mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


बकरी चारण्यावरून मारामारी
एक जखमी, दोघांविरोधात
गुन्हा नोंद

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     चव्हाणवाडी ता. आजरा येथे बकरी चारण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये एक जण जखमी झाला आहे तर दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की…

      काल मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भिकाजी बाबू निंबाळकर हे शेताजवळील रस्त्याकडेला बकरी चारत होते. त्यावेळी नागू रवींद्र साळोखे हा त्यांना बकरी चारण्यासाठी मज्जाव करू लागला. यातून भिकाजी निंबाळकर व साळोखे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नागू साळोखे हा निंबाळकर यांना शिवीगाळ करू लागला व त्याने आपल्या हातातील खुरप्याने निंबाळकर यांच्यावर वार केले. तर साळोखे यांच्यासोबत असणाऱ्या कुंडलिक मारुती बिडकर याने हातातील काठीने निंबाळकर यांच्या डोक्यामध्ये मारहाण करून त्यांना खाली पाडले व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

     याप्रकरणी निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागू रवींद्र साळोखे व कुंडलिक मारुती बिडकर ( रा. चव्हाणवाडी ता.आजरा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

ग्राहकांच्या उन्नतीसाठी तालुका खरेदी विक्री संघ कटीबद्ध : अध्यक्ष विठ्ठलराव देसाई

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका शेतकरी संघाचा कारभार सचोटी व काटकसरीने सुरू असून सभासद व ग्राहकांच्या उन्नतीसाठी कटिबध्द असल्याचे आजरा तालुका शेतकरी खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई यांनी सांगीतले.

     येथील डॉ .जे. पी. नाईक सभागृहात तालुका संघाची ६५ वी वार्षिक सभा उत्साहात झाली. अध्यक्ष विठ्ठलराव देसाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी अध्यक्ष देसाई यांनी संघाला ८ लाख १० हजार ५५६ रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा केली.

     उपाध्यक्ष गणपती सांगले यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. व्यवस्थापक जनार्दन बामणे यांनी नोटीस, आर्थिक व नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. सर्फनाला प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करणारे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अभिनंदनाचा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई तर या प्रकल्पाला प्रशासकीय मंजूरी मिळवून देणारे माजी मंत्री भरमू पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव उदयराज पवार यांनी मांडला. उत्तूर येथे ६० खाटांचे आयुर्वेदीक दवाखाना मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अभिनंदनाचा ठराव जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी मांडला. ७ एचपीच्या आतील वीज बील माफ केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव सुभाष देसाई यांनी मांडला.

      तानाजी देसाई यांनी दाणेदार मिश्र खत कारखाना उभा करण्याची मागणी केली. शासनाने कच्चा मालाला परवानगी दिली तर खत निर्मिती कारखाना उभा केला जाईल असे जिल्हा बँक संचालक श्री. देसाई यांनी सांगीतले. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन तर संचालक दौलती पाटील यांनी आभार मानले.

     सभेस जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे,विष्णुपंत केसरकर, दिगंबर देसाई, शिवाजी नांदवडेकर,राजू मुरकुटे, सौ.राजलक्ष्मी देसाई, सौ. मायादेवी पाटील, सुभाष देसाई, दीपक देसाई रणजीत देसाई, अंकुश पाटील, भीमराव वांद्रे, श्रीपती यादव, संभाजी इंजल, मेहताब आगा, बाबु लतीफ, हमीद बुड्डेखान रशीद पठाण, संभाजीराव पाटील,बबनराव पाटील, मधुकर यलगार, गोविंद पाटील, मारुती देशमुख यांच्यासह मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक दौलती पाटील यांनी आभार मानले.

आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पुजन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्यात सन २०२४-२५ गळीत हंगामाकरीता ओव्हरहोलींगचे काम गतीने सुरू असून कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. मधुकर कृष्णा देसाई यांचे हस्ते मील रोलर पुजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

     या प्रसंगी बोलताना चेअरमन श्री. वसंतराव घुरे यांनी आगामी सन २०२४-२५ चा गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर २०२४ मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी ओव्हर होलींगची कामे गतीने सुरू आहेत. कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४-२५ करीत्ता ८००० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. येत्या गळीत हंगामात ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे. त्यादृष्टीने मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असुन मिल रोलर पुजन केले आहे. ३० सप्टेंबर २०२४ पुर्वी कारखाना ओव्हरहोलिंगची कामे पुर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे.

      येणा-या गळीत हंगामासाठी ३५० बीड व लोकल तोडणी वाहतुक यंत्रणा कारखान्याने भरलेली आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापना मार्फत केले जात आहे अशी माहिती दिली.

      यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा बॅंक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक श्री.विष्णूपंत केसरकर, श्री. मुकुंदराव देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री.अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री. रणजित देसाई, श्री. संभाजी रामचंद पाटील, श्री.शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरुकटे, श्री. राजेश जोशीलकर, श्री. संभाजी दत्तात्रय पाटील, श्री.गोविंद पाटील, श्री. काशिनाथ तेली, श्री. हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम्, सौ. मनिषा देसाई, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक, श्री रशिद पठाण, प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेंजर (टेक्नि.) श्री. संभाजी सावंत, चिफ इंजिनिअर श्री. सुरेश शिंगटे व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन आणि 
बस स्थानकावरील कचऱ्याचा प्रश्न संपुष्टात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     बसस्थानकावरील कचऱ्यासंदर्भात प्रवाशांच्या सुरू असणाऱ्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीने एसटी व्यवस्थापनाला निवेदन दिले होते. त्यानंतर आजरा नगर पंचायतीला याविषयी निवेदन देण्यात आले होते. परंतु यावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नव्हत्या. म्हणून आरोग्य विभागाला सुद्धा अस्वच्छतेमुळे नागरिकांचे व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात असल्याचे निवेदन देण्यात आले.

     शेवटचा पर्याय म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्याचे निर्धारित केले.धरणे आंदोलन घोषित करताच एसटी महामंडळाने दोन दिवसातच अस्ताव्यस्त पसरलेला कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवला. मात्र आजरा नगरपंचायतीच्या वतीने सदर कचरा भरून नेण्यात आला नाही. त्यामुळे बसस्थानकामध्येच धरणे आंदोलन घेण्यात आले.   प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आणि नगरपंचायतीने कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पाठवून दिली.

      पोलीस उपनिरीक्षक कळकुटे, एसटी आगाराचे व्यवस्थापक प्रवीण पाटील आणि मातले, राकेश चौगुले आणि युनुस सय्यद आंदोलन स्थळी उपस्थित होते.

     यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, युवा आघाडी किरण के के, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने,अमित सुळेकर, राहुल मोरे, द्वारका कांबळे, नितीन राऊत, बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष,संदीप दाभिलकर, दशरथ सोनुले, जुबेर माणगांवकर, शेखर देशमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाची कार्यशाळा संपन्न

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संपूर्ण देशभर सुरू झाली असून त्यानुसार सर्व ज्ञानशाखांमधील अभ्यासक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कार्यक्षेत्रांतर्गत बी.ए. भाग – एक मधील समाजशास्त्र विषयाची एक दिवशीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आजरा महाविद्यालय आजरा येथे पार पडली.

      कार्यशाळेचे उद्घाटन समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अर्चना जगतकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटी आजराचे अध्यक्ष श्री. अशोकअण्णा चराटी होते.

       डॉ. अर्चना जगतकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे एकूणच शिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या संरचनात्मक व मूल्यात्मक बदलांचा आढावा घेतला. शिवाय पारंपरिक ज्ञान शाखांसमोर स्पर्धात्मक जगाचे मोठे आव्हान उभे आहे त्यामुळेच समाजशास्त्र विषयाचा नव्याने अभ्यासक्रम तयार करताना विषयाच्या मूलभूत ज्ञानाबरोबरच रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यावर भर असल्याचेही त्या म्हणाल्या.

     अध्यक्ष श्री. अशोक अण्णा चराटी म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे संस्थाचालकांना देखील नव्या आव्हानांना सामोर जावे लागत आहे. विद्यार्थी संख्या, मूलभूत सुविधा व आर्थिक सहाय्य यांची सांगड घालताना नवी आव्हाने उभी राहत असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

     ज्ञया एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. वसंत मोरे, डॉ. आनंद गाडीवड्ड, डॉ. अक्षदा गावडे व डॉ. भाग्यश्री पाटील यांनी साधन व्यक्ती म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन केले. समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. अर्जुन जाधव, डॉ. के. एम. देसाई तसेच प्राचार्य अशोक सादळे, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील हे उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे आयोजन आजरा महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अविनाश वर्धन यांनी केले होते. तर सूत्रसंचालन प्रा. अनुराधा मगदूम यांनी केले.


निधन वार्ता
दत्तू सावंत


        दत्तू आप्पा सावंत रा. मलिग्रे ता.आजरा (वय ८० वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

      रक्षा विसर्जन गुरूवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News…

mrityunjay mahanews

नानासाहेब (बंटी) देसाई यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!