
आजरा साखर कारखान्यात तालुका संघाची पुनरावृत्ती…
राष्ट्रवादीचे विमान सुसाट

आजरा:प्रतिनिधी
आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तालुका खरेदी विक्री संघाच्या निकालाची पुनरावृत्ती झाली असून राष्ट्रवादीप्रणीत श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांनी विरोधी भाजप राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना व स्वाभिमानीच्या श्री चाळोबा देव विकास आघाडीचा सुमारे ६०० मतांनी धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. ब वर्ग गटातील अशोक तरडेकर हे केवळ चार मतांनी विजयी झाले. विरोधी आघाडीचे पराभूत उमेदवार नामदेव नार्वेकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. फेर मतमोजणीत तर्डेकर हे १४ मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत कारखान्याच्या बहुतांशी विद्यमान संचालकांना पराभवाचा झटका बसला आहे. याचे दूरगामी परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह नगरपंचायत निवडणुकीवर होणार आहेत.
निवडणुक निकाल पाहता कारखान्यावर संचालक म्हणून राजेश जोशीलकर(भादवण), दीपक देसाई (मडीलगे),राजू मुरकुटे(कानोली) काशिनाथ तेली(होन्याळी),, शिवाजी नांदवडेकर(वाटंगी) संभाजी पाटील(हात्तिवडे), रणजीत देसाई(सुलगाव), गोविंद पाटील(घाटकरवाडी), सौ. मनीषा देसाई(वेळवट्टी), सौ.रचना होलम, हरिबा कांबळे(पेरणोली) अशोक तर्डेकर (मलिग्रे) या तब्बल १२ नव्या चेहऱ्यांना संचालक पदाची संधी मिळाली आहे.
मुकुंदराव देसाई विष्णुपंत केसरकर, एम. के.देसाई,वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, अनिल फडके, उदय पवार हे संचालक पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.
शिवसेनेचे संभाजी पाटील हे श्री चाळोबा देव विकास आघाडीतून यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
उमेदवार निहाय मते….
उत्पादक गट नंबर १ (उत्तूर-मडिलगे) :
रवळनाथ विकास आघाडी –
मारुती घोरपडे (उत्तूर) – 8562
दीपक देसाई (मडिलगे) – 8498
वसंतराव धुरे (उत्तूर) – 8753
चाळोबा विकास आघाडी –
प्रकाश चव्हाण (चव्हाणवाडी) – 7038
उमेश आपटे (उत्तूर) – 8073
भिकू गुरव (मडिलगे) – 7360
गट नंबर २ (आजरा-श्रृंगारवाडी गट ) :
रवळनाथ विकास आघाडी –
मुकुंद देसाई(आजरा) – 8691
शिवाजी नांदवडेकर (वाटंगी) – 8040
सुभाष देसाई (सिरसंगी) – 8231
चाळोबा विकास आघाडी –
अशोक चराटी (आजरा) – 7495
अभिषेक शिंपी (आजरा) – 7385
विजय देसाई (वाटंगी) – 7067
अपक्ष –
दिगंबर देसाई (सिरसंगी) – 126
महादेव होडगे (यमेकोंड) – 80
तुळसाप्पा पोवार (देऊळवाडी) – 231
गट नंबर ३ (पेरणोली-गवसे गट ) :
रवळनाथ विकास आघाडी –
उदयराज पवार (पेरणोली) – 8555
रणजीत देसाई (सुलगांव) – 8693
गोविंद पाटील (घाटकरवाडी) – 8351
चाळोबा विकास आघाडी –
राजेंद्र सावंत (पेरणोली) – 6930
दशरथ अमृते (हाळोली) – 7162
सहदेव नेवगे (गवसे) – 7035
अपक्ष –
शांताराम पाटील (दाभिल) – 381
शामराव बोलके (माद्याळ) – 160
गट नंबर ४ (भादवण-गजरगाव गट ) :
रवळनाथ विकास आघाडी –
एम. के. देसाई (सरोळी) – 8800
राजेश जोशीलकर (भादवण) – 8760
राजेंद्र मुरकुटे (कानोली) – 8199
चाळोबा विकास आघाडी –
अजंना रेडेकर (पेद्रेवाडी) – 7717
सुधीरकुमार पाटील (कानोली) – 7123
संजय पाटील (भादवण) – 7243
अपक्ष –
आनंदा पाटील (सरोळी) – 147
गट नंबर ५ (हात्तिवडे-मलिग्रे गट) :
रवळनाथ विकास आघाडी –
विष्णूपंत केसरकर (किणे) – 8926
अनिल फडके (सुळे) – 8524
संभाजी पाटील(हात्तिवडे) – 8788
चाळोबा विकास आघाडी –
सुनिल शिंत्रे (मेंढोली) – 7937
आनंदराव बुगडे (मलिग्रे) – 7312
सुरेश सावंत (कोळिंद्रे) – 7194
बिगर उत्पादक गट (ब वर्ग ) :
रवळनाथ विकास आघाडी –
नामदेव नार्वेकर (पोळगांव) – 1370 (पराभूत)
चाळोबा विकास आघाडी –
अशोक तर्डेकर (मलिग्रे) – 1384 (विजयी)
अनुसूचित जाती जमाती :
रवळनाथ विकास आघाडी –
हरिभाऊ कांबळे (पेरणोली) -10356
चाळोबा विकास आघाडी –
मलिककुमार बुरूड (आजरा) – 9015
इतर मागास :
रवळनाथ विकास आघाडी –
काशिनाथ तेली (होन्याळी) – 9823
चाळोबा विकास आघाडी –
जनार्दन टोपले (आजरा) – 9446
महिला प्रतिनिधी :
रवळनाथ विकास आघाडी –
रचना होलम(पोळगांव) – 9870
मनिषा देसाई (वेळवट्टी) – 10246
चाळोबा विकास आघाडी –
सुनिता रेडेकर (सरंबळवाडी) – 8908
संगीता माडभगत (साळगाव) – 8441

प्रमुख पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे…
शिवसेना ( उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख व विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता रेडेकर, माजी संचालक दशरथ अमृते, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्रसिंह सावंत, भाजपाचे माजी उपसभापती मलिककुमार बुरुड, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष व विद्यमान संचालक जनार्दन टोपले यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, नगरसेवक अभिषेक शिंपी,माजी पं.स. सभापती भिकाजी गुरव, भादवणचे माजी सरपंच व शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील आदींचा समावेश आहे.

सुधीर देसाई यांच्या राजकीय खेळ्या यशस्वी…
तालुका संघातील विजयानंतर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या जोडीने केलेल्या राजकीय खेळ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत यशस्वी ठरल्या. राष्ट्रवादीच्या समर्थक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तयार केलेल्या आघाडीने विजयापर्यंत मजल मारली. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांनी या आघाडीला दिलेले नेटके बळ उपयोगी ठरले.

प्रचारातील विस्कळीतपणाचा विरोधी आघाडीला फटका…
निवडणुक बिनविरोध होणार म्हणून विरोधी आघाडीने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना प्राधान्याने संधी दिली होती. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीने उमेदवार उभे करून विरोधी आघाडीची गोची केली. मतदान प्रक्रियेत हे उमेदवार चालणार नाहीत याची कल्पना असूनही ऐनवेळी त्यांना थांबवणे विरोधी आघाडीला जड गेले. मतदान प्रक्रियेपर्यंत विरोधी आघाडीच्या एकाच मतपत्रिकेवर असणाऱ्या उमेदवारांमध्ये कुठेही सुसूत्रता अथवा समन्वय दिसत नव्हता याचा फटकाही बसला.

सोशल मीडियाने बॅकफुटवर आणले…
या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व त्यांच्या विरोधात आघाडी तयार होईल अशी सुरुवातीला परिस्थिती होती. त्यामुळे सुरुवातीला झालेल्या पत्रकार बैठका, कार्यकर्ते व कामगारांचे मेळावे यामध्ये शिंपी-चराटी, तानाजी देसाई, संजय पाटील व अंजनाताई रेडेकर, प्रा. सुनील शिंत्रे आदींनी एकमेकांवर जोरदार आरोप केले होते. अनपेक्षितरित्या ही सर्व मंडळी एकाच आघाडीत आली. विरोधकांनी मात्र या आरोपांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच भांडवल केले. याचाही फटका विरोधी आघाडीला बसला.
जाहीर सभा टाळल्याचाही फटका...
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील व माजी आमदार के.पी. पाटील यांच्या माध्यमातून जाहीर सभांचा धुरळा उडवला. दुसरीकडे मात्र विरोधी आघाडीने जाहीर सभांना बगल दिल्याचे दिसत होते. या आघाडीच्या पाठीशी ठामपणे कोणीही नसल्याचा अपप्रचार यामुळे झाला.आम. सतेज पाटील यांची अण्णाभाऊ सभागृहात झालेली मार्गदर्शन बैठक वगळता इतर कोणीही नेते प्रत्यक्षात निवडणूक चित्रात आले नाहीत. त्यांचीही भूमिका सावध दिसत होती. वातावरण निर्मितीमध्ये ही आघाडी अपयशी ठरली.
आम. आबिटकर यांना धोक्याचा इशारा…
पेरणोली-गवसे व आजरा-श्रृंगारवाडी गटात अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे असणारे वर्चस्व यापूर्वी वेळोवेळी सिद्ध झाले आहे. शिंपी चराती गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या भागाने आम. प्रकाश आबिटकर यांनाही सलग दोन वेळा साथ दिली आहे. कारखान्यात मात्र या भागातील मतदानात झालेली पीछेहाट पाहता आम. आबिटकर यांना हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. या भागातील डॅमेज कंट्रोल करण्याचे आव्हान आम.आबिटकर यांच्यासमोर आहे.


