सोमवार दिनांक १९ मे २०२५




मडीलगे दरोडा म्हणजे निव्वळ बनाव…
कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीनेच केली पत्नीची हत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल रविवारी घडलेल्या मडीलगे येथील दरोडा प्रकरणी पोलिसांनी विसंगत माहिती देणाऱ्या फिर्यादीचा चांगलाच बाक काढल्यानंतर कर्जबाजारीपणाला कंटाळून व आपणाला झालेल्या सोरायसिस या आजारावर उपचाराकरिता पत्नी सोने तारण ठेवण्यासाठी देत नाही या रागापोटी पती सुशांत सुरेश गुरव यानेच पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना अवघ्या ३५ तासात यश आले आहे. मडिलगे येथील या प्रकरणाचा पर्दाफाश फास्ट झाल्याने हा दरोडा म्हणजे निव्ळव बनाव असल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी…
आईचे आजारपण व कौटुंबिक कारणामुळे सुशांत हा कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने पत्नीचे सोने तारण ठेवण्याच्या उद्देशाने सोने मिळावे म्हणून पत्नीकडे तगादा लावला होता. यातून पती-पत्नीचे वाद झाले होते. या वादातूनच त्याने रविवारी पहाटे थंड डोक्याने पत्नी सौ. पूजा हिच्या डोक्यात शेती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजाराने जोरदार वार करून तिला ठार केले. सदर घटना घडल्यानंतर त्याने चोरीचा व दरोड्याचा बनाव करण्यासाठी घराबाहेर येऊन गोंधळ घातला. आपल्या घरात दरोडा पडला असल्याचेही सांगितले यामध्ये दरोडेखोरांनी पत्नीला मारल्याचेही स्पष्ट केले.
सदर घटना घडल्यानंतर सुरुवातीपासूनच पोलिसांना दिल्या जाणाऱ्या माहितीबद्दल व प्रत्यक्षात दिसत असलेल्या पुराव्यावरून यामध्ये मोठी विसंगती असल्याचे स्पष्ट होत होते. अखेर पोलिसांनी फिर्यादी सुशांत याच्यावरच लक्ष केंद्रित करून तपासाची चक्रे हलवली. पॉलिसी खाक्या दाखवताच सुशांत याने सदर होण्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेले व गोबर गॅसच्या टाकीत टाकलेले हत्यारही पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सदरचा गुन्हा हा पोलीस अधीक्षक सो श्री. महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग इचलकरंजी श्री. निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, आजरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागेश यमगर व स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफ पोउनि. मोरे. पोउनि. गळवे, पोलीस अंमलदार समिर कांबळे, प्रकाश पाटील, सतिश जंगम, अमित सर्जे, दिपक घोरपडे, कृष्णात पिंगळे, राजु कांबळे, विशाल चौगले, संदिप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन जाधव, सोमराज पाटील, रोहित मर्दाने, राजेश राठोड, सुहास कांबळे, सुशिल पाटील, हंबिरराव अतिग्रे, अनिल जाधव व स्टाफ पोउनि. संजय पाटील, पोउनि. युवराज धोंडे, कविता कदम, संदिप म्हसवेकर, साजिद शिकलगार, दयानंद बेनके, पांडुरंग येलकर, रेश्मा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे, नितीन पाटील, अमर उबाळे, विकास कांबळे, वैभव गवळी, सुर्यकांत सुतार, संजय नवलगुंदे, महांतेश पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रशांत सुतार, रामदास वाघ, प्रकाश पुजारी, विशाल आंबोळे, दिपक किल्लेदार, सुशांत सिंघन यांनी सदरचा खुनाचा गुन्हा उघडकिस आणलेला आहे. न्यायवैद्यक तज्ञांचे पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा तज्ञांचे पथक हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
सुशांत महाराज हे काय केलत…
आजरा तालुक्यामध्ये चांगले आचारी, कीर्तन व प्रवचनकार म्हणून सुशांत गुरव व धार्मिक प्रवृत्तीचे त्यांचे कुटुंब परिचित आहे. परंतु काल सुशांत याची मजल पत्नीचा खून करण्यापर्यंत गेल्याने सुशांत महाराज तुम्ही हे काय केलेत… असं म्हणण्याची वेळ तालुकावासीयांना आली आहे.
मुलांचे भवितव्य अधांतरी…
सुशांत यांची आई कर्करोगाने आजारी असते. या प्रकरणात त्यांची पत्नी ही स्वर्गवासी झाली आहे. त्यामुळे सुशांत यांच्या सोपान व मुक्ता या मुलांचा सांभाळ करण्याचे आव्हान कुटुंबातील इतर घटकांवर येऊन पडले आहे.




