
सहकार्य करा, सूतगिरणीला गतवैभव प्राप्त करून देऊ : अशोक चराटी
आण्णा भाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीची ४५ वी वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संपूर्ण देशभरात वस्त्रोद्योग क्षेत्रात मंदीचे सावट आहे. देशभरातील मोजक्या सूतगिरण्या सध्या चालू आहेत. त्यामध्ये आण्णा भाऊ सूतगिरणीचा समावेश आहे. या सूतगिरणीलाही मंदीचा प्रचंड फटका बसत असून आहे त्या मज्ञनिरीवर नुतनीकरणाच्या माध्यमातून वीज बचत करण्याबरोबरच उत्पादन वाढीसाठी संचालक मंडळ बाधित आहे. सभासदांनी सहकार्य करावे, सूतगिरणीला निश्चितच गैतवैभव प्राप्त करून देऊ असे आवाहन आण्णा भाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक व संस्था समुहाचे प्रमुख अशोकआण्णा चराटी यांनी केले. सूतगिरणीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन अन्नपूर्णा चराटी होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली.
उपस्थितांचे स्वागत करून अध्यक्षा चराटी यांनी आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सूतगिरणी उभारणीचे स्वप्न घेऊन मोठ्या कष्टाने स्व. काशिनाथआण्णा व माधवराव देशपांडे यांनी ते प्रत्यक्षात आणले. सद्यस्थितीस सूतगिरणीची वाटचाल अत्यंत बिकट सुरू असून बहुंताशी सूतगिरण्या एकतर बंद किंवा भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आल्या आहेत, परंतु आजरा सूतगिरणीला जिद्दीने सुरु ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे म्हणाले, सर्वाधिक रोजगार देणाऱ्या या उद्योगात प्रचंड मंदीचे सावट तयार झाले आहे. निर्यात बंद झाल्याने स्थानिक सूतगिरण्या अडचणीत येत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊ लागला आहे. सूतगिरणीच्या सद्या वाटचालीत जिल्हा बँक अध्यक्ष हसन मुश्रीफ व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभत आहे. भविष्यात चांगले दिवस येतील या आशेवर सूतगिरणीची आजची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रद्धांजलीचा ठराव संचालक राजू पोतनीस यांनी मांडला, सभेचे नोटीस वाचन अकौंटंट दत्तात्रय दोरुगडे यांनी केले.

यानंतर सुतगिरणीचे संचालक जी. एम. पाटील व डॉ. साक्षी देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. या सभेला रमेश कुरुणकर, डॉ. दिपक सातोसकर, विलास नाईक, सुरेश डांग, ज्योत्स्ना चराटी, डॉ. संदीप देशपांडे, अनिकेत चराटी, मनीषा कुरुणकर, बसवराज महाळंक दिगंबर नार्वेकर, जयसिंग देसाई, विजयकुमार पाटील, डॉ. अंजनी देशपांडे, नारायण मउरउकटए, अनिकेत चराटी, आतिश कुमार देसाई, अण्णा फडके, शैला टोपले, दशरथ अमृते, किशोर भुसारी, संजयचव्हाण,विजयकुमार पाटील, डॉ. इंद्रजीत देसाई,दशरथ अमृते, कृष्णा येसणे, सचिन इंजल, संजय चव्हाण, प्रशांत गंभीर, सौम्या तिरोडकर,मीनल होळणकर, अमोघ वाघ, शामली वाघ यांच्यासह प्रमुख अधिकारी, सर्व संचालक, कर्मचारी, सभासद व आण्णा भाऊ संस्था समुहातीत मान्यवर उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन सचिन सटाळे यांनी केले. संचालक शशिकांत सावंत यांनी आभार मानले.

सासूच वाट्याला...
आजऱ्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांची स्थिती

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत
शिवसेना, भाजपा सह आजरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अवस्था सासू पासून वेगळे राहण्यासाठी वाटणी मागितली आणि सासूच वाट्याला आली अशीच थोडीफार झाली आहे. त्यामुळे आता सोयीची भूमिका कार्यकर्त्यांकडून घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ हा समाविष्ट आहे. या मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ व भाजपाचे समरजीतसिंह घाटगे असे दोन प्रमुख गट आहेत. त्यामुळे उत्तूर मध्ये घाटगे व मुश्रीफ असे दोनच गट गेली पाच-दहा वर्षे परस्परांविरोधात दंड थोपटताना दिसतात.
जे मुश्रीफ यांच्या पाठीशी नाहीत ते समरजीतसिंह घाटगे यांच्याबरोबर व जे समरजीतसिंह घाटगे यांच्या सोबत नाहीत ते मुश्रीफ यांच्या बरोबर असे साधे गणित या जिल्हा परिषद मतदारसंघाचे आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेत दुफळी पडल्यानंतर गेली २५-३० वर्षे सातत्याने या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री मुश्रीफ हे पुन्हा एक वेळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांची मात्र येते चांगलीच गोची झाली आहे. आघाडी धर्म पाळायचा तर मुश्रीफ यांच्या पाठीशी राहण्याशिवाय पर्याय नाही. परंतु यापूर्वी भाजपाने सातत्याने मुश्रीफ यांना विरोध केला आहे. आता मात्र मुश्रीफ यांचा प्रचार करण्याशिवाय पर्याय दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची अवस्था फारशी वेगळी नाही. सातत्याने दहा वर्षे समरजीत यांना विरोध करणारे कार्यकर्ते आता समरजीत यांचा प्रचार करताना दिसतील.
राधानगरीमध्ये शिवसेना उ.बा.ठा.चे कार्यकर्ते गेली दहा वर्षे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारामध्ये होते. आता कदाचित त्यांना के.पी. पाटील किंवा ए. वाय.पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने विधानसभेला बंडखोरी करून एखादा भाजपा उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता मावळल्याने भाजपा कार्यकर्त्यांना आबिटकर यांना साथ द्यावी लागणार आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघाला कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघ जोडला गेला आहे. महायुतीतून राजेश पाटील यांना उमेदवारी निश्चित असली तरीही भाजपाचे कार्यकर्ते आघाडी धर्म पाळणार का ? असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती सध्या दिसत आहे. भाजपाचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांच्या पाठीशी भाजपा कार्यकर्ते राहतील असे चित्र दिसत आहे. तर गत वेळी आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारात पुढाकार घेणारे व सध्याचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना यावेळी मात्र त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही .
एकंदर तालुक्यात सर्व राजकीय समीकरणे बदलू लागले असून विधानसभा निवडणूक निकालानंतर तालुक्यात एक वेगळेच राजकीय चित्र पहावयास मिळणार आहे.
काँग्रेस अलबेल…
या तीनही मतदार संघामध्ये काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता दुरावल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आघाडी धर्म पाळण्यात कोणतीच अडचण सध्या तरी दिसत नाही. जो उमेदवार महाविकास आघाडी कडून निश्चित होईल त्याच्या पाठीशी ताकतीने काँग्रेस राहील असे चित्र दिसते.
समरजीत यांना फायदा…?
राज्यातील राजकीय तडजोडीमध्ये महायुतीतील कागल विधानसभा मतदारसंघातील जागा मंत्री मुश्रीफ यांना गेल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ या चिन्हावर सामोरे जाणाऱ्या समरजीत यांना याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कोणत्याही परिस्थितीत समरजीत यांना आमदार करण्यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्नशील असणारे भाजपा कार्यकर्ते यावेळी जरी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी घेत असले तरीही त्यांच्या पाठीशी राहतील असे दिसत आहे. समरजीत यांच्या भूमिकेबद्दल भाजपा कार्यकर्त्यांमधून उलट- सुलट विधाने होत नाहीत यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत.

एसटीचा बंद… विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल
वडाप फार्मात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंद मुळे आजरा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, गणेशोत्सव बाजारासाठी आलेले तालुकावासीय व चाकरमान्यांचे काल मंगळवारी चांगलेच हाल झाले.
सकाळच्या सत्रामध्ये एसटी सुरू असल्याने शालेय विद्यार्थी व तालुकावासीय मोठ्या संख्येने आजरा येथे आले होते. दुपारनंतर मात्र सर्वच संघटना या संपामध्ये सहभागी झाल्याने बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. परंतु एसटी सुरू होणार नाही हे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी हळूहळू पर्याय शोधण्यास सुरुवात केली. शाळा सुटल्यानंतर मात्र विद्यार्थी वर्गाची मोठी अडचण झाली कांही पालकांनी दुचाकी व अन्य वाहनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना घरी नेले तर बाजारहाटीसाठी आलेल्या नागरिकांनी वडाप चा आधार घेतला.एकंदर एसटीच्या बंदमुळे काल दिवसभर नागरिकांचे मोठे हाल झाले.
गडहिंग्लजसह ठीकठिकाणचे खाजगी वाहतुकीचे दर वाढले
एसटी बंद मुळे वडापचालकांची मात्र चांदी झाली. तालुक्यातील खेड्यापाड्यासह महागाव, नेसरी गडहिंग्लज व इतर मार्गावरील वडापचालकांनी मनमानी पद्धतीने दर आकारून प्रवाशांची चांगलीच लूट केली. एसटीचा संप वडापचालकांच्या पथ्यावर पडत असल्याची दिसते.


प. पू. श्री. लक्ष्मणबुवा महाराज सप्ताह सोहळ्याला १३ पासून प्रारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील श्री विठोबा देव नबापूर ट्रस्टच्यावतीने प. पू. श्री लक्ष्मणबुवा महाराज मोरजकर महाराज सप्ताह दि. १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. दि. १३ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हा सप्ताह होत असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता महाराजांच्या पोथीचे श्री विठ्ठल मंदिर येथे प्रयाण, दुपारी १२ वाजता भक्त मंडळींसह समाधीस्थळी महाराजांना आमंत्रण देण्यात येणार आहे. सप्ताहकाळात रात्री ९ ते ११ या वेळेत आजरा शहरातील भजनी मंडळांचे भजन तर त्यानंतर जागर भजन होणार आहे. चांदेवाडी, सुलगांव, बोलकेवाडी, गांधीनगर, चित्रानगर, आवंडी वसाहत, पारेवाडी, सोहाळे, मसोली येथील भजनी मंडळांच्या भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
गुरूवार दि. १९ रोजी सायंकाळी ६ वाजता अजित तोडकर व सहकाऱ्यांचा भक्तीरंग हा भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागरानिमित्त यादिवशी रात्री १० वाजता ह. भ. प. आनंदराव घोरपडे महाराजांचे किर्तन होणार असून त्यानंतर सीमाभागातील भजनी मंडळांचे भजन होणार आहे.
शुक्रवार दि. २० रोजी दुपारी १२ वाजता महाराजांचे पालखीने( दिंडी ) समाधीस्थळी प्रयाण होणार असून दुपारी २ वाजता प्रसाद वाटप होणार आहे. २.३० वाजता पालखी नगर प्रदक्षिणा सोहळ्याला सुरूवात होणार असून नबापुर, शिवाजीनगर, मेन रोड, सुभाष चौक, आजरा अर्बन बँक चौकातून सायंकाळी ६ वाजता किल्ल्यातील विठ्ठल मंदिर, ६.३० वाजता राम मंदिर, ७ वाजता ग्रामदैवत रवळनाथ मंदिरातून पालखी विठ्ठल मंदिरात पोहोल्यानंतर ९.१५ वाजता वीणा उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि. २१ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून रात्री १० वाजता तांदळाचा प्रसाद होणार असून रात्री १२ वाजता महाराजांचे स्वगृही आगमन होणार असल्याचे ट्रस्टी सुभाष मोरजकर यांनी सांगितले.


समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
मुश्रीफांचं वाढलं टेन्शन !!

कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकात आज ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आणि तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येत्या कागल विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे यांच्यात आता लढत निश्चित झाली.
काल कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात राष्ट्रवादी मेळावा आणि समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या भाषणात समरजित घाटगे म्हणाले, “आज आपल्या देशाचे नेते शरद पवारसाहेब उपस्थित आहेत. येत्या काळात कागल-गडहिंग्लजमध्ये परिवर्तन घडवण्याची आज मुहुर्तमेढ रोवली.
जयंत पाटील म्हणाले की, पावसामुळे काय होणार? त्यावेळी मी त्यांना म्हणालो, ‘जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त लोकं तुमच्यासमोर येणार’ गैबी चौकामध्ये २००९ मध्ये सदाशिवराव मंडलिकांचा रेकॉर्ड आजच्या सभेने केला हे मी अभिमानाने सांगतो. शरद पवारस सभेला आले तो या समरजित घाटगेंना जो मान-सन्मान मिळतो, तो तुमच्यामुळे मिळतो. राष्ट्रवादीत अनेक प्रवेश होतील. मात्र, हा पहिलाच प्रवेश असा आहे, जिथे सभा घेऊन शरद पवारसाहेब पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करत आहेत.
याआधी घाटगे हे गेली दहा वर्षे भाजपच्या माध्यमातून विधानसभेची तयारी करत होते. २०१९ च्या निवडणुकीत कागलची जागा शिवसेनेला गेल्याने घाटगे अपक्ष लढले आणि त्यांनी ८८ हजार मते घेतली. गेल्यावेळी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत राष्ट्रवादीत फूट पडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत आले. त्यामुळे पुन्हा एकदा पंचाईत झालेल्या घाटगे यांनी यावेळची निवडणूक अपक्ष न लढता कोणत्या तरी पक्षांकडून लढण्याचे संकेत दिले होते. २३ ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.
काल त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
(बातमी सौजन्य : online news service)




