शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर २०२४




सब कॉन्ट्रॅक्टर्सनी गटर्स व रस्त्यांचे वाटोळे केले…
नगरपंचायत बैठकीत अन्याय निवारण समितीचा आरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये कमिशनसाठी कामांची कॉन्ट्रॅक्ट घेऊन सब कॉन्ट्रॅक्टर्सना दिल्याने शहरातील गटर्स व रस्त्यांचे पूर्णपणे वाटोळे झाले आहे. काही गटर्स बांधकाम अर्धवट स्थितीत सोडलेले आहे तर काही गटर्सचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे व याला नगरसेवकांची फुस आहे असा आरोप आजरा नगरपंचायतीच्या सभागृहात नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी व अन्याय निवारण समितीच्या झालेल्या बैठकीत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी केला .
शहरातील विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आजरा येथील अन्याय निवारण समिती व नगरपंचायतीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नगरपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी प्रभागवार विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या प्रश्नांमध्ये प्राधान्याने शहरात ठिकठिकाणी अपुरा व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तांत्रिक बाबींचा विचार न करता सुरू असणारी गटर्सची कामे, पाणीपुरवठा योजनेस होणारा विलंब आदींवर चर्चा करण्यात आली. शहरातील गटर्सची कामे कार्यकर्त्यांचे संसार चालवण्यासाठी की शहरवाशीयांच्या सोयीसाठी सुरू आहेत अशा प्रश्न पडण्याजोगी सध्या परिस्थिती आहे. एकदा काम दिल्यानंतर आपली टक्केवारी घेऊन मुख्य ठेकेदार बाजूला होतात व त्यानंतर होणाऱ्या सब कॉन्ट्रॅक्टरच्या कामाकडे कोणाचेही लक्ष नसते. कोणीही पाहणी करत नाही असा आरोपही करण्यात आला. ख्रिश्चन स्मशानभूमीची वाट बंद करण्यात आली आहे याला जबाबदार कोण? असा सवाल मेजर डिसोझा यांनी उपस्थित केला. वेळ पडली तर प्रसंगी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात इशाराही यावेळी अन्याय निवारण समितीच्या वतीने देण्यात आला. शिव कॉलनी मधील सांडपाण्याची व्यवस्था कशी करणार ?
गटर व रस्त्याची कामे निवीदा नोटीस काढून नोंदणीकृत ठेकेदाराना देणे व कामाचे ठिकाणी नकाशे ठेवणेस सांगणे. भारत नगरमध्ये अर्धवट राहिलेली गटर पुर्ण करणे व पाणी गळती काढणे , चाफेगल्ली येथे दुध डेअरी पाठीमागील अडवलेला रस्ता खुला करून देणे. पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारासोबत मिटींग लावणे, समर्थ कॉलनी मधील चुकिचे बांधण्यात आलेले गटर काढुन नवीन गटर बांधकाम करावे व रस्ता रूंद करून मिळावा,आजरा शहरातून गेलेल्या महामार्गावरील दिव्यांची व्यवस्था लवकर करावी असे मुद्दे उपस्थित करून त्यावर चर्चा झाली. मुख्याधिकारी यांनी सकारात्मक उत्तरे दिली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण ,शशिकांत कुंभार, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, दिनकर जाधव, मिनिन डिसोजा, सुधाकर आजगेकर,अँथोनीओ यांनी भाग घेतला.
बैठकीस प्रकाश सावंत,अभिषेक रोडगी,जावेद पठाण, गुरु देसाई, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, प्रवीण बेले, संजय यादव, प्रदीप नाईक, निहाल नायकवडी, यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



जमीन संपादित झाली परंतु नुकसान भरपाईचे काय ?
महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा सवाल
रस्ता रोको चा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे, तालुका आजरा येथील गट नंबर ११३/१ मधील शेतकऱ्यांची ४५ गुंठे जमीन संकेश्वर – बांदा महामार्गामध्ये बाधित झालेली आहे. त्यातील आंबा, काजू, फणस व इतर जंगली झाडांची कोणतीही नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. सदर जमिनीतून महामार्ग गेला असून वाहतुकही चालू झाली आहे.
तरी या मिळकतीची नुकसान भरपाई दहा डिसेंबर पर्यंत दिल्यास त्यानंतर या जमिनीतील वाहतूक रस्ता रोको करून बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे आप्पासो कलाप्पा पाटील, पांडुरंग परसू गोडसे, अनिल तुकाराम गोडसे, गणपती दत्तू गोडसे, चंद्रकांत बाळू गोडसे व बाळू येसबा गोडसे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी भुदरगड यांना कळवले आहे.



पेरणोली तंटामुक्त अध्यक्षपदी अमर पवार यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता आजरा येथील ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदी अमर पवार तर समितीत रवींद्र देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रियांका जाधव होत्या.
अध्यक्षपदासाठी पवार यांच्या नावावर एकमत होऊन निवड करण्यात आली. सभेत पंधरावा वित्त आयोगातील पंचवार्षिक आराखडा, आर्थिक बजेट या विषयावर चर्चा झाली. चर्चेत दिनेश कांबळे, शेखर कळेकर,पांडुरंग दोरूगडे, पंकज देसाई, अविनाश जोशीलकर , उदय कोडक आदींनी सहभाग घेतला.
यावेळी उपसरपंच संदीप नावलकर,सदस्य संकेत सावंत, रणजीत फगरे,सुनिता कालेकर,शुभदा सावंत, कांबळे आदी उपस्थित होते.ग्रामसेवक संदीप चौगुले यांनी अहवाल वाचन करून आभार मानले.


मलिग्रे येथे महात्मा जोतीबा फुलेंना अभिवादन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता.आजरा येथील समाज मंदिरात महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्ताने फोटो पुजन सरपंच सौ. शारदा गुरव याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच गुरव म्हणाल्या, महात्मा जोतीबा फुले हे सामाजिक सांस्कृतिक कार्याचे द्रष्टे नेते होते, त्यांनी बहूजनांसह महिला शिक्षणाची दारे खुली केल्याने, देशातील राष्ट्रपती पासून गावातील सरपंच पदापर्यंत महिला विराजमान झाल्या, इंजिनिअर पासून वैमानिक, डाॅक्टर अशा सर्व क्षेत्रात महिलानी आपली कर्तबगारी दाखवून दिली, याचे सारे श्रेय महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले याना जाते असे मनोगत व्यक्त केले.
काॅ. संजय घाटगे यांनी महात्मा जोतीबा फुले यांचे जीवन कार्यांचा आढावा घेत समाजाच्या विकास करिता महात्मा फुले यांच्या पुस्तकांचे सामूहिक वाचन आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन स्त्री पुरूष समानता सामाजिक हक्कासाठी लढणारे युगपुरूष म्हणून महात्मा फुले च्या कडे पाहणे आवश्यक असलेचे मत व्यक्त केले.
बाळू कांबळे यांनी स्वागत केले तर संजय कांबळे, लक्ष्मी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आक्काताई कांबळे, रंगूताई कांबळे, शकुंतला बोरनाक, मीरा हरणे, मालूबाई कांबळे यांच्यासह राष्ट्रमाता जिजाऊ संविधान गट, मलिग्रे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, कोळिंद्रे,संविधानाच्या संविधान संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभार रामचंद्र कांबळे यांनी मानले.


भादवण यथील आरोग्य शिबारात ५३ रूग्णांची तपासणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मानसिक आरोग्य तपासणी शिबीरात आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील ६३ रुग्णाची तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक सी. पी. आर. हॉस्पिटल कोल्हापूर यांच्यावतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी संजय ढमाळ पांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबीरात सीपीआर कडील मानसोपचार तवा डॉ. कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी वंदना हतळगी, भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.ए. दुर्गी यांनी तपासणी केली भादवण आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.





