mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

नगरपंचायतीच्या कर आकारणी बाबत शहरवासीय आक्रमक..‌.

भरमसाठ कर आकारत असल्याचा आरोप

                      आजरा: प्रतिनिधी

        आजरा नगरपंचायतीच्या कर निर्धारण विभागाकडून स्थावर मालमत्तांच्या भांडवली मूल्यांमध्ये मनमानी पद्धतीने वाढ करून नवीन कर आकारणीच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे परंतु त्याच बरोबर कायमस्वरूपी करवाढीचे भूत मानगुटीवर बसणार असल्याने शहरवासीयांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

       २०१७ पूर्वी ग्रामपंचायतीकडून केली जाणारी कर आकारणी व ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर होत असलेली कर आकारणी यामध्ये प्रचंड फरक असल्याने ग्रामपंचायत होती तेच बरे होते असे म्हणण्याची वेळ आता पुन्हा एकदा शहरवासीयांवर आली आहे.

       महिन्याभरापूर्वी प्रति नळ कनेक्शन १०००/- रुपये प्रमाणे पाणीपट्टी भरण्यासंदर्भातील नोटिसा शहरवासीयांना लागू करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात शहरवासीयांना किती पाणी मिळाले आहे ? हा संशोधनाचा विषय आहे. वर्षभर एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, तर एका अभ्यासकाच्या मते गेल्या ३६५ दिवसांमध्ये केवळ १६० दिवस पाणी पुरवठा करण्यात आला आहे. काही भागांमध्ये तर यापेक्षाही कमी दिवस पाणीपुरवठा झालेला आहे. असे असताना संपूर्ण वर्षभराची पाणीपट्टी का द्यायची? या प्रश्नाचे उत्तर आता नगरपंचायतीनेच द्यावे.

        नगरपंचायतीच्या बांधकाम विभागातील बांधकाम परवान्यांचा विषय तर चांगलाच चर्चेत आहे.चौरस फुटावर बांधकाम परवाना फी आकारायची, त्यामध्ये त्रुटी काढायच्या, वारंवार संबंधित व्यक्तीस हेलपाटे मारावयास लावायचे व अखेर तडजोड करून बांधकाम परवाने द्यायचे असा प्रकार शहरवासीयांनी चांगलाच अनुभवला आहे आणि अनुभवत आहेत.

        नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने शहरवासीयांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे भरमसाठ कर आकारणी करत असताना चोरीचे नळ कनेक्शन, विनापरवाना बांधकामे याबाबत मात्र अधिकारी व कर्मचारी वर्ग डोळे मिटून गप्प आहेत याचे गौडबंगाल काय ? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

        एकंदर परिस्थिती पाहता नगरपंचायतीच्या कर निर्धारण विभागाने घेतलेला करवाडीचा निर्णय चांगलाच तापण्याची शक्यता आहे.

नगरसेवक काय करत होते?

      कर निर्धारण विभागाकडून करामध्ये वाढ करण्याचा घेतला गेलेला निर्णय हा सहजासहजी घेतला गेलेला नाही. निश्चितच यावर नगरपंचायतीच्या मासिक सभेत काथ्याकुट झाला असणार. कोणीतरी नगरसेवक सूचक व कुणीतरी अनुमोदक म्हणून प्रोसिडिंगवर आला असणार. असे असताना नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध का केला नाही ? असा प्रश्नही आता शहरवासीय विचारू लागले आहेत. नगरसेवकांनीही आपली याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.



जागतिक बँक प्रतिनिधी मध्यावधी मुल्यांकनासाठी आज-याला

 

आजरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीला भेट… शेतक-यांशी साधला संवाद

                   आजरा: प्रतिनिधी

       जागतिक बँकेच्या प्रतिनिधीनी मध्यावधी मुल्यांकनासाठी (मीट इव्हयाल्यूएशन) साठी आज-याला भेट दिली. येथील आजरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या पदाधिकारी व सदस्यांसोबत चची केली श्री. आदर्शकु‌मार, श्री फ्रान्सिस डार्को, अर्षीया गुप्ता या तिघांचा समावेश होता. त्यांनी सुमारे दोन तास कंपनीचे सदस्य, शेतकरी यांच्याशी संवाद साधला.

        अतिरिक्त प्रकल्प संचालक (स्मार्ट) पुणेचे ज्ञानेश्वर बोटे, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागाचे बसवराज बिराजदार, नोडलअधिकारी,विभागीय प्रकल्प अमलबजावणी कक्ष (स्मार्ट कोल्हापूरचे) उमेश पाटील, जिल्हा नोडल अधिकारी प्रविण आवटे, नोडल अधिकारी स्मार्ट कृषी पुणेचे अशोक बाणखेले, उपविभागीय कृषी अधिकारी विनायक देशमुख, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांचा समावेश होता.

       संभाजी इंजल यांनी स्वागत केले. आजरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी प्रास्ताविकामध्ये आजरा प्रोडयूसर कंपनी व स्मार्ट प्रकल्प कशा प्रकारे राबविला याबाबत माहीती दिली. कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया बरोबर बाजार हमीभाव मिळाल्याचे सांगितले.

       शेतकऱ्यांची एकजूट असल्यास कृषी अर्थकारणाला गती येईल. शेती विकसित होईल, शेतकऱ्यांना उत्पादित मालाला चांगला तर मिळेल असेही स्पष्ट केले. यावेळी निवृत्ती कांबळे, संताजी सोले, उत्तम नार्वेकर, उज्वला नार्वेकर, महादेव पोवार यांनी चर्चेत भाग घेतला.

      याप्रसंगी सी.डी. सरदेसाई, अभिषेक शिंपी, विलास पाटील, विश्वास जाधव, पावले सर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जयसिंग नार्वेकर यांनी आभार मानले.



पाटबंधारे खात्याच्या मीटर सक्ती, पाणी पट्टी वाढ निर्णयाविरोधात सोमवारी  बैठक.

                  आजरा: प्रतिनिधी

         महाराष्ट्रातील पाणी उपसा करणाऱ्या सहकारी व खाजगी पंप धारकांना मीटर बसवण्याची सक्ती केली असून पाणीपट्टीत अन्यायी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विचार करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवार दि २७ नोव्हेंबर रोजी किसान भवन आजरा येथे तालुक्यातील मोटरपम्प धारक शेतकऱ्यांची व्यापक बैठक आयोजित केली आहे.

        या बैठकीला सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .महाराष्ट्र जलनियमन प्राधिकरणाने अचानक प्रचंड अशी अन्यायी पाणीपट्टी वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

       एकीकडे विजेचे वाढते दर त्यात मोटारपंपाला वॉटर मीटर (जलमापक) बसविण्याची सक्ती केली आहे. जलमापक (वॉटर मीटर) न बसवल्यास पाणीपट्टी तीन ते चार पट जादा आकारली जाणार आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी सर्व मोटर पंप धारकांना सोमवारी ठीक ११ वाजता किसान भवन येथे जमावे असे आवाहन संपत देसाई, संजय तर्डेकर, दशरथ घुरे, भीमराव माधव, सयाजी कोडक यांनी केले आहे .



हिरलगे येथे हाफ पीच क्रिकेट स्पर्धा

                   आजरा: प्रतिनिधी

       हिरलगे ता. गडहिंग्लज येथे श्री हरी काका गोसावी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य हाप पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मनोज गजरे यांनी दिली.

        २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सदर स्पर्धा होणार असून स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ११००१/-, ५००१/-, ३०९१/- रुपये रोख व चषक देणार येणार आहे. या व्यतिरिक्त स्पर्धेतील मालिकाविरास १००१/- रुपये व उत्कृष्ट संघास १००१/- रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

     स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मनोज बनसोडे/ गजरे (८८८८४२६०६०) व प्रशांत गजरे(९०४९०५४२४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



निधन वार्ता…

सौ.हिराबाई गुरबे

        उत्तूर ता. आजरा येथील सौ. हिराबाई ज्ञानदेव गुरबे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उत्तुर येथील संजय गुरबे व बाळासाहेब गुरबे यांच्या त्या मातोश्री होत.



संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेपत्ता तरुणाचा मृतदेह हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला…

mrityunjay mahanews

प्रभागाचा विकास हाच ध्यास…सौ.सरीता गावडे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

अशोकअण्णा वाढदिवस विशेष…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!