mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०२५

रामतीर्थ येथील यात्रेला आज पासून प्रारंभ …
उद्या यात्रेचा मुख्य दिवस

                  ज्योतिप्रसाद सावंत

      हिरण्यकेशी नदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गरम्य अशा परिसरातील यात्रेला आज महाशिवरात्री दिवशी प्रारंभ होत असून उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेस आजरा तालुक्यासह कोंकण, गोवा व कर्नाटक येथून भाविक मोठ्या प्रमाणे हजेरी लावत असतात.

        या परिसराला पौराणिक पार्श्वभूमीही आहे . प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर म्हणजे ही भूमी आहे. या ठिकाणी महादेव मंदिर येथे एकाच दगडातील सुमारे सहा फूट उंचीचा नंदी, हिरण्यकेशी नदी काठावर वसलेले राम मंदिर, राम मंदिर जवळून वाहणारा निसर्गरम्य धबधबा, जवळच असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली असणारा पिंपळ्या मारुती, त्यामागे असणारे दत्त मंदिर व या सर्व परिसरात असणारी शंकराची मूर्ती हा सर्वच परिसर निसर्गरम्य बनवण्यास कारणीभूत ठरत आहे.

        ‘ मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत यांच्या साहित्यामध्ये रामतीर्थ परिसरातील निसर्ग सौंदर्य वारंवार डोकावताना दिसते.यात्रेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने दोन दिवस विशेष बसफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आजरा नगरपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाने यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

       येथील अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी परिसराला भेट देऊन यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला व प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

        यात्रा ठिकाणी एसटी वगळता अन्य वाहने नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

रवळनाथ मंदिराचे शिलापूजन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचे शिलापूजन उत्साहात पार पडले.

      मंदिराच्या ईशान्य बाजूस प्रथम ५ शिळा पूजन हे सामानगडचे किसन महाराज आणि मनोहर बापट महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

       या प्रसंगी डॉ. दीपक सातोस्कर,आनंदा कुंभार, सुधीर कुंभार, प्रकाश पाटील, मल्लिकार्जुन तेरणी, सुरेश कुंभार,दीपक कुरुणकर, वामन सामंत, संजयभाऊ सावंत, संतोष शेवाळे, गौरव देशपांडे, दिलीप गुरव यांच्यासह मानकरी, सेवेकरी, उपसमिती पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

सोलरची सक्ती न करता प्रलंबित वीज कनेक्शन द्या अन्यथा आंदोलन

तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यातील वीज कनेक्शन मागणी केलेल्या काही शेतकऱ्यांची २०१९ पासूनची वीज कनेक्शन प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून सोलरची सक्ती केली जात आहेत, वीज कंपनीने शेतकऱ्यांना सोलरची सक्ती न करता वीज कनेक्शन द्यावीत अन्यथा शंखध्वनी आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकन्यांनी निवेदनातून दिला आहे. पाबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे

       त्यात वीज कंपनीकडून वीज कनेक्शन देण्यात हलगर्जी होत असल्याने शेती करायची की नाही असा प्रश्न आपल्यासमोर उभा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

       यापुर्वी कांही शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोलर बसविले होते, सोलरच्या होल्टेजने अपेक्षित पाणी उपसा होत नाही. शिवाय यापूर्वी बसविलेले सोलर हत्तीने उध्वस्त केले आहेत. सोलरच्या माध्यमातून पाणी उपसा अपेक्षित होत नसतानाही शासन सोलर पेण्यासाठी कोणत्या आधारे सक्ती करीत आहे असा प्रश्नही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. आम्हाला सोलर नको आहे विज कनेक्शन मिळावे ही आमची मूळ मागणी आहे आमच्या मागणीनुसार आम्हाला वीज कनेक्शन मिळालेच पाहिजेत अन्यथा तालुक्यातील शेतकरी आगामी पंधरा दिवसात कोणत्याही क्षणी आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

       या निवेदनावर रवी पाटील (मडिलगे), आशिष दोरुगडे (सोहाळे) चंद्रकांत जाधव, विलास गुरव (खानापूर), सचिन इंदुलकर (आजरा), ज्ञानु लाड (रायवाडा), भिकाजी शेटगे (पारपोली), ज्ञानदेव लाड (रायवाडा) या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

भाषिक कौशल्यांच्या विकासाने व्यक्तीमत्व उजळते : डॉ. बुचडे

आजरा महाविद्यालयात व्याख्यान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      माणसाची भाषा ही त्याचा ओळख असते, जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येक माणसाची बोलण्याची, लिहिण्याची शैली स्वतंत्र असते, त्यामुळे भाषिक कौशल्यांच्या विकासाने माणसाचे व्यक्तीमत्व उजळत असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्नील बुचडे यांनी केले. आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग, भाषा भगिनी मंच व ज्ञात स्त्रोत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे होते.

      प्रारंभी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन तसेच ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. बुचडे म्हणाले, व्यक्तिमत्व विकास करावयाचा असेल तर स्वतःच्या क्षमता आणि कच्चे दुवे ओळखा. श्रवण, वाचन, लेखन आणि भाषण ही चार भाषिक कौशल्ये आहेत. व्यक्तिमत्व विकास घडविण्यामध्ये या भाषिक कौशल्यांचे योगदान महत्त्वाचे असते. आंतरिक आणि बाह्य व्यक्तिमत्व असे व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग पडतात. बाह्य व्यक्तिमत्व हे आपल्याला फार बदलवता येत नाही. परंतु आंतरिक व्यक्तिमत्व आपण प्रयत्नाने बदलू शकतो. यामध्ये समाज, सवयी, चरित्र यासारख्या अंतरिक व्यक्तिमत्त्वातील गोष्टी आपण बदलून आपला व्यक्तिमत्व विकास घडवू शकतो. चारित्र्य ही व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

       मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, प्रा. रमेश चव्हाण, ग्रंथपाल रवींद्र आजगेकर, डॉ. अविनाश वर्धन, डॉ. सलमा मणेर, प्रा. शेखर शिऊडकर, प्रा. सुवर्णा धामणेकर, प्रा. सुषमा नलवडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

आजऱ्यात शुक्रवारी वीज बीलांची होळी करून होणार निदर्शने

वीज ग्राहक संघर्ष समितीचे सहाय्यक पोलीस निरिक्षकांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी साडेसात हॉर्सपॉवर पर्यंतच्या मोटर पंप धारक शेतकऱ्यांना वीज बील माफीची घोषण केली होती. मात्र निवडणूक होऊन सत्तेवर आल्यानंतर ही घोषणा शासनकर्ते विसरले असून शेतकऱ्यांना वीज बिले दिली आहेत. या निषेधार्थ शुक्रवार दि. २८ रोजी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात वीज बीलांची होळी करून शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबतचे निवेदन वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नागेश यमगर यांना देण्यात आले आहे.

      विधानसभा निवडणूकीपूर्वी शासनाने केलेली ही घोषणा फसवी होती हे आता आलेल्या बिलावरून स्पष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध म्हणून वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी चौक आजरा येथे जमून या आलेल्या बिलाची शुक्रवार दि २८ फेब्रुवारी २०२५ रोजी ठीक ११.०० वाजता जमून निषेध म्हणून होळी करून निदर्शने केली जाणार आहेत. यावेळी तालुक्यातील वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

      या निवेदनावर श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, गिरणी कामगार संघटनेचे कॉ. शांताराम पाटील, विक्रम देसाई, रवींद्र भाटले, शिवसेना उबाठा गटाचे तालुका प – मुख युवराज पोवार, प्रकाश मोरुस्कर, आजरा कारखाना संचालक रशीद पठाण, नौशाद बुडदेखान, निसार लाडजी, कॉ. संजय घाटगे यांच्या सह्या आहेत.

आजरा साखर कारखान्याची १ ते १५ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि.१ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन ३ हजार १०० रुपये प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. तरी संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.    

निधन वार्ता
रामचंद्र देसाई

            आजरा :  मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सुतार गल्ली, आजरा येथील रामचंद्र बापूसो देसाई ( वय ५६ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

      येथील काशिनाथअण्णा चराटी सहकारी पतसंस्थेचे ते शिपाई म्हणून काम पाहत होते.

      अंत्यविधी आज बुधवार दिनांक २६ रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

Oplus_131072

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

भूमी अभिलेखचा कर्मचारी लाचलूचपतच्या जाळ्यात…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तरुणीची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आता आमची सटकले… आमास्नी रागबी यायलाय…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!