

केवळ इतिहासाच्या भांडवलावर शाहू छत्रपतींची उमेदवारी :प्रा.मंडलिक
आज-यात प्रचार सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ज्या आघाडीला नेताच नाही अशा आघाडीतून केवळ इतिहासाच्या भांडवलावर विरोधी आघाडीच्या उमेदवाराने
वयाच्या ७५ वर्षांनंतर राजकारणात प्रवेश केला आहे. एवढी वर्षे तुम्ही कुठे होता ? सर्वसामान्यांसाठी आतापर्यंत काय केले व पुढे काय करणार हे स्पष्ट करावे असे आवाहन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींना केले.
आजरा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. सभेपूर्वी शहरातून सवाद्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रा.मंडलिक म्हणाले,आम्ही कांही विचारले तर गादीचा अपमान झाल्याचा कांगावा केला जातो. दत्तक गेल्यानंतर मिळालेल्या जमिनी तरी तुम्ही अबाधित ठेवल्या आहेत का ? जर त्यामध्ये घट झाली असेल तर वारसा चालविण्यास योग्य आहात का? अशी टीका महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केली.
खास.धनंजय महाडिक म्हणाले ,६५ वर्षे सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसने केवळ ‘ गरिबी हटांव ‘ हेच म्हणत देशाला मागे नेले.भारतीयांना फसविण्याचे काम काॅग्रेसने केले. घोटाळ्याची मालिका त्यांच्या काळात होती.पंतप्रधान मोदी आल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरू आहे. देशाचा चेहरामोहरा बदलला आहे.विकसित भारताचे स्वप्न त्यांनी दाखवले आहे. ३७० कलम, तीन तलाक कायदा रद्द करण्याबरोबरच स्टार्टअप, नारी सन्मान कायदा, किसान निधी, आवास योजना यासारख्या महत्त्वपूर्ण योजना मोदी सरकारने राबवल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

समरजीतसिंह घाटगे म्हणाले ,राष्ट्रहिताची ही निवडणूक आहे. काॅंग्रेस व मोदी सरकारने केलेली कामे यांची तुलना करुन मते द्या. भारत महासत्ता बनवायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही.मोदी म्हणजेच संजय मंडलिक व संजय मंडलिक म्हणजेच मोदी असे समजून मते द्या.
आम.प्रकाश आबिटकर म्हणाले ,मोदींनी देशाची पिछेहाट थांबवली आहे. ‘ चारसो पार ‘ च्या प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून मंडलिक यांना निवडून देऊन मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहनही केले.
यावेळी राहुल देसाई, माजी मंत्री भरमू पाटील,नागेश चौगुले, अशोकअण्णा चराटी यांची यावेळी भाषणे झाली.
कार्यक्रमास जि. प. सदस्या सौ.सुनीता रेडेकर, संग्राम कुपेकर, विलास नाईक,विजयकुमार पाटील, सुधीर कुंभार, अरुण देसाई, इंद्रजीत देसाई, अनिरुद्ध केसरकर, डॉ. अनिल देशपांडे,राजू पोतनीस ,आनंदा कुंभार , आनंदा घंटे, डॉ.दीपक सातोसकर, मलिककुमार बुरुड, संजय पाटील, जनार्दन टोपले,मारुती मोरे,विजय थोरवत, संतोष भाटले, सुधीर सुपल, सौ.सरिता सावंत, गोविंद गुरव,संजय चव्हाण, सुरेश गड्डी, अश्विन डोंगरे,अभिजीत रांगणेकर, समीर चांद, दिलावर चांद, जुबेर चांद, दशरथ अमृते, सौ. शामली वाघ यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
त्यांना मीच आमदार करणार…
शिवाजीराव पाटील यांना गत निवडणुकीत माझ्यामुळेच पराभव स्वीकारावा लागला यावेळी मात्र चंदगडमधून मीच त्यांना आमदार करणार आणि समरजीत राजेंना कागलमधून आमदार करणार असे अशोकअण्णा चराटी यांनी सांगितले.
ते स्वतःहून आमच्याकडे आले…
आमचं ठरलंय… कोल्हापूरच ठरलंय…मीच केलयं.. ही भाषा त्यांची आहे. गत वेळी आम्ही कुणालाही बोलवले नव्हते. स्वतःहून ते आमच्याकडे आले आमचे ठरलय म्हणाले. पुरोगामीत्वाचा मुखवटा त्यांनी आता बाजूला ठेवावा अशी बोचरी टीका खासदार मंडलिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली.

कर्पेवाडी येथून पावर ट्रिलर चोरीला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कर्पेवाडी ता. आजरा येथून आनंदा बाबुराव कांबळे रा.होन्याळी यांचा उत्तुर- वझरे रोडवर कर्पेवाडी गावामध्ये तानाजी नामदेव कांबळे यांच्या घरासमोर उभा केलेला पॉवर ट्रिलर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. सुमारे दीड लाख रुपये किमतीचा सदर पावर ट्रिलर चोरीला गेल्याबद्दलची फिर्याद आनंदा कांबळे यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कांबळे पुढील तपास करीत आहेत.
आठवडा बाजार करवसुलीतील मनमानी थांबवा…
अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या वतीने ठेकेदारामार्फत आठवडा बाजार कर वसुली केली जाते. सदर कर वसुली मनमानी पद्धतीने केली जात असून आठवडा बाजारामध्ये शेतीमालासह इतर वस्तू व विक्रेत्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याने मनमानी पद्धतीने सुरू असलेली ही कर आकारणी त्वरित थांबवावी अशी मागणी अन्याय निवारण समितीने आजारा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
संबंधित विक्रेत्यांना कर आकारणी पावती दिली जात नाही ती पावती देणे बंधनकारक करण्याबरोबरच वापर करीत असलेल्या जागेच्या क्षेत्रफळानुसारच कर आकारणी असावी.कर वसुली करणाऱ्यांकडे नगरपंचायतीची ओळखपत्र असावे असेही निवारण समितीने सुचविले आहे. या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आठवडा बाजार कर न भरण्याबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन अन्याय निवारण समिती मार्फत मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सचिव पांडुरंग सावरतकर, राजू विभुते, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, अभिजीत संकपाळ,वाय. बी. चव्हाण, दिनकर जाधव, अशोक पोवार उपस्थित होते.
औषध फवारणी करा…
आजरा शहर व इतर वसाहतीमध्ये गटारी तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाला असून याला प्रतिबंध करणे व पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने शहरांमध्ये औषध फवारणी करावी अशी मागणी ही यावेळी अन्याय निवारण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
मंडलिकसाहेब तुमच्याशी कुस्ती खेळण्यासाठी मी सक्षम : संभाजीराजे छत्रपती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मान सन्मानासाठी शाहू छत्रपतींना खासदारकीची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोपासना करणे व संविधान वाचवण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून जनतेने त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. शाहू छत्रपती हे जनतेने ठरवलेले हिंदकेसरी आहेत. प्रथम माझ्याशी मुकाबला करा आणि मगच महाराजांच्या नादाला लागा. तुमच्याशी कुस्ती खेळण्यासाठी मी सक्षम आहे. मागून वार नको आता समोरासमोर याच असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी प्रा.संजय मंडलिक यांना दिला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कासार कांडगाव येथे आयोजित संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, केवळ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून गेल्या पाच वर्षात केंद्रातून तुम्ही किती निधी आणला ? याचे उत्तर एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला द्या. सध्याच्या केंद्रातील सरकारमुळे सर्वसामान्य लोक, शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या भाजपा सरकारने एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढून घेण्याचे धोरण राबवले आहे. महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला पळवून सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा केली आहे. संविधान बदलण्याची भाजपाची धडपड सुरू असून सर्वसामान्य जनता हा डाव निश्चितच हाणून पाडतील असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, गेली दहा वर्षे केवळ चांगल्या दिवसांची चर्चा सुरू आहे. हे चांगले दिवस येणार तरी कधी ? मणिपुर दिड महिने जळत असताना भाजपा सरकार तोंडावर बोट ठेवून आहे. महिलांवर अत्याचार, महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रूधूर, लाठी चार्ज यासारखे प्रकार सुरू असून सरकार विरोधी आंदोलने ठेचून काढण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्ह्यामध्ये तर वन्यप्राण्यांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला विद्यमान खासदारांना वेळ नाही. आता या विद्यमान खासदारांना पराभूत करण्याशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उमेश आपटे, डॉ .नंदाताई बाभूळकर यांनी शाहू छत्रपतींना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन केले.
सभेस कॉ. संपत देसाई रामराजे कुपेकर, श्रीमती अंजनाताई रेडेकर, मुकुंदराव देसाई, अभिषेक शिंपी, संजयभाऊ सावंत, संजय तर्डेकर,नौशाद बुड्ढेखान, सौ. रचना होलम, राजू देसाई, अशोक पोवार, विक्रम पटेकर, रवी भाटले ‘वंचित’ चे संतोष मासाळे, विक्रम देसाई यांच्यासह कासार कांडगाव गाव येथील आप्पासाहेब सरदेसाई, सिकंदर उत्तुरकर, आनंदा जाधव, संग्राम सरदेसाई, शिवाजी मुगुर्डेकर, विनायक सरदेसाई, भिकाजी कांबळे, सदाशिव गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
छत्रपती संभाजीराजे धनगरवाड्यावर…
तालुक्याच्या एका टोकाला असणाऱ्या आवंडी येथील तीनही धनगरवाड्यांना संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली व धनगर बांधवांशी संवाद साधला. यापूर्वी एकाही खासदाराने अथवा माजी खासदाराने या धनगरवाड्यांना भेट दिलेली नसल्याने संभाजी राजे छत्रपती यांच्या भेटीने धनगर बांधव भावूक झाले. अनेकांनी त्यांच्याबरोबर संवाद साधून धनगर बांधवांच्या व्यथा मांडल्या.

महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या मताधिक्यांचा विजयी घडवतील : प्रा. संजय मंडलिक यांचे प्रतिपादन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. यामध्ये विकास काय केला व काय करणार आहे, हे सांगणारी वैचारिक लढाई असताना गादीचा अपमान केल्याचा कांगावा केला जातोय. जिल्ह्यातून दिवसेदिवस मिळणारा वाढता उत्स्फूर्त पहाता विजय निश्चित आहेत . या विजयासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे नेते आपआपल्या पातळ्यावर काम करीत असून सर्वच कार्यकर्त्यांची मोठी ताकद माझ्या मागे उभी आहे हेच सर्व कार्यकर्ते धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोहचवून मोठ्या मताधिक्याचा विजय मिळवून देतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. दाभिल ता. आजरा येथे आयोजित प्रचार सभेत प्रा. मंडलिक बोलत होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षात करून दाखवले. मुद्रा लोन, स्टार्टअप योजना, किसान सन्मान निधी यासारख्या योजना सर्वसामान्यांना दिल्या. त्याचबरोबर देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा उंचावली. देशाला विकासाच्या दिशेने नेण्याकरिता पुन्हा एक वेळ पंतप्रधान मोदी यांना संधी देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया , असे आवाहनही केले.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील यांचीही मनोगते झाली.
आजरा कारखाना चेअरमन वंसतराव धुरे, व्हा. चेअरमन एम. के. देसाई, विठ्ठलराव देसाई, सरपंच युवराज पाटील, शिरीष देसाई, एम.के. देसाई, अनिल फडके, मारुती घोरपडे, विठ्ठलराव देसाई, राजू मुरकुटे, संभाजी तांबेकर, दीपक देसाई ,संभाजीराव पाटील, शिवाजी नांदवडेकर, मधुकर यलगार, सुभाष देसाई, दत्तात्रय पाटील,दौलती पाटील, रवींद्र होडगे, सुरेश होडगे, आदिल फरास कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी केले.
त्यांना मतपेटीतून उत्तर द्या…
काही मंडळी ‘ आमच ठरलय ‘ कोल्हापूरचं ठरलंय… गादीचा मान- अवमान यासह विविध प्रकारची दिशाभूल करणारी विधाने करत आहेत. अशा मंडळींना भावनिक न होता मतपेटीतून योग्य ते उत्तर द्या, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

कामाचा कोण हे जनतेला चांगलेच ठाऊक :
मुकुंदराव देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभेमध्ये जाणारी व्यक्ती ही कामाची असली पाहिजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्याबरोबरच देश कसा चालवायचा हे ठरवणारे संसद हे सभागृह आहे. केवळ निवडून यायचे व ना संसदेत ना मतदार संघात असा पायंडा पाडणाऱ्या खासदारांना पराभूत करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन आजारा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष (शरद पवार) मुकुंदराव देसाई यांनी केले.
छ. शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संभाजीराजे यांच्या गावबैठकांच्या दौऱ्यामध्ये बोलत होते.
कॉ. संपत देसाई म्हणाले, कष्टकऱ्यांचा आवाज दडपण्याचे काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. सरकारची सामान्यांच्या विरोधातील धोरणे पाहून श्रमिक मुक्ती दलाने इंडिया आघाडीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या निवडणुकीत शाहू छत्रपती हे प्रचंड मतांनी विजयी होणार असून मतदानाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
सरोळी येथून दौऱ्याला सुरुवात झाली. या बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून लोक उत्स्फूर्तपणे या बैठकांमध्ये व्यक्त होत आहेत. निंगुडगे, प्रेद्रेवाडी, हात्तीवडे, बोलकेवाडी, मेंढोली, बुरुडे, भटवाडी, चांदेवाडी येथे गाव बैठका झाल्या. यावेळी अंजनाताई रेडेकर, विक्रम देसाई, राजू होलम, संतोष मासाळे, संजय सावंत हे संभाजीराजेंसोबत सहभागी झाले होते.
दुपारच्या सत्रात सोहाळे, साळगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव असा दौरा झाला. यावेळी मुकुंद देसाई, उदय पवार, रणजित देसाई , रवी भाटले,शिवराज देसाई, राजू सावंत, एस. पी. कांबळे उपस्थित होते.



