शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५



गायब होत आहेत कुत्री…
संशयाच्या भोवऱ्यात बिबट्या…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे ता. आजरा येथून आठवडाभरात चार ते पाच पाळीव व भटकी कुत्री गायब झाल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. तर बिबट्याच्या वावराबाबत वन विभागाकडूनही दुजोरा मिळत आहे.
घराशेजारी बांधले शामा देसाई यांचे कुत्रे व अन्य एका ग्रामस्थाचे पाळीव कुत्रे अचानकपणे गायब झाले आहे. त्याचबरोबर गावामध्ये परिचयाच्या असणाऱ्या भटक्या कुत्र्यांपैकी कांही कुत्रीही गेले आठवडाभरात गायब झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. कुत्री गायब होण्याच्या कारणाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. संशयाची सुई या परिसरात बिबट्याचा वावर असून या बिबट्यावरच येऊ लागली आहे.
याबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. असे असले तरीही प्रत्यक्ष एखादे मृत कुत्रे आढळल्यास त्यावरून हल्ल्याची पद्धत विचारात घेऊन नेमकी बिबट्यानेच कुत्री पळवली आहेत की अन्य कोणते कारण आहे हे स्पष्ट होईल असे सांगितले गेले. याचबरोबर बिबट्यानेच कुत्री पळवली असल्याची शक्यताही वर्तवली आहे.
कारण कांहीही असले तरीही तूर्तास मात्र या कुत्री गायब होण्याच्या प्रकारात बिबट्या मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे हे नक्की.
‘अंजुमन’च्या अध्यक्षपदी आलम नाईकवाडे
डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा कार्यभार स्वीकारला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील अंजुमन इत्तेहादुल इस्लाम या संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ बोर्ड, संभाजीनगर यांच्या आदेशानुसार आजऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष आलम अहमद नाईकवाडे यांची यापूर्वी निवड करण्यात आली आहे.
सदर झालेली निवड व उपलब्ध कागदपत्रे विचारात घेऊन डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेजचा कार्यभार रिसिवर तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आजरा श्री. बसवराज गुरव यांनी तहसीलदारांच्या आदेशाने श्री. नाईकवाडे यांच्याकडे सोपवला आहे.

अल्पसंख्यांकांसाठी असणाऱ्या या संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील राहू असे पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक सलीम शेख, अश्कर लष्करे, ॲड. जावेद दिडबाग, शरीफ खेडेकर, कलाम तकिलदार, हुसेन दरवाजकर, इम्रान माणगावकर, शौकतअली दरवाजकर, याह्याखान बुड्ढेखान, अमिर खेडेकर,बशीर शिडवणकर, सुलेमान दरवाजकर इत्यादी उपस्थित होते.


आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातून टॅब चोरीला

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरोग्य वर्धीनी उपकेंद्र कासारकांडगाव ता. आजरा जि. कोल्हापूर येथून दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी टॅब चोरीला गेला असल्याची फिर्याद प्रमोद पुंडलिक कांबळे (आरोग्य सेवक, उपकेंद्र कासारकांडगाव ता. आजरा रा. रवळनाथ कॉलनी आजरा) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.

राम नवमी निमित्त रविवारी आजऱ्यात विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रामनवमी उत्सव मंडळ व रामदेव गल्ली, आजरा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे “रामनवमी जन्मोत्सव”, राम मंदिर आजरा, येथे संपन्न होणार आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ११ पर्यंत पंचसुक्त पवमान व पंचायतन सुक्त अभिषेक,दुपारी १२.०० वा.जन्मकाळ, आरती व मंत्रपुष्प,दुपारी १२.३० ते ३.०० पर्यंत महाप्रसाद दुपारी ४.३० ते ५.३०वा. श्रीरामरक्षा स्तोत्रपठण असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.


आजरा साखर कारखान्याची आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल : वसंतराव धुरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक संघर्ष करीत आहे. सन २०२३-२४ हा हंगाम मध्यावर असताना विद्यमान संचालक मंडळाने कारखान्याचा कारभार हातात घेतला. त्यावेळी महामार्गाचे काम, अपुरी वाहतुक यंत्रणा तसेच मशिनरीच्या तक्रारीमुळे ११ दिवसात प्रतिदिनी केवळ २४० मे.टन या सरासरीने २ लाख ६४ हजार मे.टन इतके ऊस गाळप झाले. त्यामुळे कारखान्याचे कर्जात पुन्हा वाढ झाली. त्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने आसपासच्या कारखान्यांची संख्या त्यांची वाढलेली गाळप क्षमता याचा विचार करून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप व्हावे यासाठी कारखान्याचे जुन्या मशीनरी मध्ये सुधारणा करून त्याला अत्यावश्यक पुरक नवीन मशिनरी बसवून त्याच बरोबर सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारणी केली. त्यामुळेच सन २०२४-२६ हंगामात २ लाख ७८ हजार मे. टन इतके गाळप झाले. या हंगामात ऊसाच्या एकरी उत्पादनात २० ते ३० टक्के घट झाली याचा परिणाम म्हणुन गळीताचे दिवस कमी झाले. त्यामुळे गळीताचे उद्दीष्ट पुर्ण करता आले नाही अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिली परिणामी कारखान्याच्या कर्जात भरच पडत गेली असे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचे वाढते कर्ज व व्याजाचा भुर्दंड काही अंशी कमी व्हावा या करीता ना. हसन मुश्रीफ यांनी कारखान्यास एन.सी.डी.सी. कडून मदत घेण्याचे ठरवून तसा प्रस्ताव सादर करणेस सुचना केली. त्यानुसार कारखाना व्यवस्थापनाने रू.१५२ कोटीचा कर्ज प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. हसन मुश्रीफ , आ. श्री. अमल महाडीक व आ. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, त्याच बरोबर साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांनी सकारात्मक प्रतिसाद व विशेष सहकार्य करून आमचे कारखान्यास कमी व्याज दराचे रू.१२२.६८ कोटीचे कर्ज मंजुर केले. त्याबदद्ल कारखाना व्यवस्थापन व आजरा तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे कारखाना संचालक मंडळ व व्यवस्थापनाकडून जाहिर आभार व्यक्त केले.
एन.सी.डी. सी.च्या कर्जातुन कारखान्याने के.डी.सी.सी. बँकेंचे अल्पमुदत कर्जाची परतफेड केली. त्याच बरोबर कामगारांचा थकीत प्रा. फंड, ग्रॅच्युईटी व शासकीय कर्जाची परतफेड केली आहे. तसेच माहे मार्च-२०२५ पासून कामगारांचे यापूर्वीचे ३० टक्के कपातीपैकी १० टक्के पगार वाढही सुरू केली आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई जिल्हा बँकेचे संचालक तथा बॅक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक श्री. विष्णू केसरकर, श्री. उदयसिंह पोवार, श्री. मुकुंदराव देसाई, श्री. मधुकर देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री.अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री.रणजित देसाई, श्री.संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री.शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरूकटे, श्री.राजेश जोशीलकर, श्री. गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, श्री. संभाजी दत्तात्रय पाटील, श्री.अशोक तर्डेकर, श्री.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री.नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी विद्यालय होन्याळीचे यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक( N.M.M.S. ) परिक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालय, होन्याळीने यश संपादन केले.
राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-
दर्शन भैरीनाथ साबळे (११४ )
सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-
श्रध्दा अरुण देऊसकर,सृष्टी तानाजी जाधव,श्रृतिका जयसिंग पाटील,अक्षता अशोक खेडेकर,रुद्र सतिश तोडकर,वेदिका सागर शिंदे,सक्षम समीर लकांबळे,वेदांत संदीप मांडे, ऋषभ जयदीप पाटील
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. बी. देऊसकर यांचे प्रोत्साहन तसेच सौ. एस. एम. खाडे , श्री. एस. डी. केसरकर , श्री. व्ही. टी. अस्वले , मा. श्री. एस. एम. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.


पेरणोली हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील पेरणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केले. तसेच दोन विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक बनले. यामध्ये यशश्री शंकर नार्वेकर व हर्षद दत्तात्रय जाधव हे दोन विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक बनले तर सारथी शिष्यवृत्तीधारकमध्ये अजिंक्य जोतिबा पाटील,कृष्णा महादेव मिसाळे, समृद्धी उत्तम वांद्रे,अभिमन्यू कृष्णा सावंत, प्रणव धनाजी सासुलकर,हर्षवर्धन उदय कोडक या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, सर्व संचालक , पालकांचे प्रोत्साहन मिळाले.





