गुरुवार दि. १२ मार्च २०२६


एकाची कबर खोदताना दुसऱ्याचा मृत्यू
आजऱ्यातील घटना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील अर्बन बॅंकेचे माजी संचालक बाबू लतिफ यांच्या आईंचे काल सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची कबर खोदण्यासाठी कोट गल्ली येथील अहंमद चाॅंद व त्यांचे सहकारी मुस्लिम दफन भूमी मध्ये अंत्य संस्कारासाठी खड्डा खोदण्यासाठी गेले होते. खुदाई सुरू असतानाच अचानक अहमद चाॅंद यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला.त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ऐन रमजान कालावधीत घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
देवर्डे मेंढोली येथे आग…
प्रचंड नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास देवर्डे येथील गट नंबर २३७ मध्ये शॉर्टसर्किटने विद्युत तार खाली पडून लागलेल्या आगीमध्ये सौ. तेजस्विनी किरण तानावडे,धनंजय बाबासाहेब तानवडे, महादेव भीमराव इक्के, बाळू शामराव इक्के, प्रभाकर रामू इक्के, आदींचे काजूची झाडे, मेसकाट्या, गवत यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तानवडे यांच्या मेसकाट्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी किरण तानवडे, धनंजय तानवडे, बाबासाहेब तानवडे, धर्मनाथ तानवडे व ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.
दरम्यान मेंढोली येथे असाच प्रकार घडून शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत
राजाराम लक्ष्मण जोशीलकर, विद्या बाळू चौगुले यांच्या गवतगंजी व पाईपलाईन आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठे नुकसान झाले आहे.

‘गॅस’ भडकला…टेन्शन वाढले…
गॅस सिलेंडरसाठी धावाधाव…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अमेरिका – इराण युद्धाची झळ आता भारतापर्यंत येऊन पोहोचली असून देशामध्ये इंधन टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. ग्रामीण भागापर्यंत हे लोण पसरले असून सर्वसामान्यांची गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. तूर्तास आजरि शहर व परिसरात गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचे सांगितले जाते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून गॅस टंचाई बाबत विविध प्रकारची माहिती व्हायरल होत आहे. यामुळे केवळ गॅस सिलेंडर हाच इंधनाचा पर्याय असणाऱ्या मंडळींची झोप उडाली आहे. कालपासून सिलेंडर मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवसायिकांचा गॅस पुरवठा थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पर्यटनासह इतर कामाकरिता गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना विचार करण्याची वेळ आली आहे. मुंबई- पुण्याला असणाऱ्या चाकरमान्यांबाबत चिंता व्यक्त होत आहे. तर काही मंडळी यावर्षी लवकरच सुट्टीच्या निमित्ताने गावी परतण्याचा तयारीला लागलेली आहेत. एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत गॅस टंचाईच्या भीतीने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे हे निश्चित…
रॉकेल गायब… चुली बंद…
शासनाने टप्प्याटप्प्याने यापूर्वीच रॉकेल वितरण बंद केले आहे. वृक्षतोडीला असणारी बंदी, बंद झालेले रॉकेल वितरण यामुळे चूल हा प्रकारच इतिहास जमा झाला आहे. गॅस व्यतिरिक्त इतर कोणताच पर्याय नसल्याने सर्वसामान्यांचे जगणे अडचणीचे झाले आहे.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा उत्तूर पंचक्रोशीत दौरा; विविध कामांची पाहणी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी उत्तूर पंचक्रोशीतील बहिरेवाडी, उत्तूर व चिमणे या गावांना भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली.बहिरेवाडी येथे समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील वॉटर एटीएमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रत्नजा सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. प्रसंगी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य विकास चोथे, उपसरपंच दत्ता मिसाळ, ग्रामसेविका चौगुले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
उत्तूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी सरपंच किरण आमणगी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे व आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच उत्तूर बसस्थानकाच्या रेंगाळलेल्या बांधकामाची त्यांनी पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली.
यानंतर त्यांनी चिमणे येथे भेट देऊन गतवर्षी जिल्हा परिषदेकडून निधी देण्यात आलेल्या जुन्या शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी सरपंच सुनिल कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. उपसरपंच गुणवंता बेलकर, ग्रामसेवक पांडुरंग खवरे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, आजरा गटविकास अधिकारी एस. एल. सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र गुरव, महेंद्र मिसाळ तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

राधाबाई कुलकर्णी यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील श्रीमती राधाबाई श्रीपाद कुलकर्णी ( वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
आजरा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष श्री. आनंदराव श्रीपाद कुलकर्णी यांच्या त्या आई होत.
रक्षाविसर्जन उद्या शुक्रवार दिनांक १३ रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

आदर्श बालक मंदिर व श्री. रवळनाथ प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील ‘जनता एज्युकेशन सोसायटी’ संचलित ‘श्री. रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर’ व ‘आदर्श बालक मंदिर’ शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक महिला दिन’ सप्ताह व ‘सावित्रीबाई फुले पुण्यतिथी’ निमित्त खास विद्यार्थ्यांच्या माता पालकांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम येथील अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून खास महिला पालकांसाठी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मुग्धा चराटी होत्या तर प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून डॉ.अंजनी देशपांडे , सौ. सुरेखा भालेराव ,सौ. नूरजहा सोलापुरे , माजी नगराध्यक्षा सौ. ज्योत्स्ना चराटी, सौ. हेमलता कामत उपस्थित होत्या.
मान्यवरांचे स्वागत श्री.रवळनाथ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला देसाई , आदर्श बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.एस्.एस्.नारे ,सौ.निलांबरी कामत , सौ.जयश्री डांग व सौ.अश्विनी राणे यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन करण्यात आले.
सौ.मुग्धा चराटी यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थित माता पालकांना मोबाईलचा अती वापर मुलांच्या जडणघडणीत अडथळा निर्माण करत असल्याचे सांगून, मुले आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करतात तुम्ही मोबाईल पासून दूर राहिला तर तुमची मुले देखील आपोआप मोबाईल पासून दूर राहतील व त्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम कमी करता येईल. त्यामुळे आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर करावा असे आवाहन केले.
विजेत्या स्पर्धक मातांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुप्रिया भिकले व स्नेहल भोसले यांनी केले. यावेळी आदर्श बालक मंदिर व श्री.रवळनाथ प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.आभार मोनिका पाटील यांनी मानले.

छाया वृत्त

निसर्ग संवर्धन आणि वृक्षारोपण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वृक्ष प्रेमी समूह’ सदस्यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) माननीय कार्तिकेयन साहेब यांची ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सभागृह येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील पर्यावरणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून त्यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.

छायावृत्त…

आजरा – गडहिंग्लज मार्गावर सुलगाव फाटा ते सुलगाव नर्सरी दरम्यान बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक गव्याने रस्त्यावर हजेरी लावल्याने वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली.

आजचे पंचांग
♦ दिनांक : १२ मार्च २०२६
♦ वार : गुरुवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : नवमी तिथी (१३ मार्च सकाळी ०६.२८ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
♦ नक्षत्र : मूळ नक्षत्र (१३ मार्च रात्री १२.४३ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
♦ योग : सिद्धि योग (सकाळी 09:58 पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
♦ करण : तैतुला करण (सायंकाळी ०५.२६ पर्यंत) कौलव गराजा करण
♦ चंद्र राशी : धनु राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१८ ते दुपारी ०३.४७ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२४ ते दुपारी ०१.१२
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५१
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४६
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७ शक संवत




