mrityunjaymahanews
अन्यठळक बातम्या

पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

                   ‌‌आजरा : प्रतिनिधी

         तब्बल दीड महिन्यानंतर आवंडी धनगरवाडा क्रमांक तीन येथे वाघाने पुन्हा एकदा बैलावर हल्ला केल्याने या हल्ल्यात धोंडीबा धुळू कोकरे यांचा बैल ठार झाला आहे. शनिवारी सायंकाळी सदर घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात दीड महिन्यात दोन बैल ठार झाले आहेत.

         दीड महिन्यापूर्वी सोनू बाबू कोकरे यांचा बैल वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता.त्याची पुनरावृत्ती काल दिनांक १८ रोजी सायंकाळी धोंडीबा धुळू कोकरे यांच्या बाबतीत घडली. जंगला शेजारी असणाऱ्या शेताजवळ चरणाऱ्या बैलावर वाघाने हल्ला केला. यामध्ये बैल गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत बैलाला घरी आणण्यात आले. परंतु त्याचे निधन झाले. वनविभागाकडून सदर हल्ला हा पट्टेरी वाघाचा असल्याचे सांगण्यात आले.

ठार झालेल्या बैलाचे वय वर्षे सहा असून प्रत्यक्ष जागेवर  वनक्षेत्रपाल एस. आर. डाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक, आवंडी वनपाल ,(दक्षिण) आजरा वनसेवक गंगाराम कोकरे यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून वनविभागाने पंचनामा केला आहे.

जुनावाद पुन्हा उफाळला… बहिरेवाडीच्या एका विरोधात गुन्हा नोंद 

                    ‌‌आ‌जरा : प्रतिनिधी

       जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने बहिरेवाडी, ता. आजरा येथे झालेल्या मारहाण व घराच्या नुकसानीस जबाबदार धरत आजरा पोलिसांनी दिग्विजय रामचंद्र आयवाळे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद बाबुराव भैरू आयवाळे यांनी पोलिसात दिली आहे.

       दिग्विजय व बाबूराव आयवाळे यांच्यामध्ये जुना वाद आहे. बाबूराव घरी असताना दिग्विजय दारू पिऊन येऊन त्यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी बाबुराव व त्यांच्या पत्नीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो नशेत असल्याने त्याने बाबुरावना मारहाण करत त्यांच्या घराचे नुकसान केले आहे.

पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.



संशयकल्लोळ…

मने जुळेनात…केवळ चर्चाच…?
आजरा साखर कारखाना बिनविरोधची शक्यता धूसर


✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत

        आजरा साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर बिनविरोधची चर्चा जोरदार सुरू आहे. गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये सध्या असणाऱ्या संचालक मंडळातील संचालकांचे मतभेद इतके टोकाला गेले आहेत की त्यांची सध्या मने जुळणे हे अशक्य होऊन बसले आहे. प्रा. शिंत्रे यांच्याबाबत घडलेल्या प्रकारामुळे सध्या सत्तारूढ आघाडीत संशयकल्लोळाचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या तरी तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर काही सक्षम मंडळी उमेदवारांची चाचपणी करत आहेत. त्यामुळे बिनविरोध चर्चा होत असली तरी शक्यता मात्र धूसर होत चालली आहे.

        कारखान्याची एकंदर परिस्थिती पाहता कारखाना निवडणूक बिनविरोध होईल असे सभासदांकडून भाकीत वर्तवले जात होते. प्रत्यक्षात मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना इच्छुकांची झालेली धावपळ व त्यानंतर छाननीवेळी उभी केलेली कायदेशीर सल्लागारांची फौज बऱ्याच गोष्टी सांगून गेली.

        प्रा. सुनील शिंत्रे या विद्यमान अध्यक्षांविरोधातच मोठी फिल्डिंग लावल्याचे स्पष्ट दिसत होते. याचे उलटसुलट तर्क राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. हे सर्व पाहता सत्तारूढ आघाडीमध्ये सर्व काही अलबेल आहे असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.

        प्रा. शिंत्रे यांच्या उमेदवारीत निर्माण करण्यात आलेले अडथळे पाहता शिंत्रे हे सत्तारूढ आघाडीजवळ राहतील असे सध्यातरी वाटत नाही. एकीकडे उमेदवारी अर्ज अपात्र करण्यासाठी लावलेली यंत्रणा तर दुसरीकडे पत्रकार बैठकीच्या माध्यमातून विरोधी आघाडीचे नेते जयवंतराव शिंपी व अशोकअण्णा यांनी प्रा.शिंत्रे व ज्येष्ठ संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्यावर करण्यात केलेली जोरदार टीका पाहता शिंत्रे,रेडेकर यांचे विरोधी आघाडीशीही सूत जमेल असे वाटत नाही.

        या सर्व पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची स्थापना होण्याची शक्यता सध्या जोर धरू लागली आहे. त्यामुळे जर मने जुळत नसतील तर एकत्र यायचे कशाला ? त्यातूनही एकत्र आले तर भविष्यात कुरबुरी या राहणारच हेदेखील स्पष्ट आहे.

 ‌‌‌‌     यामुळे प्रा. शिंत्रे यांना रोखण्यासाठी केलेली व्यूहरचना तिसऱ्या आघाडीची नांदी ठरू शकते. आता यात जिल्हास्तरीय नेते मंडळी काय भूमिका घेणार यावरही पुढच्या सर्व घडामोडी अवलंबून आहेत.

उत्तुर विभाग ठरत आहे विरोधी आघाड्यांना अडसर…

     सत्ताधारी आघाडीकडे उत्तूर विभागात नेते मंडळी व कार्यकर्त्यांची नेटकी फौज आहे. विरोधी आघाडीसह तिसऱ्या आघाडीच्या रचनेत उत्तूर विभाग मोठा अडसर ठरत आहे.



श्री बिरेश्वरच्या ‘ आजरा शाखेचे उद्या उद्घाटन…

                       आजरा: प्रतिनिधी

    श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटी (मल्टीस्टेट) या  संस्थेची १९२ वी शाखा आजरा येथे सुरू होत असून या शाखेचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.

    खासदार अण्णासाहेब जोल्ले हे या संस्थेचे संस्थापक असून कर्नाटकच्या माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले या सह- संस्थापिका आहेत.

        कर्नाटक महाराष्ट्र व गोव्यामध्ये संस्थेच्या एकूण १९१ शाखा आहेत तर ५९ नवीन शाखा लवकरच सुरू होत आहेत. आज अखेर संस्थेजवळ ३४०० कोटी रुपयांच्या ठेवी २६१५ कोटीपेक्षा जास्त रुपयांचे कर्जवाटप,३ लाख ६१ हजार सभासद व मार्च २०२३ अखेर ३५ कोटी १ लाख रुपयांचा नफा अशी आर्थिक स्थिती आहे.

       संस्थेकडे NEFT/RTGS सेवा, विविध कर्ज व ठेव योजना, जीवन आरोग्य व सामान्य विमा, म्युच्युअल फंड, शेअर बाजार व डिमॅट अकाउंट, पॅन कार्ड, मनी ट्रान्सफर, फॉरेन करन्सी एक्सचेंज, पासपोर्ट, विमान, रेल्वे बुकिंग,डीटीएच व मोबाईल रिचार्ज यासह विविध सेवा उपलब्ध आहेत.

       भुदरगड-राधानगरी- आजरा तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील मोरजकर बिल्डिंग मध्ये सदर शाखेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.



स्व. राजारामबापू देसाई फौंडेशनचे विविध पुरस्कार जाहीर…
आज वितरण समारंभ

                     आजरा:प्रतिनिधी

        स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशन च्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून आज रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण होणार आहे.

         पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे क्षेत्र पुढीलप्रमाणे…

         उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी- डॉ. रवींद्र गुरव, आदर्श प्राथमिक शिक्षक- विठोबा शेवाळे, आदर्श प्राथमिक शिक्षिका-अर्चना सुनील पाटील, यशस्वी उद्योजक- विजय शामराव पाटील, गवसे. आदर्श ग्रामसेवक-विशाल शिवाजी दुंडगेकर, खानापूर, आदर्श तलाठी- संजय भाऊसाहेब माळी, उत्कृष्ट वन कर्मचारी-संजय कृष्णा निळकंठ, कृषी विभाग आदर्श कर्मचारी- प्रकाश तुकाराम गावडे, आदर्श आरोग्य सेविका- श्रीमती मनीषा शिवाजी पवार, सुळे. महावितरण आदर्श कर्मचारी-प्रदीप गणपती हुंदळेकर, राज्य परिवहन उत्कृष्ट कर्मचारी- संजय यशवंत लोहार, आदर्श सचिव-यशवंत जयसिंग निंबाळकर, आदर्श अंगणवाडी सेविका- श्रीमती वंदना गणपती अत्याळकर, बहिरेवाडी. आदर्श सरपंच- पांडुरंग शंकर तोरगले, मासेवाडी. उत्कृष्ट ग्रामपंचायत-उत्तूर,आदर्श वाचनालय-सरस्वती वाचनालय, मडिलगे. उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी- रामदास पुंडलिक पाटील, खानापूर. आदर्श पोलीस कर्मचारी- संतोष काडाप्पा गस्ती,आदर्श महिला बचत गट- सखी महिला बचत गट, वाटंगी. उत्कृष्ट रेशन धान्य दुकानदार- राजेंद्र जोतिबा कोलेकर, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका – श्रीमती माया रमेश चोरगे, चव्हाणवाडी.

        पुरस्कार वितरण समारंभासाठी तहसीलदार सुरज माने, डॉ. यशवंत पाटणे, गटविकास अधिकारी शरद मगर, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, मुकुंदराव देसाई,प्रा. सुनील शिंत्रे, श्रीमती अंजनाताई रेडेकर, उमेश आपटे, संभाजी पाटील, विष्णुपंत केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



छायावृत्त…

आजरा येथील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.



संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews

गडहिंग्लज आजरा चंदगड परिसर वृत्त –मसोली येथे गव्यांचा धुमाकूळ, आवंडी धनगर वाड्यावर बिबट्याचा शेळीवर हल्ला व इतर बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!