

राष्ट्रवादीच्या अस्तित्वासाठी व मंत्री मुश्रीफ यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी निवडणूक रिंगणात…
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार शुभारंभ

आजरा : प्रतिनिधी
कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे स्वतंत्र गट विभागणी करून तडजोडीच्या वाटाघाटीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी काही मंडळींची धडपड सुरू झाली. हा सर्व प्रकार पाहून निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता. निवडणूक बिनविरोधच्या टप्प्यावर आल्यानंतर मात्र काही मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पळपुटेपणाचा आरोप तर काहींनी नेत्यांसह स्थानिक मंडळींवर टीका करण्यास सुरुवात केली.अजून निवडणूक बिनविरोध नाही तर ही अवस्था निवडणूक बिनविरोध झाली तर पाच वर्षे हेच ऐकावे लागणार हे कार्यकर्त्यांना सहन झाले नाही. कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाण्याचा रेटा लावला. पालकमंत्री मुश्रीफ यांनाही या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर राष्ट्रवादी स्वतंत्र पॅनलद्वारे निवडणूक रिंगणात आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी प्रणित श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडी सत्ता मिळवणारच असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी व्यक्त केला.
आजरा येथील ग्रामदैवत श्री रवळनाथाला विजयासाठी साकडे घालून राष्ट्रवादीच्या आघाडीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला.
पालकमंत्री मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीची आघाडी निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. चांगल्या व योग्य व्यक्तींच्या हाती कारखाना जावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. मंत्री मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे.ज्यांनी कारखाना बंद पाडला अशा व्यापारी तत्त्वाच्या मंडळींच्या हाती कारखाना द्यायचा की खरोखरच जे ऊस उत्पादक व शेतकरी आहेत ज्यांची नाळ उसाची जोडली आहे त्यांच्या ताब्यात कारखाना द्यायचा हे आता सभासदांनी ठरवावे असेही प्रमुख मंडळींनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद दादा देसाई जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली,हरिबा कांबळे,तालुका संघाचे माजी अध्यक्ष मधुकर देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अबूताहेर तकीलदार, संभाजी तांबेकर, तानाजी राजाराम, शिवाजी नांदवडेकर, नामदेवराव नार्वेकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, धनाजी शिंदे, विक्रम देसाई, अमित सामंत, विजय केसरकर, अंकुश पाटील, देवदास बोलके, विलास राजाराम, अनिकेत कवळेकर, राजू होलम यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
संग्रामसिंह कुपेकर, दिगंबर देसाई राष्ट्रवादीच्या पाठीशी
भाजपाचे नेते संग्रामसिंह कुपेकर व आजरा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक दिगंबर देसाई यांनी राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एक मत नकोच…
विरोधी आघाडीचे उमेदवार आता वयक्तिक एक मत मागत फिरत आहेत. राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवाराला सभासदांकडून एका वयक्तिक मताची अपेक्षा नाही संपूर्ण पॅनलला मतदान करावे अन्यथा आम्हाला कोणालाही एक मत देऊ नकाच असे आवाहन यावेळी नेते मंडळींनी केले.
मी यापुढे राष्ट्रवादीचा…
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आपटे व मी राष्ट्रवादी आघाडीसोबत आहोत.राष्ट्रीय काँग्रेसचा व आपला यापुढे काहीही संबंध नसून मी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे असे खुलासा नामदेव नार्वेकर यांनी केला.
राष्ट्रवादीमुळे तालुक्यात पाणी प्रकल्प मार्गी
आजरा तालुक्यात मार्गी लागलेले चित्री,उचंगी व आंबेओहोळ प्रकल्प राष्ट्रवादीचे स्व. बाबा कुपेकर, मंत्री हसन मुश्रीफ, आम. राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले आहेत. कारखान्याच्या भवितव्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची उभारणी केली गेली असल्याचे यावेळी शिवाजी नांदवडेकर यांनी सांगितले.

कॉ. शांताराम पाटील यांचा प्रचार सुरू

आजरा:प्रतिनिधी
सर्व श्रमिक संघाचे आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पेरणोली- गवसे गटातून निवडणूक लढवणाऱ्या काँ. शांताराम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी शांताराम पाटील, नारायण भडांगे यांच्यासह सर्व श्रमिक संघ व गिरणी कामगार, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



