
टोलप्रश्नी मोर्चापूर्वी हालचाली सुरू
उद्या आजऱ्यात तर सोमवारी कोल्हापुर येथे बैठक
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
टोल वसूलीतून आजरा तालुक्याला मुक्त करावे या मागणीसाठी आजरेकर एकवटले असून सोमवार दिनांक २४ जून रोजी सर्वपक्षीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुकावासीय टोल भरणार नाहीत या भूमिकेवर ठाम राहून सदर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
सोमवारी जिल्हाधिकारी दालनात पालकमंत्री मुश्रीफ यांची बैठक
संकेश्वर- बांदा रस्त्यावर आजरा औद्योगिक वसाहतीजवळ टोल नाक्याची उभारणी केली जात आहे. भविष्यात टोल वसुलीमुळे स्थानिक नागरीकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. महामार्ग टोल वसूलीतून आजरा तालुक्याला मुक्त करावे या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गटाच्या) पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. याबाबतचे निवेदन देण्यात आले. याबाबत सोमवार (ता. २४) जिल्हाधिकारी दालनात बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही मुश्रीफांनी दिली आहे.
संकेश्वर ते बांदा या महामार्गाचे काम चालू आहे या महामार्गावर आजरा शहराजवळ एम.आय.डी.सी. जवळ टोल नाक्याचे काम चालू आहे. या टोल नाक्यामुळे तालुक्यातील आजरा ते किटवडे या गावातील नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. आजरा शहरात शासकीय कार्यालय, वैद्यकिय सेवा, शाळा, महाविद्यालये असल्याने या मार्गावरून ये- जा करावी लागते. याशिवाय आजरा कारखाना गवसे येथे असलेने हंगामात ऊसाच्या वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दड बसणार आहे. गेले दोन महिने शिवसेना व अनेक पक्ष संघटना व आजरा तालुक्यातील नागरिकांनी या टोलला तीव्र विरोध दर्शविला आहे. जनभावना लक्षात घेऊन पालकमंत्री या नात्याने आजरा तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व आजरा तालुक्यातील नागरिक यांची संयुक्त बैठक लावून या सर्व नागरिकांना टोलमुक्त करावे. अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, तालुका प्रमुख युवराज पोवार, अमीत गुरव, महेश पाटील, राजकुमार भोगण उपस्थित होते.
आम.आबिटकर यांनी बोलवली उद्या बैठक
आजरा टोल माफी व संकेश्वर ते बांदा रस्त्याच्या कामकाजाबाबत गुरुवार २० रोजी दुपारी १२. १५ वाजता तहसील कार्यालय येथे बैठक आम.प्रकाश आबिटकर यांनी बैठक बोलावली आहे.
शिवसेना व अन्याय निवारण समिती ने आमदारांची भेट घेऊन बैठकीची मागणी केली होती. याची दखल घेऊन बैठक आयोजित केली आहे.या बैठकीला महसूल नॅशनल हायवे व टोल प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, टोल विरोधी कृती समिती यांच्यासह सर्व गावचे सरपंच आणि ज्यांच्या जमिनी गेलेत अशा सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना(शिंदे गट) तालुका प्रमुख संजय पाटील यांनी केले आहे.

रामतीर्थ परिसरामध्ये वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दिनांक १० जून २०२४ ते २४ जून २०२४ या पंधरवडा कालावधीमध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आजरा महाविद्यालय आजरातील एन. सी. सी. व एन.एस.एस. विभाग, हत्ती हाकारा ग्रुप, सरपंच परिषद आजरा व वन विभाग आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने रामतीर्थ परिसरामध्ये ३०० पेक्षा जास्त देशी रोपांची लागवड करण्यात आली.
यामध्ये वड, पिंपळ, बदाम, लिंबू, जांभूळ, चिंच, ऐन यासारख्या अनेक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्त सरपंच परिषद आजराचे अध्यक्ष जी. एम. पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत आणि वृक्षारोपणासंबंधी मनोगत व्यक्त केले.
या वृक्षारोपणाची सुरुवात आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आजरा वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती स्मिता डाके, वन अधिकारी श्री. बाळेश न्हावी, वनरक्षक तानाजी लटके, आनंदराव पाटील पत्रकार रणजित कालेकर, एन. सी. सी. प्रमुख डॉ. संजय चव्हाण, एन एस एस प्रमुख डॉ. रणजीत पवार तसेच राजू देशपांडे प्रा. मीना मंगरूळकर,डॉ. गौरी भोसले, श्रीमती पुष्पलता घोळसे, श्रीमती बटकडली आणि एन. एस. एस. व एन.सी. सी. चे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. विठ्ठल हाके यांनी उपस्थित आभार व्यक्त केले.

निधन वार्ता
कोसू बार्देस्कर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील शिक्षीका सौ.कोसू पियेदाद मोतीराम बार्देस्कर (वय ५१वर्षे ) यांचे मंगळवार दिनांक १८ रोजी आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा , विवाहित मुलगी, जावई व नात असा परिवार आहे. ग्रामसेवक मोतीराम बार्देस्कर यांच्या त्या पत्नी होत.


