

मोटरसायकल चोरी प्रकरणी आजऱ्यातील दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कोल्हापूर येथून नंदू हणमंतराव नाईक रा. गांधीनगर, आजरा याने चोरी करून आणलेल्या मोटरसायकलची नंबर प्लेट बदलून ती विनोद विलास गिरी रा. पटेल कॉलनी याला वापरण्यासाठी दिली. सदर मोटरसायकल चोरी प्रकरणी आजरा पोलिसांत विनोद गिरी या मोटरसायकल वापरणाऱ्यासह मोटरसायकलची चोरी करणाऱ्या नंदू नाईक याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल तराळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की…
नंदू नाईक याने सदर बजाज कंपनीची मोटरसायकल कोल्हापूर येथून चोरून ती आजरा येथे आणली व तिची नंबर प्लेट बदलून ती विनोद गिरी याला वापरावयास दिली. तराळ यांना याप्रकरणी संशय आल्याने सदर मोटरसायकलच्या कागदपत्रांची चौकशी करता कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत .चेस नंबर वरून अधिक तपास केला असता सदर मोटरसायकलची नंबर प्लेट व मूळ नंबर यामध्ये तफावत आढळून आली. पोलिसांनी सदर मोटरसायकल ताब्यात घेतली असून दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास हवालदार संतोष गस्ती करीत आहेत.

चर्चा होणार… मोर्चाही निघणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोमवार दिनांक २४ जून रोजी टोलविरोधी निघणाऱ्या सर्व पक्षीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सदर बैठकांना उपस्थित रहायचे परंतु कोणत्याही परिस्थितीत २४ जूनचा मोर्चा यशस्वी करायचा असा निर्धार आजरा येथे झालेल्या टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. मोर्चा बाबतची लेखी निवेदनही निवासी तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना देण्यात आले.
मोर्चाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.यावेळी झालेल्या चर्चेत कॉ. संपत देसाई,परशुराम बामणे, सुधीर देसाई, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, गुरु गोवेकर आदींनी भाग घेतला.
बैठकीस पंचायत समिती माजी सभापती उदय पवार, मुकुंदराव देसाई, रणजीत देसाई, बंडोपंत चव्हाण, वाय.बी. चव्हाण, काशिनाथ मोरे, संतोष मासोळे, यशवंत इंजल, रवींद्र भाटले, जोतिबा आजगेकर, पांडुरंग सावरतकर, रशीद पठाण, राजू विभुते, ज्योतिप्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
कांही मंडळींच्या भूमिका संशयास्पद…
टोल विरोधी मोर्चाच्या हालचाली सुरू झाल्यापासून काही मंडळी, पक्षीय कार्यकर्ते या बैठकांपासून दूर राहताना दिसत आहेत. तर कांही मंडळी उलट सुलट चर्चा करताना दिसत आहेत. या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या लोकप्रतिनिधींना भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही बैठकीत देण्यात आला आहे.

नूतन खासदार शाहू छत्रपती आज आज-यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा आज गुरुवार (दि. २०) रोजी आजरा येथे आभार दौरा आयोजित केला आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी नूतन खासदार शाहू महाराज व आमदार पाटील हे जनतेशी संवाद साधणार आहेत. यामाध्यमातून ते आजरा तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच नूतन खासदार शाहू छत्रपती हे तालुक्यात येत असून तरी तालुक्यातील जनतेने दुपारी ३.०० वाजता श्रीमंत गंगामाई वाचनालयात उपस्थित रहावे असे आवाहन इंडिया आघाडीचे समन्वयक रवींद्र भाटले यांनी केले आहे.

आजरा महाविद्यालयाचे MHT-CET मध्ये यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन २०२३-२४ मध्ये घेतलेल्या MHT-CET परीक्षेत आजरा महाविद्यालयाने
उत्तुंग यश मिळवले आहे.
या परीक्षेत तांबेकर संकेत प्रकाश याने ९८.३३ परसेंटाईलज मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच देशपांडे तुषार रघुनंदन याने ९५.४७ मिळवून द्वितीय व कवठणकर करण गजानन याने ९५.०३ मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच निर्मळे नारायण दादा ९४.३८, जाधव अंकीता शिवाजी ९३.३८. टोपले गिरीष अजित ९३.२४, घडाम रिया हरी ९२.६६, कालेकर समृद्धी बाळासाहेब ९१.०४, आजगेकर अर्पिता अरुण ९०.६८, निर्मळे सार्थक सचिन ८९.४५. लमतुरे अफान इरफान ८९.१६ या विद्यार्थ्यांनीही यश मिळविले आहे.
आजरा महाविद्यालयात गेली दोन वर्षे MHT-CET साठी स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते. अल्पावधीतच आजरा महाविद्यालयाने हे उत्तुंग यश मिळविले आहे. त्यामुळे सर्व थरांतून महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे.
श्रीमती राजमाने आर.एस., श्रीमती कुलकर्णी एस.एस., श्रीमती. कुंभार जे.एम., श्रीमती. सावंत एस.एस. सुरुंगले ए.ए., गावडे बी.व्ही., गिलविले एस. एस., श्रीमती कांबळे ए.ए. गाईगडे एस.व्ही., मस्कर आर.टी. या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

