mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आवंडी वसाहती मधील समाज मंदिर कोसळले

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथील आवंडी वसाहती मधील समाज मंदिर पावसाने कोसळले आहे. वीस वर्षांपूर्वी बांधलेले हे समाज मंदिर गेल्या चार दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे कोसळले असून समाज मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे .

     आजरा तालुक्यात सध्या पावसाने उसंत घेतली असली तरीही गेले आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घरांची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यात पाच घरे पडली असून अन्य कांही घरांची किरकोळ पडझड झाली आहे.

     स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून समाज मंदिर परिसरात येण्यास प्रतिबंध घातला आहे.

३५५ प्रकल्पग्रस्त खातेदार आंबेओहोळ प्रकल्पात जलसमाधीवर ठाम…?
आज आंदोलन

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेज बाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने आंबेओहळ प्रकल्पग्रस्त संतप्त झाले असून त्यांनी याप्रकरणी आज दि. १० जुलै जलसमाधी घेण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून पोलीस प्रशासनाने नोटीस देऊनही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत.

     आंबेओहोळ प्रकल्पात एकूण ८२२ खातेदार आहेत या पैकी ३५५ शेतक-यांना त्यांची कोणतीही मागणी नसताना निवाडयातील सर्व रक्कम उचला व तुम्हाला भरघोस स्वेच्छा पुनर्वसन देवू असे अमिष दाखवून तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांनी तूटपुंज्या रकमेवर शेतक-यांची जमिन संपादन केली आहे व बेकायदेशीर स्वेच्छा निवाडे करुन प्रकल्पग्रस्तांना एकरी एक लाख सात हजार इतके तुटपुंजे स्वेच्छा अनुदान मंजूर केले आहे. परंतु काही सुशिक्षित शेतक-यांनी तात्कालीन अधिका-यांना न जुमानता निवाडयातील रकमेपैकी ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमिन किंवा विशेष आर्थिक पॅकेज एकरी १४ लाख ४० हजार इतकी भरघोस अनुदान मिळालेले आहे.

      प्रकल्प एक निवाडा एक जमिनीही एकच मग स्वेच्छा पुर्नवसन व आर्थिक पॅकेज याच्यात एवढा फरक का असा प्रश्न शेतक-यांना पडल्यानंतर यातील जवळ जवळ २०० लोकांनी याबाबत उच्चन्यायालय, मुंबई येथे अनेक दावे दाखल केले होते. यावर मुंबई उच्चन्यायालयाने ते प्रकल्पग्रस्त आहेत का हे तपासा व असतील तर त्यांचे ६५ टक्के रक्कम भरून घ्या असा आदेश केला असतानासुध्दा तत्कालीन जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

     तसेच याबाबत मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी अनेक बैठका घेवून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासन याबाबत कोणताच निर्णय घेण्यास तयार अथवा जबाबदारी घेत नाही. या पार्श्वभूमीवर ३५५ प्रकल्पग्रस्त खातेदार यांनी आज दि.१० जुलै २०२४ रोजी आंबेओहोळ प्रकल्पात सविनय पध्दतीने जलसमाधी घेणार असल्याचे लेखी पत्र यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

      शंकर पावले, संजय येजरे,पांडुरंग पाटील, जोतिबा गुरव, संभाजी पाटील, शिवाजी खवरे, विलास पाटील, विश्वनाथ आजगेकर आदी मंडळी आंदोलनावर ठाम आहेत.

इशारा  ‘अन्याय निवारण ‘चा…
कसोटी नगरपंचायत कर्मचाऱ्यांची…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भारत नगर, आझाद कॉलनी परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने स्थानिक नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अन्याय निवारण समितीने गुरुवारी या वसाहती मधील चिखल ट्रॅक्टरने नगरपंचायतीत ओतण्याचा निर्णय घेतला होता. तसे लेखी पत्र नगरपंचायत प्रशासनास देण्यात आले होते.

      याची तातडीने दखल घेत नगरपंचायतीच्या वतीने भारत नगर व आझाद कॉलनी येथे रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुळातच येथे यापूर्वीचे डांबरीकरण अथवा सिमेंटचे रस्ते नसल्यामुळे मुरूम टाकून ते पसरताना नगरपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

     अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष विजय थोरवत, वाय बी चव्हाण, गौरव देशपांडे, दिनकर जाधव ज्योतिप्रसाद सावंत आदींनी या परिसराला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.

टोल हटाव’साठी २२ रोजी आंदोलन ‘टोलमुक्ती संघर्ष’ च्या बैठकीत निर्णय 

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गावरील टोल हटावसाठी येत्या सोमवारी भुदरगड प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन दि. २२ जुलै रोजी आजरा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय येथील टोलमुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

     यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, खरे तर हा राज्यमार्गच असल्याने टोलचा संबंध येत नाही. जनतेतून उठाव होण्याची गरज आहे. ग्रामसभांचे ठराव व वेळ पडली तर प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनाची गरज आहे.

     डॉ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले, टप्प्याटप्प्याने आंदोलन तेवत ठेवण्याची गरज आहे. लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. बंडोपंत चव्हाण म्हणाले, १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून ठराव घेणेत यावा. जुबेर चाँद यांनी एकजूट होऊन आक्रमकता दाखवण्याची गरज असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी विजय थोरवत, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे, रशिद पठाण, दशरथ अमृते, प्रकाश मोरुसकर, रणजित सरदेसाई, काशीनाथ मोरे, अरिफ खेडेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी मुकुंदराव देसाई, शांताराम पाटील, रवींद्र भाटले, पांडुरंग सावरतकर आदी उपस्थित होते.

आजर्‍यात तंबाखुमूक्त शाळा अभियान
तालुकास्तरिय कार्यशाळा संपन्न

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भावी पिढी आरोग्यसंपन्न व निरोगी रहावी याससाठी राज्यशासनाचा शिक्षण विभाग , आरोग्य विभाग व राष्ट्रिय तंबाखु नियत्रंण समिती मार्फत संपुर्ण राज्यभर प्राथमिक , माध्यमिक शाळास्तरावर हा उपक्रम राबवला जातो नविन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच या उपक्रमाची सुरुवात जिल्हास्तरावरुन करण्यात आली आहे. आजरा तालुकास्तरावरील कार्यशाळा आजरा तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली.

      कार्यशाळेसाठी सुनित चंद्रमणी, शिक्षण विस्तार अधिकारी हे प्रमुख उपस्थित होते सुरवातीला तालुका समन्वयक संजय मोहिते यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. त्यानंतर सलाम मुंबई फाऊडेशन चे रवी कांबळे यांनी तंबाखुमुक्त शाळेचे नऊ निकष , आॉनलाईन माहिती भरणे याबाबत सविस्तर माहिती दिली.

      चंद्रमणी यांनी या उपक्रमाची शाळास्तरावर का गरजेची हे तंबाखु सेवनाचे दुषपरिणाम व कर्करोग याबाबत लहानपणी मार्गदर्शन करणेबाबत शाळास्तरावर प्रयत्न व्हावेत असे सांगितले.

      यावेळी तज्ञ मार्गदर्शक गिरिधर रेडेकर यांनी आॉनलाईन माहिती अँपवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक करणारे जगन्नाथ सुतार , निवृती मिटके , श्री. कुंभार, बी आर सी चे श्री माने , श्री. कापसे व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक , व शिक्षक उपस्थित होते

       जगन्नाथ सुतार यांनी आभार मानले .


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रा. संजय मंडलिक हेच योग्य उमेदवार

mrityunjay mahanews

राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!