यहदय श्लोकाचे सामुहिक पठण करून करण्यात आली.यावेळी शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

फोटो क्लिक…

कोरोना अलर्ट 

      कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची एकूण रुग्ण संख्या २८ झाली असून, त्यातील ११ जण सध्या सक्रिय रुग्ण आहेत.२८ पैकी तब्बल १६ रुग्ण हे कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!