mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रवीवार दिनांक ६ एप्रिल २०२५

स.पो.नि.अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा ९ वर्षांनी निकाल ; अभय कुरूंदकर /महेश फळणीकर दोषी

     पनवेल/मुंबई : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व त्याचा मित्र महेश फळणीकर हे आजरा तालुक्यातील असल्याने आजरा तालुक्याचेही या प्रकरणाकडे लक्ष लागून होते. बऱ्याच वेळा आजरा तालुक्यामध्ये तपासी पथकाने भेट देऊन कुरुंदकर आणि फळणीकर यांच्या स्थावर मालमत्तेची झाडाझडती घेतली होती.

       याप्रकरणी पुढील शुक्रवारी ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. याप्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपध्दतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

      अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई केली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते. उच्च न्यायालयाने अश्विनी बिंद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

      ११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिंद्रे हिची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणा अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली होती. अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह वसई खाडीत टाकण्यात होता. मात्र शेवटपर्यंत त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले नव्हते.

अभय कुरुंदकर दोषी असल्याचे निष्पन्न

पनवेल येथील सत्र न्यायालयाचे शनिवारी अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात आरोपी व सरकारी पक्षाच्या वकिलांसह मोठ्या प्रमाणात गर्दी हो. न्यायाधिश कृ. प. पालेदवार यांच्या यांच्यासमोर सरकारी वकिलांनी तब्बल ८० विविध व्यक्तींची साक्ष नोंदवली. त्यानंतर शनिवारी न्यायालयाने या हत्या प्रकरणाचा निर्णय जाहीर केला. बिंद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर याला न्यायालयाने हत्या आणि कट रचणे तसेच बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याप्रकरणी दोषी जाहीर केले. या प्रकरणातील क्रमांक २ चा आरोपी राजू उर्फ ज्ञानदेव पाटील याला दोष सिद्ध न झाल्याने दोष मुक्त करण्यात आल्याचे सुद्धा न्यायाधिशांनी सांगितले.

       या प्रकरणातील अन्य आरोपी महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी या दोन्ही आरोपींचा हत्येमधील सहभाग निष्पन्न झाला नाही. मात्र या दोन्ही आरोपींना हत्येमधील पुरावे नष्ट करण्यासाठी कुरुंदकर याला मदत केल्याचे दोषी सिद्ध झाल्याचे. ११ एप्रिल रोजी या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारी वकिल म्हणून प्रदीप घरत यांनी काम पाहीले. बचाव पक्षाचे वकिल म्हणून ॲड विशाल पाटील यांनी युक्तिवाद केला.संगिता अल्फान्सो यांनी या प्रकरणाचा तपास केला.

पोलिसांवर ताशेरे

न्यायालयाने याप्रकरणात पोलिसांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले. संपूर्ण निकालाचे निरिक्षक नोंदवताना नवी मुंबई पोलिसांनी आश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यापासून ते हत्येचा गुन्हा नोंदविण्यास केलेल्या टाळाटाळ, आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यास लावलेल्या दिरंगाईमुळे पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी कुरुंदकर यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्टेशन डायरीमध्ये नोंदवलेल्या चुकीच्या वेळेमुळे या प्रकरणात कुरुंदकरचा बनाव उघड झाला. करुंदकर याचे नाव राष्ट्रपदी पदकासाठी शिफारस करण्यात आले होते. तसेच पदोन्नतीच्या यादीतही त्याचे नाव होते. याबाबत न्यायालयाने संताप व्यक्त केला. या प्रकरणी सरकारी वकिलांतर्फे पोलिसांकडून झालेल्या हलगर्जीपणा केल्यामुळे खातेनिहाय चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

प्रेमसंबंध, लग्नाचा तगादा म्हणून हत्या

अश्विनी बिद्रे पोलिस दलात २००५ साली रूजू झाल्या होत्या. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली होती. पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अश्विनी व अभय कुरूंदकर हे दोघेही त्यापूर्वीच विवाहित होते व त्यांना पत्नीसह मुले होती. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे तिने पती राजू गोरे सोबतचे संबंध तोडले. अश्विनीला पती राजू गोरे पासून एक मुलगी आहे.. अश्विनीने अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचेच नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव रचला.

      यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले व अश्विनीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिज मध्ये ठेवले होते. कुरूंदकरला याप्रकरणात राजू पाटील आणि कारचालक कुंदन भांडारी यांनी साथ दिली. महेश फळणीकर व राजू पाटीलच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकून विल्हेवाट लावली. अश्विनी यांची हत्‍या केल्‍यानंतर त्‍या जिवंत आहेत, असे भासवण्‍यासाठी कुरूंदकरने अश्‍विनी यांच्‍या मोबाईलवरून मेहूणे अविनाश गंगापूरे यांना व्‍हॉट्सअपवर संदेश पाठवला होता. मानसिक अस्‍वास्‍थ्‍यामुळे आपण उपचार घेण्‍यासाठी ६ महिने उत्‍तरांचल किंवा हिमाचलला जाणार आहोत असे या संदेशात म्‍हटले होते.

आई-बापाच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बहिरेवाडी (ता. आजरा) येथील तरुणाने कामधंदा करत नाहीस. बसून खातोस, असे म्हटल्याच्या रागातून वडील कृष्णा गोरूले (वय ७० वर्षे ) आणि आई पारुबाई गोरुले(वय ६५ वर्षे) यांचा खून केला होता. ऐन लक्ष्मी यात्रेवेळी सदर प्रकार घडला होता. याप्रकरणी मुलगा सचिन ऊर्फ पप्पू कृष्णा गोरूले (वय ३२) याला गडहिंग्लज जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी जन्मठेप, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सुनील तेली यांनी काम पाहिले.

      याबाबत अधिक माहिती अशी, सचिन हा सुरुवातीला कागल औद्योगिक वसाहतीमध्ये काम करीत होता. त्याचे लग्न झाले होते. मात्र, वादामुळे त्याचा घटस्फोट झाला होता. यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. अशातच आई वडिलांशीही त्याचा वाद होत होता. १० फेब्रुवारी २०२३ रोजी सचिनला
आई-वडिलांनी तू काही कामधंदा करत नाहीस, खावून पिऊन झोपतोस, असे म्हटल्यामुळे त्याला प्रचंड राग आला. या रागातच त्याने आई पारुबाई यांच्या चेहऱ्यावर, कपाळावर, मानेवर, खुरप्याने वार करून गंभीर जखमी केले होते. अशा अवस्थेत पारुबाई यांनी घराबाहेर पळ काढला.

      सचिन याने त्यानंतर घराचा दरवाजा बंद करून वडिलांना खुरप्याने वार करून त्यांना जागीच ठार मारले होते. दरम्यान, बहिरेवाडी गावची लक्ष्मी यात्रा असल्याने लोकांना खुनाची माहिती मिळताच लोक मोठ्या संख्येने जमा झाले. सचिन पळून जाऊ नये म्हणून त्याला घरात कोंडले व पारुबाई यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, बारा दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला होता.

     तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी तपास केला होता.

ते तरसच…?

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरातील शिवाजीनगर परिसरासह बुरुडे परिसरात विविध ठिकाणी शीर व धड विरहित कुत्री मृतावस्थेत सापडल्याने दहशत निर्माण केलेला प्राणी तरसच असल्याचे पुढे येत आहे.

       शिवाजीनगर परिसरातील शेत जमिनीलगत असणाऱ्या सरदेसाई/लाटगांवकर यांच्या घर परड्यामध्ये कुत्र्यावर हल्ला करताना सरदेसाई कुटुंबीयांनी सदर प्रकार पाहिला होता. हल्ला करणारा पाणी तरच असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी शीरविरहित कुत्र्याचा मृतदेह दुसऱ्याच दिवशी आढळून आला होता.

      याबाबत परिक्षेत्र वन अधिकारी मनोजकुमार कोळी यांच्याशी संपर्क साधला असता आपण याबाबत निरीक्षणाकरीता स्वतंत्र पथके नेमली असल्याचे सांगितले. हल्लेखोर प्राण्याच्या पायाचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. हल्लेखोर प्राण्याबाबत संभ्रमावस्था असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा प्राणी निश्चितच बिबट्या नाही हे देखील त्यांनी सांगितले.

अर्जुनवाडीत दिसला होता तरसांचा कळप..‌

      कांही दिवसांपूर्वी अर्जुनवाडी परिसरात तीन तरस शेतकऱ्यांनी पाहिले असल्याचे सांगितले जाते. हाच कळप पुढे आज-याच्या दिशेने आला असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

भडगाव पुलासाठी खा. शाहू छत्रपतींच्या प्रयत्नातून ४० कोटींचा निधी मंजूर : विद्याधर गुरबे यांची माहिती

 गडहिंग्लज: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्रालयाकडून केंद्रीय मार्ग निधीतून गडहिंग्लज ते नागनवाडी रस्त्याला जोडणाऱ्या हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलासाठी रुपये ४० कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विद्याधर गुरबे यांनी दिली.

       पावसाळ्यात अनेक वेळा सध्याच्या पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. व वाहतूक आजरा मार्गे करावी लागते. यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून नवीन पुलाची मागणी केली जात होती. अखेर कोल्हापूरची संवेदनशील खासदार शाहू छत्रपती यांनी या कामात विशेष लक्ष घालून ४० कोटी रुपयांचा निधी पुला करता मंजूर करून आणला आहे असेही गुरबे यांनी सांगितले.

     बँकात मराठी भाषेचा आग्रक्रमाने वापर करा…

मनसेची मागणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातील सर्वच बँकांमध्ये दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर अग्रक्रमाने झाला पाहिजे. तसेच बँकांमधील सर्व फलक मराठी भाषेत लावले गेले पाहिजेत, अन्यथा बँकांच्या विरोधात मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा आजरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आजरा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक शाखा मडिलगे या बँकांच्या शाखा मॅनेजर यांना देण्यात आले आहेत.

      निवेदनात म्हटले आहे, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमा नुसार महाराष्ट्रातून सर्व बँकांचे व्यवहार हे मराठीत असणे व फलक पण मराठीत असणे गरजेचे असताना, आजरा शहरातील बँकांच्या शाखा मध्ये सदरचे नियम धाब्यावर बसवून मराठी भाषेचा अवमान केल्याचे मनसेच्या निदर्शनास येत आहे. त्या जागी हिंदी व इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले जात आहे तसेच हिंदी व इंग्रजी बोलण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे सर्व बँकांच्या शाखा मध्ये इथून पुढे सर्व व्यवहार हे मराठीतच असले पाहिजे. त्यामध्ये रक्कम जमा करणे, काढणे या पावत्या मराठीतच असल्या पाहिजे. त्याचबरोबर सर्व योजनांचे फलक व त्यासोबत कर्जासंबंधीचे जे करार असेल ते सर्व इथून पुढे सर्व मराठीतच असली पाहिजे. याबाबत येणाऱ्या आठ दिवसात सदर नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावे तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना बँकांच्या विरोधात मनसे स्टाईलने खळखट्‌याक आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

      निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, तालुका उपाध्यक्ष ऍड. सुशांत पोवार, तालुका सचिव वसंत घाटगे, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष सरिता सावंत, विनायक घंटे, मयूर हरळकर, सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत .

आज शहरात…

         “रामनवमी जन्मोत्सवा” निमित्त सकाळी ८ ते ११ पर्यंत पंचसुक्त पवमान व पंचायतन सुक्त अभिषेक,दुपारी १२.०० वा.जन्मकाळ, आरती व मंत्रपुष्प,दुपारी १२.३० ते ३.०० पर्यंत महाप्रसाद दुपारी ४.३० ते ५.३०वा. श्रीरामरक्षा स्तोत्रपठण.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आवंडी धनगर वाड्यावर आठ देशी गाईंचा आकस्मिक मृत्यू..मलिग्रे येथील आगीत 5 म्हैशी जखमी,एक मयत…जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात ९९.७१ टक्के वसुली…आजऱ्यात  कृषि दिन कार्यक्रम उत्साहात…संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे १ कोटी ५७ लाख जमा. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनुदान जमा…पुन्हा गजराजाचे  वेळवट्टी येथे आगमन…..

mrityunjay mahanews
error: Content is protected !!