

टोल प्रश्नी
तालुकावासीय आक्रमक…
बैठकीच्या लेखी हमीनंतर आंदोलन स्थगित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात संकेश्वर – बांदा मार्गावर मसोली नजीक उभारण्यात येणाऱ्या टोलला तालुकावासीयांचा विरोध आहे. संपूर्ण तालुकावासीयांना टोल मधून माफी मिळावी अशा आग्रही भूमिकेकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने हा प्रश्न जोपर्यंत निकालात निघत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे हस्तांतरण करण्यात येऊ नये अशी भूमिका घेत आज टोलनाक्यावर टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, मुळातच तालुका वासियांना विश्वासात न घेता केवळ राष्ट्रीय महामार्ग हे नाव देऊन रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्याची मागणी कोणीही केली नसताना रस्ता तयार करण्यात आला असून आता टोल लादण्याचा जबरदस्तीने प्रयत्न होत आहे. आमदार व मंत्र्यांनी वरिष्ठ मंडळींशी बैठक घालून देण्याच्या आश्वासन दिले होते परंतु बैठकी मागील आंदोलनास दोन महिन्याचा कालावधी होत आला तरीही अद्याप झालेली नाही.

जोपर्यंत टोल मुक्तीची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत बैठक घेण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
असे दिले आंदोलकांना पत्र…
आजरा येथील प्रस्तावित टोल नाक्यावरून जाताना आजरा तालुक्यातील सर्व वाहनांना टोल मुक्ती देणेकामी प्रस्ताव मा. मुख्य अभियंता, NH/ PWD व प्रादेशिक अधिकारी, NHAI मुंबई यांना सादर करणेत येईल व त्याची प्रत आपणास देण्यात येईल. तसेच वरिष्ठ कार्यालयाशी लेखी व तोंडी संपर्क साधून आतच्या आंदोलनामधील प्रतिनिधी बैठक लवकरात लवकर आयोजित करून आपणास अवगत करण्यात येईल तसेच आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सदरील बैठक पार पडेपर्यंत टोल संदर्भातील कार्यवाही थांबविणेत येईल.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर.बी. शिंदे, अनिल पाटील, रोहन भंडारे, देवेन आपटे यांनी चर्चेत भाग घेतला.

आंदोलन प्रसंगी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, परशुराम बामणे, संजयभाऊ सावंत, दिगंबर देसाई, रणजीत देसाई, रशीद पठाण, रणजीत सरदेसाई, पांडुरंग सावरतकर, प्रभाकर कोरवी,जयसिंग खोराटे, महादेव पोवार, राजू होलम, अनिल फडके, शिवाजी गुरव,संजयभाई सावंत, डॉ. उल्हास त्रिरत्ने, कॉ. शांताराम पाटील,डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. रोहन जाधव,अनिरुद्ध केसरकर, राजेंद्र सावंत, युवराज पोवार, डॉ. सागर पारपोलकर, दयानंद भोपळे, दिनेश कांबळे, तानाजी देसाई,विक्रम देसाई, अमित सामंत, दिनकर जाधव, किरण के.के., वाय. बी. चव्हाण, पद्मिनी पिळणकर ,प्रकाश मोरुस्कर ,जावेद पठाण, काशिनाथ मोरे, नारायण भडांगे, मारुती कांबळे, गुरुदत्त गोवेकर, संजय घाटगे, गौरव देशपांडे, राजू विभुते, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मारुती कांबळे यांचे गीत गायन
आंदोलन प्रसंगी एम.आर. कांबळे यांनी टोलविरोधातील गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.
अनेकांनी फिरवली पाठ…
आजच्या आंदोलनास मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहतील अशी शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची नेटकी तयारी केली होती. परंतु अनेक पक्षांच्या, संघटनांच्या नेतेमंडळींसह तालुकावासीयांनी सोयीस्कररित्या या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने अशा अनुपस्थित मंडळींच्या भूमिकेबाबत उलट सुलट चर्चा होती.

शहरात पोलिसांचे संचलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात श्री गणेशोत्सव , दहिहंडी उत्सव, इद ए मिलाद व तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी, सण उत्सव शांततेमध्ये पार पडावे, उत्सवामध्ये सलोखा शांतता रहावी, उत्सवा दरम्यान गैरकृत्य घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरीता आजरा शहरामध्ये संभाजी चौक बाजार पेठ- सुभाष चौक- शिवाजी पुतळा- अर्बन बँक चौक- वाडा मजिद- व्यंकटेश गल्ली राईलस मिल असे पायी संचलन/ रुट मार्च करण्यात आले.
सदर संचलनात गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, गडहिंग्लज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन सलगर, नेसरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर आजरा पोलीस ठाणे, ३ पोलीस उपनिरीक्षक, विभागातून ५० अंमलदार, पोलीस मुख्यालय कडील १ स्ट्रायकिंग फोस, ५ पोलीस वाहने, ॲब्युलन्स, फायर ब्रिगेड वाहने असे सहभागी झाले होते.

आजरा अर्बन बँकेच्या कल्याण शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) बँकेच्या ३४ व्या कल्याण शाखेचे श्री. मोरेश्वर श्रीराम भोईरसो माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उपाध्यक्ष भाजपा कल्याण यांचे हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन श्री. रमेश गुरुलिंगआप्पा कुरुणकर होते तर श्री.अशोकअण्णा चराटी प्रमुख, अण्णा भाऊ संस्था समूह व संचालक, उपाध्यक्ष, भाजपा कोल्हापूर जिल्हा श्री. संतोष डावखर, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व श्री. शिवाजी पाटील अध्यक्ष, भारतीय जनता माथाडी जनरल कामगार प्रमुख उपस्थिती होते.
उद्घाटन प्रसंगी श्री. अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या स्थापनेपासूनची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आपल्या बँकेकडे महिलांच्या खात्यावर २१ लाख २४ हजार इतकी रक्कम जमा झाली असून या योजनेच्या सर्व सुविधा आपल्या बँकेकडे असून त्याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी विनंती केली. तसेच भविष्यात पनवेल शाखा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असलेचे सांगितले.
माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उपाध्यक्ष भाजपा कल्याण श्री. मोरेश्वर श्रीराम भोईर यांनी आपल्या भाषणात बँकेच्या प्रगतीचा उल्लेख केला असून आजरा बँकेच्या कल्याण शाखेमुळे आपल्या परिसराचा नकीच आर्थिक विकास होईल असे मत व्यक्त केले.

श्री. शिवाजी पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये वसई-विरार भागामध्ये बँकेची शाखा काढावी त्याकरिता लागणारे सर्वतोपरी सहकार्य करू असे संगितले.
उदघाटन प्रसंगी व्हा. चेअरमन मा.श्री. सुनिल मगदुम व श्री. सुरेश डांग, श्री. विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, श्री.किशोर भुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील, श्री. संजय चव्हाण,ॲड. सचिन इंजल, श्री. मनोहर कावेरी, श्री. जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे चेअरमन श्री. रमेश कुरुणकर यांनी बँकेचा पूर्ण आढावा घेवून सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक श्री. तानाजी गोईलकर यांनी केले तर आभार बँकेचे संचालक श्री. विलास नाईक यांनी मानले.

मंबईत गिरणी कामगारांना हक्कचे घर मिळाले पाहीजे : काॅ.शांताराम पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गिरणीकामगारना मुंबई बाहेर दिल्या जाणाऱ्या घराचा जी आर रद्द करून, शासनाने मंबईत गिरणी कामगारांना हक्काची घरे देवून पुनर्वसन करावे असे आवाहन काॅ. शांताराम पाटील यानी गिरणीकामगारांच्या बैठकीत केले. प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले.
काॅ.शांताराम पाटील यांनी पुढे बोलताना म्हणाले गिरणी कामगार आज नाही उद्या घर मिळेल, या आशेवर जगत आहेत तर बहुतांश गिरणीकामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना व कामगारांना वेळेत घरे मिळण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. तसेच आमदार प्रकाश आबिटकर यांनी बोलावलेल्या गारगोटी कुर येथील मेळाव्यात मा. आमदार सुनिल राणे यांनी मुंबई एनटीसीच्या जागेत गिरणी कामगारांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप कोणतीही हालचाल नाही. तसेच शासनाने ही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे पुढील काळात तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आला. यावेळी महादेव होडगे यांनी मत व्यक्त केले,
यावेळी दौलती राणे, जानबा धडाम, आबा पाटील, शांताराम हारेर, मनप्पा बोलके, आनंदा ठोकरे, नंदा वाकर, सत्यवती शेटगे, लक्ष्मण पाटील, काका देसाई ,तुकाराम कासार, मारूती मुरूकटे याच्या सह तालुक्यातील गिरणीकामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार हिंदूराव कांबळे यांनी मांडले.

कार्यक्रम …
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे नवीन इमारतीचे भूमिपूजन
हस्ते… आमदार प्रकाश आबिटकर
वेळ…. सकाळी नऊ वाजता
पाऊस पाणी
आजरा शहरासह तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असून पावसाने उघडीप दिल्याने तालुकावासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. साळगाव बंधाराही वाहतुकीकरीता खुला झाला आहे .आजरा शहर परिसरात गेल्या २४ तासात ३० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.


