सोमवार दि. १३ जानेवारी २०२५


तिसरी घंटा वाजली…
आजरा येथे राज्यस्तरीय नाटय महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे राज्यस्तरीय नाटय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. ज्येष्ठ रंगकर्मी कै. रमेश टोपले यांच्या स्मृती जपण्यासाठी आजरा येथे गेली १० वर्षे नाटय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचा हा ११ वा नाट्यमहोत्सवाचे असून ज्येष्ठ रंगकर्मी बाळासाहेब आपटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनाटय कलामंच संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी होते . सांगली येथील नाटय विद्या मंदिर संस्थेच्या ‘ देहभान ‘ या नाटकाच्या सादरीकरणाने या नाट्यमहोत्सवाला प्रारंभ करण्यात आला .
प्रास्ताविकात नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष आय . के . पाटील यांनी नवनाटय कलामंच च्या वाटचालीचा आढावा घेतला. १९५८ पासून नवनाटय नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे . राज्यनाटय स्पर्धेत नवनाटय ने यश मिळवून आजऱ्याच्या नाट्यसंस्कृतीचा ठसा उमटविला आहे . नव्या पिढीने हा वारसा पुढे घेऊन जावा असे आवाहन पाटील यांनी केले .
‘ देहभान ‘ नाटकाचे दिग्दर्शक उदय गोडबोले यांनी नाटयक्षेत्रात आजऱ्याचे नाव वरच्या क्रमांकावर आहे . आजरा व सांगली चे नाट्यक्षेत्रात वेगळे नाते असल्याचे त्यांनी सांगितले . कै . रमेश टोपले यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला .
अध्यक्षीय भाषणात अशोक चराटी म्हणाले , कै . रमेश टोपले यांनी नाट्यक्षेत्रात आजऱ्याला नवी ओळख मिळवून दिली . त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले . पुढील आठ दिवस चालणाऱ्या या नाट्यमहोत्सवात दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होणार आहे .
नाटयमहोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांचा आजरा आणि परीसरातील नाटयरसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चराटी यांनी केले .
यावेळी आजरा सुतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी , उपाध्यक्ष डॉ . अनिल देशपांडे, ज्योत्स्ना चराटी, डॉ.अशोक बाचूळकर यांच्यासह नवनाथ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘आजरा मर्चंटस’चे माजी व्यवस्थापक
के.डी.पाटोळे यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा मर्चंटस को ऑप. सोसायटीचे माजी व्यवस्थापक
कृष्णा धोंडीबा तथा के.डी.पाटोळे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगी,दोन मुलगे,दोन भाऊ,जावई,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
श्री.दत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक चेअरमन होत.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिवाजी सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले.
दरम्यान, गडहिंग्लज तालुका खरेदी – विक्री संघाचे प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिले.गडहिंग्लज येथील भांडी व्यापारी बालमुकूंद पाटोळे व कोल्हापूर येथील करसल्लागार गुरूनाथ पाटोळे यांचे ते वडील तर साधना प्रशालेच्या ग्रंथपाल मनीषा पाटोळे यांचे ते सासरे होत.

युवकांनी शिक्षणाबरोबर सुसंस्कार जपणे आवश्यक : डॉ.सुशांथ पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजचा युवक धैर्यवान, नितीवान, सामर्थ्यवान असला पाहीजेत. शिक्षणाबरोबर सुसंस्कारही जपले पाहीजेत.त्यांने तत्व, विचाराचा अंगीकार करायला हवा. राष्ट्र उभारणीसाठी युवकाची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपादन डॉ. सुशांत पाटील यांनी केले.
येथील शिवाजी सावंत शासकीय आद्यौगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये युवा दिन साजरा झाला डॉ. सुशांत पाटील यांनी विचार मांडले. उद्योजक बाप्साहेब सरदेसाई प्रमुख उपस्थित होते. संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पोवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रभारी प्राचार्य संदिप देसाई यांनी स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात स्वामी विवेकानंदाच्या
व्यक्तमत्वातील पैलू उघड केले. उद्योजक सरदेसाई म्हणाले, उद्योग करण्यासाठी परिश्रमाची गरज आहे. ध्येय आणि चिकाटी ठेवायला हवी. श्री पोवार म्हणाले, काम मागणारे नाही काम देणारे बना या वेळी त्यांनी जीवनातील अनुभव सांगितले. सागर कांबळे यांचे भाषण झाले.
यावेळी मानसिंग देसाई, दिग्वीजय भूतल, रघुनाथ निमणे, बाबू मांजरेकर, सुनिल पाटील, नरेश भोई, अनिल मस्करे, विजयकुमार मंगल, अमिर शिकलगार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


शिरसंगी येथे आजपासून संत बाळूमामा भंडारा महोत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री त्रिमूर्ती सद्गुरु बाळूमामा चॅरीटेबल ट्रस्ट, श्री क्षेत्र सिरसंगी येथे तेराव्या श्री बाळूमामा भंडारा महोत्सवाचे आज सोमवार दिनांक १३ जानेवारी ते शुक्रवार दिनांक १७ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यासपीठ अधिकारी म्हणून तुळशीरामअण्णा सोले , उपाध्यक्ष, श्री दत्त योगीराज आश्रम कर्जत हे काम पाहणार आहेत.
महोत्सव कालावधीमध्ये दररोज पहाटे चार ते सहा काकडा सायंकाळी १० ते १२ वाजेपर्यंत गाथा भजन, त्याचबरोबर हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन होणार आहे.
गुरुवार दिनांक १६ रोजी दुपारी ११ ते ३ या कालावधीमध्ये पालखी सोहळा व सायंकाळी चार ते पाच या कालावधीमध्ये तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ येथील श्री भगवान लाप्पा डोणे यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. पालखी सोहळ्यानिमित्त घोडगिरी वालंग मंडळ, कोरेगाव यांचा ढोल वादनाचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दिनांक १७ रोजी सकाळी नऊ ते ११ या कालावधीमध्ये ह भ प रामायणाचार्य रवींद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळू दळवी यांनी दिली आहे.


आजरा महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणीजधाम यांच्या संयुक्त विद्यमाने व अण्णासाहेब गळतके लायन्स ब्लड बँक, गडहिंग्लज यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, रक्तदान केल्याने समाजाच्या गरजू लोकांना रक्त उपलब्ध होते अनेकांचे प्राण वाचतात त्यामुळे अशा प्रकारचे कॅम्प सतत होणे गरजेचे आहे डॉ. अनिल देशपांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये रक्तदान केल्याने होणाऱ्या आरोग्यविषयक फायद्यांचा आढावा घेतला व रक्तदान करण्याची आवश्यकता व गरज विशद केली. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ७२ लोकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. रणजीत पवार, डॉ. संजय चव्हाण यांनी मानले. या रक्तदान शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना , विभागाचे विद्यार्थी, लायन्स ब्लड बँक, गडहिंग्लजचा स्टाफ, आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अशोक सादळे , उपप्राचार्य, दिलीप संकपाळ, परिवेक्षक, मनोज पाटील व कार्यालयीन अधीक्षक, योगेश पाटील आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.



