
गळफास घेऊन एकाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दर्गा गल्ली, आजरा येथील झाकीरहुसेन मजीद लतीफ या ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या माडीवर तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
झाकीरहुसेन लतीफ हे बराच वेळ कुटुंबीयांना न दिसल्याने त्यांनी त्यांचा शोध घेतला असता राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी तौफिक झाकीर हुसेन लतीफ यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
मुंगूसवाडीवाडी येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह हिरण्यकेशी नदी पात्रात आढळला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुंगूसवाडी ता. आजरा येथील शामराव नारायण जाधव या ६३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हात्तिवडे येथील पांडुरंग कृष्णा पाटील यांच्या शेताशेजारील हिरण्यकेशी नदी पात्रामध्ये आढळून आला. गेले दोन दिवस शामराव जाधव हे बेपत्ता होते.
जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता बुडून मृत्यू पावलेल्या स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी अजित शामराव जाधव यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
विवाहितेचा छळ प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लाटगाव ता. आजरा येथील सौ. पूजा स्वप्निल दारुटे या २८ वर्षीय विवाहितेचा गाडीसाठी माहेरून पाच लाख रुपयांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या कारणास्तव पूजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती स्वप्नील सुभाष दारुटे यांच्यासह सासू व सासऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास हवालदार सरंबळे करीत आहेत.

आजरा महाविद्यालयात महसूल पंधरवडा साजरा …

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय आजरा येथे ज्युनिअर विभागात शिष्यवृत्ती विभाग व तहसील कार्यालय आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवड्यानिमित्त दाखले वाटप व भरणे संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे , उपप्राचार्य श्री. डी. पी. संकपाळ , अधीक्षक योगेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
निवासी नायब तहसीलदार आजरा, श्री. म्हाळसाकांत देसाई यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात व शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न दाखला, डोमीसाईल दाखला, डोंगरी दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्रे आवश्यक असतात, हे दाखले विद्यार्थ्यांनी वेळेत मिळवले तर शिष्यवृत्ती पासून व शैक्षणिक फी सवलती पासून वंचित व्हावे लागणार नाही, असे सांगितले.
निवडणूक नायब तहसीलदार श्री. निसार शेख यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करणे संदर्भात विविध नमुना फॉर्म संबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महसूल कार्यालयातील मंडळ अधिकारी श्री. जी. बी. पाटील, तलाठी श्री. शिवराज देसाई, महसूल सहाय्यक श्री. खापरे पाटील व सहकारी उपस्थित होते.

आज ‘गोकुळ ‘ ची संपर्क सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ) ची संपर्क सभा आज शुक्रवार दि ९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजता आण्णा भाऊ सभागृह आजरा येथे होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर
संचालिका गोकुळ दुध संघ यांनी केले आहे .
निधन वार्ता
आनंदा गुंजकर

आनंदा दाजीबा गुंजकर (वय ७२) रा. चांदेवाडी यांचे काल सायंकाळी ४.४५ वाजता निधन झाले.ते मुंबई येथील मुरुडे क्रेडिट सोसायटी मध्ये मँनेजर होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,मुलगा ,जावई असा परीवार आहे.


