बुधवार दि. ११ मार्च २०२६


कानोलीत सर्पदंशाने म्हैस व बकरे दगावले
सव्वा लाखाचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली (ता. आजरा ) येथील सौ.माया म सतिश पाटील, या महिला शेतकरी कुटुंबातील म्हैस व बकरीला सर्प दंश झाल्याने बकरी व म्हैशीचा मृत्यू झाला. दोन्ही पशुधनाच्या जाण्याने पाटील कुटुंबियाचे मोठे नुकसान झाले आहे,पाटील कुटुंबियांची परिस्थिती हालाखीची असून, पशुधन दगवल्याने कुटुंबियांवार मोठा आघात झाला आहे..
आजरा पंचायत समिती सभापतीपदी सौ.जयश्री गाडे उपसभापतीपदी सौ. यशोदा पोवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जयश्री गाडे (भादवण) यांची तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाच्या यशोदा पोवार (देऊळवाडी) यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षपदी तहसीलदार समीर माने होते. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते.
सभापती पदासाठी सौ.जयश्री गाडे तर उपसभापती पदासाठी सौ.यशोदा पोवार यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे गाडे व पोवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी समीर माने जाहीर केले.
यावेळी आजरा साखर कारखाना अध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, नूतन सदस्यांकडून चांगले काम घडो ही अपेक्षा आहे. सदस्य नवीन आहेत त्यामुळे प्रशासनाने सहकार्य करावे. राजकीय विरोध संपला आहे आता हातात हात घालून विकासासाठी साऱ्यांनी काम करूया. जिल्हा बँक संचालक व जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या मतदारसंघांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे जबाबदारी देखील मोठी आली आहे. लोकांची कामे सुलभतेने व्हावी यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करूया. योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या यासाठी साऱ्यांनी काम केले पाहिजे. महिला बचत गट सक्षमीकरण, शिक्षणाचे सक्षमीकरण होण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करूया. जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई म्हणाले, जबाबदारीचे भान ठेवून नवनियुक्त सदस्य, पदाधिकारी व प्रशासन यांना काम करावे लागेल. कॉ. संपत देसाई म्हणाले, नवनियुक्त सदस्य व पदाधिकारी जनतेचा विश्वास सार्थ ठरवतील.
यावेळी नूतन सभापती जयश्री गाडे, नूतन उपसभापती यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, विकास चोथे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी तांबेकर, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेजिना फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती वसंतराव धुरे, आजरा साखर संचालक मारुती घोरपडे, राजू मुरकुटे, एम. के. देसाई,दिपक देसाई,अशोक तर्डेकर, दीपक देसाई, सौ.रचना होलम, सौ.मनीषा देसाई, सौ.अनुसया पाटील, सौ. समीक्षा देसाई, दिगंबर देसाई, गोविंद पाटील, शिवाजी नांदवडेकर, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, डी. ए. पाटील, माजी उपसभापती कामिना पाटील, संजय गाडे, युवराज पोवार, संजय येजरे, राजू होलम, वसंत कोंडुसकर, दशराज आजगेकर, देवदास बोलके,संजय गुरव, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांच्यासह कार्यकर्ते, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभागृहात स्वतः हजर राहणार… शिरीष देसाई
पंचायत समिती सभागृहात निवडून आलेले नवीन पदाधिकारी हे नवीन असल्याने सुरुवातीच्या कांही मासिक सभांना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्वतः सभेस हजर राहणार असे यावेळी जि.प.सदस्य शिरीष देसाई यांनी सांगितले.

आजरा साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी अनिल फडके यांची बिनविरोध निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाप्रमुख अनिल भिमा फडके (रा. सुळे) यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवड पार्श्वभूमीवर विशेष सभा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापुर यांचे प्रतिनिधी श्री.जी.जी. मावळे, यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाईस चेअरमन पदासाठी अनिल फडके यांचे नांव माजी उपाध्यक्ष सुभाष गणपतराव देसाई यांनी सुचविले त्यास संचालक मारूती जानबा घोरपडे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई म्हणाले, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ एकमताने काम करीत असुन यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून कारखाना यशस्वीपणे चालविणेसाठी प्रयत्न राहतील असे सांगीतले तर माजी व्हा. चेअरमन सुभाष गणपतराव देसाई यांनी ना. हसन मुश्रीफ व संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी यांनी व्हाईस चेअरमन पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबदद्ल आभार व्यक्त केले. नुतन उपाध्यक्ष अनिल फडके यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी वेळ देवुन काम करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णुपंत केसरकर, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, संभाजी दत्तात्रय पाटील, गोविंद पाटील, संचालिका सौ.रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक हरीबा कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, प्रादेशिक ऑफीसचे कार्यालय अधिक्षक दिगंबर पाटील व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
बंद लिफाफ्यातून मंत्री मुश्रीफ यांनी सुचवले नाव…
उपाध्यक्ष पदासाठी अनिल फडके यांच्यासह काशिनाथ तेली हे इच्छुक होते. याचा निर्णय सर्वस्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ घेणार होते. बंद लखोट्यातून त्यांनी नाव दिले होते. सभेपूर्वी सदर लखोटा फोडण्यात आला. त्यामध्ये अनिल फडके यांची शिफारस होती. ज्येष्ठत्वाच्या निकषावर सदर निवड झाल्याची चर्चा होती.

₹ १००० द्या…
चार लाखाच्या अनुदानाचे पत्र घ्या…
शेतकरी चक्रावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपण शेतकरी आहात का ? आपल्या गोठ्यात जनावरे किती आहेत ? शासनाकडून ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासह कडबा कुट्टी मशीन व इतर शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी चार लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे यासाठी सर्वेक्षण सुरू असून केवळ एक हजार रुपये भरल्यास आपण चार लाखांच्या अनुदानास पात्र ठराल व याबाबतचे लेखी पत्र जाग्यावर तातडीने दिले जाईल असे सांगून वाटंगी, शिरसंगी परिसरातील शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
एक हजार रुपयात दोन ते चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार असे सांगण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी एक हजार रुपये भरण्यास सुरुवात केली घरोघरी जाऊन सदर सर्वे करण्यात येत होता. काहींना या प्रकाराबाबत शंका आल्यानंतर त्यांनी संबंधितांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीपत्रकावरील पशुसंवर्धन विभागाच्या उपअधिक्षकांकडे संपर्क साधून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात सदर फोन तर लागले नाहीतच पण स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पैसे दिलेल्या काही मंडळींनी पोलिसात धाव घेतल्यानंतर सुमारे १६ जणांचे पैसे परत करण्यात आल्याचे समजते. पोलिसांकडून या प्रकरणाचे अधिक माहिती घेतली जात आहे.

श्रमिक महिला ही देशाची शक्ती : डॉ. शिवशंकर उपासे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
“श्रमिक महिला ही देशाची शक्ती आहे. श्रमिक महिला या समाजमंदिराचा पाया आहेत. महिलांची सर्जनशक्ती गौरवास्पद आहे.” असे उद्गार प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी काढले. ते शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सह. पतसंस्था आजरा आणि चैतन्य सृजन व सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या श्रमिक महिलांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
सौ. अनुष्का गोवेकर यांनी ‘महिला दिनाचे स्वरूप व विशेष ‘ या विषयावर मार्गदर्शन करत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. समाजाच्या प्रगतीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांचा सन्मान व सक्षमीकरणाचे महत्व नमूद केले. यावेळी विविध क्षेत्रात मेहनत घेणाऱ्या श्रमिक महिलांचा सत्कार करून गौरविण्यात आले. यामध्ये शोभा परीट, निता परीट, शालन शिंदे, शिल्पा परीट, संजीवनी कांबळे, शीला कांबळे, सविता पवार, संगीता जाधव, वैशाली सुतार, सुशीला जाधव, जनाबाई सुतार आदींचा समावेश होता.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुभाष विभुते व श्रीमती मीना शिरगुप्पे यांनी मनोगत व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अंजनी देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका पुष्पलता घोळसे, भारती सुर्यवंशी,मनोज गुंजाटी, सौ.सुधा उपासे, सारिका बटकडली, व परिसरातील महिला उपस्थित होत्या.

महिलांसाठी उत्तूर येथे ज्यूट उत्पादन प्रशिक्षण

उत्तूर : मंदार हळवणकर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) व उमेद अभियान, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तूर येथे ज्यूट उत्पादन निर्मिती उद्यम प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रेयस कोरवी यांनी महिलांचे सबलीकरण , व्यवसाय क्षेत्रात महिलांनी पुढे का यावे, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे व आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण प्रकल्प संचालक संतोष जोशी, दयानंद पाटील व अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बोकडे, ग्रामरोजगार सहाय्यक दादू सावंत तसेच आरसेटीचे अनिल कांबळे सहकार्य करत आहेत.या प्रशिक्षणादरम्यान ज्यूटपासून विविध उपयुक्त व विक्रीयोग्य उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून गीता परळकर या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.

व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरचे बी.डी.एस. परीक्षेत उज्वल यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शिक्षण संकुलातील प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी बी.डी.एस परीक्षेत सिल्वर व ब्रॉन्झ मेडल मिळवत उज्वल सुयश संपादन केले.
सिल्वर मेडल प्राप्त यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे…
राजवीर युवराज पवार
सान्वी सागर किरुळकर,स्वराली हनमंत गजरकर,
मनस्वी मनोज पंडित,
अन्विता अजित चौगुले, वरद एकनाथ वंजारे,रुद्र विजय कोळी
ब्रॉन्झ मेडल प्राप्त विद्यार्थी…
वेणू सचिन इंजल, स्मिरा स्वप्निल कातकर, रितुल विवेक चव्हाण,ऐश्वर्या युवराज देसाई, उर्विता विक्रम देसाई,प्रांजल नंदकुमार पाटील, राजनंदिनी सचिन इंदुलकर,
रणवीर रणजीत डोंगरे,
काव्या जयदीप दोरुगडे , एकादशी संदीप बर्गे, श्रीशा सागर पारपोलकर,
इरा प्रकाश पाटील,
गुणवंत विद्यार्थी…
विहान वसंतराव मस्कर,समीक्षा संभाजी लोहार, सलोनी रवींद्र देसाई, फैज नैमुद्दीन शेख,अर्पिता अश्विन डोंगरे, आर्यन विनोद दळवी, राजी संतोष डोंगरे,स्वराज नितीन गुडुळकर,अनस इखलास मुल्ला, कनिष्क कुणाल पोतदार, शौर्य संतोष बेलवाडे

निधन वार्ता
जोतिबा मोरबळे

भादवणवाडी, ता.आजरा, येथील जोतिबा बाळकू मोरबाळे (वय ६० वर्षे ) यांचे काल पहाटे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन नाती असा परिवार आहे.

‘ व्यंकटराव ‘ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर आणि पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजन करण्यात आले.
कु. प्रांजल शेंडे, विराज पाटील, अनन्या कोळी, राजनंदिनी पाटील, संस्कृती पाटील, संस्कृती मटकर, स्वराली सावंत, स्वराज इलगे आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योतींच्या कर्तुत्वाचा आढावा घेऊन आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा मोटे व रूही गुडुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. एस. एम. पाटील, श्री. ए. वाय. चौगुले व सौ. एस. पी. ढेकळे यांनी केले होते. परिणिता जावळे यांनी आभार मानले.

छायावृत्त…

आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा या प्रशालेमध्ये आजरा येथील कुमारी स्नेहल दशरथ केसरकर चर्च गल्ली आजरा हिची आय.बी.पी.एस अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ग्राहक सेवा सहयोगी पदासाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

आजचे पंचांग
दिनांक : ११ मार्च २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (१२ मार्च पहाटे ०४.१९ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (रात्री ०९.५९ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : वज्र योग (सकाळी ०९.११ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : बलवा करण (दुपारी ०३.०८ पर्यंत) कौलव करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (रात्री ०९.५९ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : कुंभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४९ ते दुपारी ०२.१८ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.५१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४६
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत




