mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

       शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२४

आजरा उपजिल्हा रुग्णालयासह ३१ कोटींच्या विविध विकास कामांचे रविवारी उद्घाटन व भूमिपूजन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या  सर्फनाला प्रकल्पाच्या पाणी पुजनाचा कार्यक्रम उद्या रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आमदार आबिटकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.आम.आबिटकर यांच्या माध्यमातून निधी मिळालेल्या सुमारे ३१ कोटी ४५ लाखांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ रविवारी दिवसभरात होणार आहेत.

    आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात खेडगे- पारपोली जवळ सर्फनाला हा जलप्रकल्प गेली पंचवीस वर्ष रखडला होता. आमदार आबिटकर यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे सन २०२४ च्या पावसाळी हंगामात या जलप्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला. हा जल प्रकल्प पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे खेडगे-पारपोली पासून साळगाव-सोहाळे पर्यंत हिरण्यकेशी नदी बारमाही दुथडी भरून वाहणार आहे. प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गावातील २६४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलेल्या सर्फनाला जल प्रकल्पातील पाणी पूजनाचा समारंभ रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता होणार आहे. त्याचबरोबर आजरा शहरातील माजी सैनिक सभागृहाचे दुपारी एक वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. 

      आजरा शहरातील आमराई गल्ली नदीवरील पुलासाठी आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नातून सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ दुपारी ३ वाजता होणार आहे. दुपारी चार वाजता बौद्ध विहाराचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या बौद्ध विहारासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजता आजरा तालुक्यासाठी मंजूर झालेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारती करिता १७ कोटी २५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच आजरा शहरात उभारण्यात आलेल्या नवीन क्रीडा संकुलनाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रविवारी दिवसभरात होणाऱ्या सर्फनाला जलप्रकल्पातील पाणी पूजन तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन या समारंभासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजरेकरांनी अनुभवला डोक्यावरच्या आरतीचा थरार…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आज-याचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर आजरा येथे आजरेकर नागरिकांनी डोक्यावरील जागर आरतीचा थरार अनुभवला. नवरात्र उत्सव कालावधीतील हा एक प्रमुख धार्मिक कार्यक्रम मानला जातो.

      यावर्षी श्री रवळनाथ मंदिराच्या नूतन वास्तूचे काम सुरू आहे. तरीदेखील डोक्यावरील आरतीचे भक्तगणांना औत्सुक्य लागून होते. पुजारी रोहन गुरव यांना प्रतिवर्षीप्रमाणे या आरतीचा मान देण्यात आला.

      यावेळी रवळनाथ मंदिर देवस्थान उप समितीचे सर्व पदाधिकारी, नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व शहरवासीयांनी या कार्यक्रमाचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 सर्व छायाचित्रे सहकार्य -विक्रांत वाळके आजरा.

चार लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळपासाठी प्रयत्नशील : वसंतराव धुरे

आजरा’ चे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गेल्या गळीत हंगामात विविध अडचणींमुळे केवळ दोन लाख ६५ हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले. कमी गाळपामुळे कारखान्याच्या आर्थिक अडचणींत वाढच झाली .चालू हंगामात मात्र गतवेळच्या चुका टाळून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. चार लाखांचा गाळपाचा टप्पा ओलांडून त्यापुढे जाण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कर्मचारी, ऊस उत्पादक, सभासद व तोडणी-ओढणी यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी केले ते कारखान्याच्या २६ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

      कारखान्याच्या संचालक सुभाष देसाई व सौ विजयमाला देसाई यांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम पार पडले. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

      यावेळी अध्यक्ष धुरे यांनी यांची एनसीडीसी च्या माध्यमातून १५० कोटींचा आर्थिक सहाय्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सांगितले.दीपावली निमित्त कारखान्याच्या कायम कर्मचाऱ्यांना ₹. ९०००/- व हंगामी कर्मचाऱ्यांना ₹ ७०००/- सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले.

      यावेळी ज्येष्ठ संचालक मुकुंदराव देसाई म्हणाले, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त गाळप कसे होईल यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. कारखान्याच्या वाटचालीत ऊस उत्पादक सभासदांबरोबरच कर्मचारी वर्गाचे योगदान उल्लेखनीय आहे.

      जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई म्हणाले, आर्थिक अडचणीमुळे कारखाना दोन वर्षे बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसनमुश्री यांनी केलेल्या सहकार्यामुळे कारखाना पुन्हा एक वेळ नव्या जोमाने सुरू झाला आहे. कर्मचारी वर्गाने नाराज न होता चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. चार लाख मे. टनाचा टप्पा ओलांडल्यानंतर अनेक आर्थिक प्रश्न मार्गी निश्चितच लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

      यावेळी प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती,राजू होलम, उपाध्यक्ष मधुकर देसाई,ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, उदय पवार, मारुती घोरपडे, दीपकराव देसाई, रणजीत देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरकुटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संभाजी पाटील, अशोक तर्डेकर, हरिबा कांबळे, नामदेवराव नार्वेकर, रशीद पठाण, दिगंबर देसाई, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई यांच्यासह सर्व संचालक विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

      उपस्थितांचे स्वागत संचालक काशिनाथ तेली यांनी केले तर संचालक अनिल फडके यांनी आभार मानले.

निधन वार्ता
शशिकला कुरुणकर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     आजरा येथील शशिकला शेखर कुरुणकर (वय ७४ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने काल शुक्रवारी रात्री निधन झाले.

      जनता शिक्षण संस्थेचे संचालक दिनेश कुरूणकर व दीपक कुरूणकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, मुलगी, सुना,जावई नातवंडे असा परिवार आहे.

कोळींद्रे गायरानातील रस्ता अडवला… कारवाईची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोळींद्रे ता.आजरा येथील गायरानातील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाने केलेला रस्ता सुमारे पंधरा दिवसांपासून विष्णू पाटील व कुटुंबाने जाणून बुजून अडवून कुंपण केलेने शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून सदर रस्ता अडविणाऱ्यावर कारवाई करून रस्ता खुला करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

      अधिक माहिती अशी की,सदर गायरानातील चाळीस एकर जमीन प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधणे व शेतीसाठी दिली आहे.मात्र या ठिकाणी जाणेसाठी काही जमीन विष्णू पाटील यांच्या सहमतीने शासनास दिली आहे.यामधून रस्ता तयार केला आहे.गटारी बांधणेत आल्या आहेत.पीक अप शेड पण उभारण्यात आले आहे.कुंपण केलेने शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या कायम वहीवाटीचा रस्ता बंद झाला आहे.सदर रस्ता संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावून तात्काळ खुला करून मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले असून निवेदनावर रामचंद्र पाटील,सुरेश बुगडे,महादेव वाके, विठल नाईक,बाबू वाके,विष्णू नाईक यांचेसह ६२ जणांच्या सह्या आहेत.

कौतुकास्पद…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रामदेव गल्ली आजरा येथील कु.किरण शिवाजी बुरुड यांची मृद व जलसंधारण विभागामध्ये जलसंधारण अधिकारी (वर्ग-२ ) पदी निवड झाली आहे.

     सर्वसामान्य कुटुंबातून मोठ्या संघर्षातून या पदापर्यंत पोहोचलेल्या करण्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राव्हिडंट फंड कार्यालयावर सोमवारी पेन्शनरांचा महामोर्चा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     प्रॉव्हिडंट  फंडासह  विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर पेन्शनर यांच्या वतीने प्रॉव्हिडंट फंड कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉ. शांताराम पाटील यांनी दिली.

      यावेळी पाटील म्हणाले,पेन्शनरांचा लढा केंद्र शासनासोबत सातत्याने सुरू असून, ६ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्ली मध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, यावेळी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी संसदेत आवाज उठवला. केंद्रीय मंत्री यांच्याशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिष्ट मंडळ करून चर्चा केली. त्यांनी एक महिन्यात पेन्शन चा प्रश्न मार्गी लावण्याचे मान्य केले होते. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी विविध राज्यातील प्रतिनिधीची सभा होवून त्यामध्ये मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरले. सरकार  पेन्शन निधीवर जे व्याज मिळते त्यापैकी २५%रक्कम पेन्शनवर खर्च करते. यासाठी आमच्या हक्कासाठी एपीएस प्रमाणे किमान ९०००/- रूपये पेन्शन लागू करावी .वाढीव महागाई भत्ता द्यावा. पेन्शन फंडाचे खाजगीकरण रद्द करावे. २०१४ मधील पेन्शन योजना बदल रद्द करावे इत्यादी मागणी साठी संपूर्ण देशातील जिल्हा पेन्शन कार्यालय वर महामोर्चा चे आयोजन केले आहे. सर्व पेन्शन धारकांनी सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी विक्रम हायस्कूल मैदान, कोल्हापूर येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहनही आजरा, चंदगड, गडहिंग्लज पेन्शन धारकांना काॅ. शांताराम पाटील यांनी केले आहे.


                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गद्दार हे गद्दारच…राजीनामे दया व निवडून या… युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आजरा येथील सभेत घणाघात…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!