रविवार
५ जुलै २०२६


बहिरेवाडीत तीन पानी जुगार ; ७ जणांवर गुन्हा दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता बहिरेवाडी येथील बाळू तुकाराम लोहार यांच्या घरात तीनपानी जुगार खेळणाऱ्या सात जणांना रंगेहात ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून रोख रकमेसह सुमारे ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पो.हे.कॉ. पांडुरंग दादू येलकर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वजण बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर. येथील आहेत. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.


आजरा तालुक्यात अतिवृष्टी : नद्यांच्या पाणी पातळीत वाढ : घरांची पडझड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरु आहे. परिणामी शहरवासीयांसह तालुकावाशी यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गवसे येथे घरावर तर सोहाळे येथील अंतर्गत रस्त्यावर झाड पडण्याची घटना घडली. वझरे येथे तानाजी दत्तू पाटील यांच्या घराची भिंत पडली तर नंदाताई भालेकर आनंदा रामचंद्र भालेकर यांच्याही घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे. कांही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला.
आजरा शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाले आहे. गवसे येथील दयानंद डोंगरे यांच्या राहत्या घरावर वादळी वारे व पावसामुळे झाड पडून हजारो रुपयांचे नुकसान झाले. चित्री धरण परिसरात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या गेल्या २५ तासात ११५ मिलिमीटर पाऊस झाला. तर आज अखेर एकूण ३७७ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.सर्फनाला धरण परिसरात गेल्या २४ तासात १५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. चिकोत्रा धरण परिसरात गेल्या २४ तासात १३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उचंगी धरण परिसरातही पावसाचा जोर असून तालुक्यातील हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
रामतीर्थ हाउसफु्ल्ल…

पावसाबरोबरच हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रामतीर्थ पर्यटन स्थळी निसर्गसौंदर्याच्या आस्वाद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
आजरेकरांना दररोज पाणी मिळणार…

चित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आजरा शहरवासीयांना मुबलक व दररोज पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


पंधरा दिवसाच्या आत कार्यवाहीबातची माहीती द्या
तहसीलदारांची अधिकाऱ्यांना सूचनाः वृक्षप्रेमी व रस्ता कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड महागावमार्ग हलकर्णी रस्त्याच्या रुंदीकरणात वृक्षताड झाली आहे. याची भरपाई म्हणून सदर कंपनीकडून वृक्षलागवड केली जाणार आहे. त्याबाबत काय कार्यवाही करणार याबाबतची माहीती पंधरा दिवसाच्या आत वृक्षप्रेमी सम्हाला द्यावी. अशी सूचना तहसीलदार समीर माने यांनी एमएसआयडीसी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.
येथील तहसीलदार कार्यालयात चंदगड महागाव मार्ग हलकर्णी तसेच संकेश्वर- बांदा महामार्ग रुंदीकरणानंतर झालेल्या वृक्षतोड व भरपाई म्हणून केली जाणारी वृक्ष लागवडी संदर्भात वृक्षप्रेमी समूह व कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. तहसीलदार समीर माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आजरा परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत, एमएसआयडीसी कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. नाईकवडे आणि रस्ता कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते. वृक्षप्रेमी सम्हाच्या सदस्या डॉ., गौरी भोसले, पुष्पलता घोळसे म्हणाल्या, झाडे कोण लावणार, त्यांचे कोण संगोपन करणार
म्हणाल्या, झाडे कोण लावणार, त्यांचे कोण संगोपन करणार याची माहीती मिळत नाही. याबाबत ठोस धोरण नसल्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. करारानुसार जून २०२६ म्हणजे गत महीन्यात वृक्ष लागवड सुरू होणे आवश्यक होते. याबाबत श्री. नाईकवडे म्हणाले, याबाबत निश्चित असे धोरण ठरलेले नाही. याची माहीती घेतली जाईल व कार्यवाही केली जाईल. याबाबत ठरणारे धोरण याची विस्तृत माहिती पंधरा दिवसाचे आत वृक्षप्रेमी समूह आणि वनविभाग कार्यालय आजरा यांना द्यावी अशी सूचना तहसीलदार माने यांनी केली. तसेच कंपनीकडून मागणी केल्यास वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणारी योग्य ती शासकीय जमीन अर्थात गायरान वगैरे देता येईल असेही त्यांनी सांगीतले. देशी वृक्ष लागवडीचे आणि संगोपनाचे काम गुणवत्तापूर्णच व्हायला हवे याबद्दल वृक्षप्रेमी समूह आग्रही असल्याचे मीना मंगरुळकर यांनी सांगितले. सुभाष विभूते, सी.आर. देसाई आणि दशरथ सोनुले, आयएससी प्रकल्प समन्वयक धनंजय गवळी, कुलदीप त्यागी, प्राधिकरण अभियंता प्रदीप तिवारी यांनी चर्चत भाग घेतला.


उत्तुर मध्ये संततधार…
उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत ढासळली

आजरा तालुक्यातील उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत जीर्ण अवस्थेत पोहोचली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे तडे पडले आहेत. काही भाग तर पूर्णपणे कोसळल्याने संपूर्ण आरोग्य केंद्र परिसराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरातील ही अवस्था पाहता आरोग्य केंद्र जणू असुरक्षिततेच्या छायेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय सरंक्षण भिंतीची पडझड झाल्याने आरोग्य केंद्र परिसरातील सागवान व आंब्याची काही झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडून नेल्याचीही माहिती समोर आली आहे, ज्यामुळे परिसरातील असुरक्षितता अधिकच वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वी सावंत व कुरुणकर यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षण भिंतीचा मोठा भाग कोसळून मार्ग पूर्णपणे अडथळित झाला होता. या प्रसंगी राहुल कुरुणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत भिंतीचे अवशेष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली, त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
आरोग्य केंद्राच्या आसपास नागरी वस्ती असल्याने भिंत पडून जीवित हानी होण्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर संरक्षण भिंतीचे डागडुजी किंवा नवीन सरंक्षण भिंत उभी होणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागची तातडीने मोजणी करून जागेचे सर्वेक्षण करावे व नव्याने भक्कम व दर्जेदार संरक्षण भिंत उभारावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


आजऱ्यात तरुणांची दहीहंडीची तयारी सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाघाची तालीम गोविंदा पथकाचा दहीहंडी सराव शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सध्या दहीहंडीचा सराव दररोज सायंकाळी ७ वा. आजरा महाविद्यालय, आजरा येथे सुरू आहे.
दहीहंडी उत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक गोविंदांनी दररोज सरावासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पथकाकडून करण्यात आले आहे.

छाया वृत्त…

ज़िल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांच्या मार्गदर्शनातून साळगाव मधील प्राथमिक शाळेमध्ये संगणक देण्यात आले. यावेळी शाळा कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष यासह सर्व सदस्य व शिक्षक उपस्थित होते


प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूर येथील आरोग्य सहाय्यक देवानंद तानवडे यांचे निधन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्तूर येथे आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले देवानंद बळवंत तानवडे (वय ५०) यांचे शनिवार दि. ४ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
शासकीय आरोग्य सेवेत त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले तसेच अन्य नातेवाईक असा परिवार आहे.
आनंदा देवरकर यांचे निधन

पेद्रेवाडी ता. आजरा येथील आनंदा गणपती देवरकर (वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात १ मुलगा, सुन, पत्नी असा परिवार आहे.


आजचे पंचांग
दिनांक : ५ जुलै २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : पंचमी तिथी (दुपारी ०१.३० पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (दुपारी ०३.१२ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : आयुष्मान योग (सायंकाळी ०४.३९ पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : तैतुला करण (दुपारी 01:30 पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.४० ते सायंकाळी ०७.१९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.०७
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



