mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि. १० जानेवारी २०२५  

चोरीची वीज… एकाचा मृत्यू…

एकावर गुन्हा नोंद

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कंत्राटी मजूर मोहनलाल मेझला मांझी बेसरा (वय २३) मुळगाव कसिया डिह पोस्ट बडकी, पुनू ता. ठिकहरा (जि. बोकारी, झारखंड) सध्या रा. कडगाव (ता. भुदरगड) यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार धरून जयदीप जीवन शेवाळे (वय २४) रा. एरंडोळ (ता. आजरा) यांच्या विरोधात आजरा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अनिल ईश्वर सरंबळे यांनी दिली आहे.

       याबाबत अधिक माहीती अशी की, १० नोव्हेंबर २०२४ रोजी जयदीप याने वीज चोरी करण्याच्या उद्देशाने   आजोबा गोविंद शेवाळे यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडणीवरून  चेंजआव्हर मधून  औद्योगिक वीजजोडणीला वीज पुरवठा जोडून घेतला. याच दरम्यान परोलीवाडी (ता. आजरा) येथील रोहीत्र बदलण्यासाठी इंद्रायणी इलेक्ट्रीक्लस यांचे कर्मचारी मोहनलाल गेले होते. त्यांना या  वीज जोडल्याची कल्पना नसल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

       पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

वनक्षेत्रात आता ‘नो एन्ट्री ‘

वनविभागाकडून दक्षता

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       वन्य प्राण्यांसह वनांचे रक्षण करणे, शेती लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे या पार्श्वभूमीवर आजरा वनविभागाने वनक्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे व तशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत अशी माहिती परिक्षेप्रमाणे अधिकारी मनोजकुमार कोळी यांनी दिली.

      पाणी व चाऱ्याच्या शोधात वन्यप्राणी वनातून बाहेर पडून वनालगतच्या शेती पिकांचे नुकसान करून परत वनक्षेत्रात जातात. अलीकडे हत्ती, गवे, बिबटे यांचा वावर वाढला असल्याने वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे यात्रा, पार्ट्या, हुल्बालबाजी याला प्रतिबंध करण्यात आला असल्याचीही कोळी यांनी स्पष्ट केले.

      ती व्हिडिओ क्लिप छेडछाड करून बनवलेली…

      गेल्या दोन दिवसापासून वायरल होत असलेली पश्चिम भागात वाघाचा वावर या सदराखाली विविध गावांचा उल्लेख करून व्हायरल झालेली ती व्हिडिओ क्लिप ही आजरा तालुक्यातील नसल्याचा खुलासा परिक्षेत्र वनाधिकारी कोळी यांनी केला आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या चित्रफिती व्हायरल करू नयेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.  

सरंबळवाडीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सरबंळवाडी ता. आजरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाजीराव आनंदा देवरकर यांच्यावर सरपंचासह पाच सदस्यांनी तहसीलदारांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. उपसरपंच पदाची कार्ये व जबाबदाऱ्या पाडण्यामध्ये कसुर करीत असून अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. विकासकामासाठी सहकार्य न करता अडचण निर्माण करत आहेत. सदस्यांना विश्वासात घेवून काम करीत नाहीत. मासिक सभेसाठी इतर सदस्यावर अरेरावी करून उध्दट वर्तन करतात अशी कारणे दिली आहेत.

      सरपंच सुनिता मारुती कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सदाशिव रावण, मारुती शंकर सरंबळे, प्रभावती बसवराज उतुरे, उज्वला उतम कांबळे, संगीता विश्वास किल्लेदार यांच्या निवेदनावर सह्या आहेत. अविश्वासाबाबत मंगळवार (ता. १४) सरंबळवाडी ग्रामपंचायतीमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजीत केली आहे.

आजरा तालुक्यात ग्रामपंचायतच्या वतीने भारतीय संविधान प्रास्ताविकेचा कट्टा बांधण्याची मागणी

गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      संविधान संवर्धन चळवळ यांच्या वतीने मुख्याधिकारी,नगरपंचायत, तहसिलदार, आजरा व गटविकास अधिकारी,आजरा यांना निवेदन देऊन संविधानाच्या संवर्धनाची व अंमलबजावणीची प्रक्रिया व्हावी. याचा एक टप्पा म्हणून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकीचा संविधान कट्टा आजरा नगरपंचायतच्या हद्दीत तसेच तहसिलदार कार्यालयाच्या आवाराच्या हद्दीत उभा करावा व त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. या आशयाचे निवेदन आज देण्यात आले.

      यावेळी मुख्याधिकारी,नगरपंचायत आजरा, तहसिलदार,आजरा व गटविकास अधिकारी गडहिंग्लज यांच्याबरोबर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

      या बैठकीमध्ये जिल्हासंघटक समीर खेडेकर यांनी संविधान कट्टा व संविधानाच्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भात आपली भूमिका मांडताना म्हणाले,संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानाची माहिती, संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. यासाठी संविधानाच्या प्रास्ताविक कट्टा उभा करणे गरजेचे आहे.

      यावेळी जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, संजय कांबळे, मोहसीन तगारे,मुस्तकिम तकिलदार , ताहिर खादर माणगावकर,मोईन काकतीकर, सफवान काकतीकर, रमीज खेडेकर,अक्रम लमतुरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

खेडे येथे आज पासून सदगुरू भर्तरीनाथ महाराज पुण्यस्मरण सोहळा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका वारकरी संप्रदाय मंडळ ट्रस्ट आजरा यांच्यावतीने ह. भ. प. वेदांतचार्य उदयशास्त्री पाटील महाराज, आष्टा, वाळवा यांच्या मार्गदर्शनाखाली नववा सद्गुरु भर्तरीनाथ महाराज पुण्यस्मरण सोहळा आज शुक्रवार दिनांक १० जानेवारी पासून सुरू होत आहे.

       आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता अभिषेक व पाद्य पूजा, सायंकाळी सहा वाजता हरिपाठ, रात्री नऊ वाजता कीर्तन व जागर तर शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी पाच वाजता काकडा आरती, सकाळी नऊ वाजता दिंडी व पालखी सोहळा त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

     याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्या ‘तुका आकाशाएवढा’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजनही करण्यात आले आहे.

खानापूर येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      खानापूर ता. आजरा येथे आज शुक्रवार दिनांक १० जानेवारी व उद्या शनिवार दिनांक ११ जानेवारी अखेर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

      आज शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता विणा पूजन, सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत दिंडी सोहळा व रवळनाथ भजनी मंडळा विटेचा कार्यक्रम, रात्री अकरा वाजता आधुनिक संगीत सोंगी भजनी मंडळ सावर्डे बुद्रुक, ता. कागल यांचा कार्यक्रम होणार आहे.

      शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी पहाटे चार वाजता काकडा आरती, सकाळी आठ वाजता पालखी सोहळा व मिरवणूक, दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वर्गणी काढून पैसे देतो परंतु व्हीक्टोरिया पुलावरील खड्डे तातडीने मुजवा….आजऱ्यात मनसेचे रास्ता रोको.. हाजगोळी बुद्रुक येथे केला हत्तीने लॉंग केला…आजरा साखर कारखान्यावर वसंत भोसले यांचे व्याख्यान

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!