mrityunjaymahanews
अन्य

पेद्रेवाडीच्या सरपंच सौ.रेडेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल…

पेद्रेवाडी सरपंच सौ. रेडेकर अविश्वास ठराव दाखल…

२३ मे रोजी होणार विशेष सभा

पेद्रेवाडीच्या सरपंच सौ. लता उत्तम रेडेकर या सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करीत आहेत त्याचबरोबर विकास कामाची पूर्तता करत नाहीत असा ठपका ठेवत ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करत असल्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे.

या पत्राच्या पार्श्वभूमीवर दिनांक २३ मे रोजी तहसीलदारांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभा बोलावली आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांमध्ये धनाजी गोपाळ डोंगरे, अशोक लक्ष्मण लोहार,सौ. स्मिता रवींद्र चव्हाण, सौ. राजश्री राजाराम डोंगरे , प्रकाश शंकर ढवळे यांचा समावेश आहे.

सरपंच सौ. रेडेकर या आगामी पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवार असण्याची शक्यता असतानाच तालुका खरेदी-विक्री संघाचा निकाल लागल्याबरोबरच त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याने तालुका संघाच्या राजकारणाचा फटका सौ. रेडेकर यांना बसल्याचे बोलले जाते.

अण्णा हरले… भाऊ जिंकले

शिंपी – चराटी यांना धोक्याचा इशारा

 

 

ज्योतिप्रसाद सावंत

 

आजरा तालुका खरेदी – विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुधीर देसाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीने घवघवीत यश संपादन करून तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असणारे आपले वर्चस्व जिल्हा बँक निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुधीर देसाई यांना विजयापर्यंत पोहचवण्यासाठी चांगलीच ताकद लावली होती. या निवडणुकीत मात्र सुधीर देसाई यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार राजेश पाटील यांना प्रचार यंत्रणेपासून बाजूला ठेवून आपले ग्रामीण भागातील वजन आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई,गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर,विष्णुपंत केसरकर,अल्बर्ट डिसोझा,संभाजी पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार,अरुण देसाई व त्यांच्या सहकारी मंडळींनी दिलेली साथ व नेटक्या नियोजनामुळे मोठ्या फरकाने त्यांना विजय मिळवता आला. यामुळे अशोकअण्णा हरले… आणि सुधीरभाऊ जिंकले याची थेट लढतीत सलग दुसऱ्या वेळा तालुकावासीयांना प्रचिती आली. हा निकाल निश्चितच  शिंपी – चराटी गटाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा समजला जातो.

गेल्या दीड वर्षापासून अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांनी एकत्र येऊन यापुढील निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकत्रितरीत्या जिल्हा बँकेची निवडणूक लढवली. परंतु यामध्ये त्यांना विजयापासून दूरच राहावे लागले. त्यानंतर झालेल्या तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शिंपी-चराटी यांची युती सर्वसामान्यांना रुचलेली नाही असा निष्कर्षही सध्या निघत आहे.

तालुका संघामध्ये शिंपी – चराटी यांना अनपेक्षितरित्या मतदान प्रक्रियेला सामोरे जावे लागले. विकास सेवा संस्थांचे ठराव करण्यापासून ते माघारीची प्रक्रिया होईपर्यंत या निवडणुकीकडे शिंपी-चराटी गटाने फारसे गांभीर्याने पाहिले नाही. निवडणूक बिनविरोध होणार असे गृहीत धरूनच त्यांच्या हालचाली सुरू राहिल्या. एकीकडे आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीचे नगारे वाजत असताना आणि दुसरीकडे तालुका संघामध्ये यशाची खात्री झाल्याने विरोधकांवर मात करण्याची आयती संधी देसाई यांच्यासमोर चालून झाली. परिणामी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी बिनविरोधचा प्रस्ताव बाजूला ठेवला.

घसघशीत मतानी आपली आघाडी निवडणूक जिंकेल असा विश्वास व  विरोधकांना मोठ्या फरकाने पराभूत केल्यास याचा फायदा निश्चितच जिल्हा परिषद, पंचायत समितीसह साखर कारखाना निवडणुकीत होणार हे ओळखून संपूर्ण ताकदीनिशी सत्ताधाऱ्यांनी यंत्रणा राबवली .

नेटक्या नियोजनामुळे सुधीरभाऊ जिंकले तर गाफीलपणा नडल्याने अशोकअण्णा हरले असेच म्हणावे लागेल.

मूळ भाजपाची देसाई यांना साथ

तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये फारसे अलबेल नाही हेसुद्धा तालुका संघाच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार,माजी उपजिल्हाध्यक्ष अरुण देसाई यांच्यासह बरीच मंडळी सुधीर देसाई यांच्यासोबत थेट प्रचारात उतरली होती. विरोधी आघाडीचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी व भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये असणारे मतभेद या निमित्त चर्चेत आले आहेत.

तालुका संघातील आघाडी साखर कारखान्यात राहण्याची शक्यता

तालुका संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), भारतीय जनता पार्टी, स्वाभिमानीचे काही कार्यकर्ते, श्रमिक मुक्ती दल आदींनी एकत्रित प्रचार यंत्रणा राबवली. साखर कारखाना निवडणुकीत हीच आघाडी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

साखर कारखाना निवडणूक शिंपी-चराटी यांना जड जाणार…?

तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी व सहकारी घटकांनी ग्रामीण भागातील जनमताचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. शिंपी-चराटी युतीला ग्रामीण भागाने कितपत स्वीकारले आहे याची लीटमस चाचणीही या निमित्ताने झाली आहे. साखर कारखान्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता शिंपी-चराटी गटाकडून इच्छुक असणाऱ्या अनेक मंडळींना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

……………………………………………….

प्रयत्न घरफोडीचा….

लंपास केली मोटरसायकल

आजरा येथील आपटे कॉलनीतील सुनील गणपती नाईक हे कुटुंब समारंभानिमित्त बाहेरगावी गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांकडून त्यांच्या घरी चोरीचा  प्रयत्न झाला.  या प्रयत्नामध्ये हाती किरकोळ मुद्देमाल वगळता अपेक्षित काहीच न लागल्याने चोरट्याने घरातील मोटरसायकलची चावी घेऊन थेट मोटरसायकलच लंपास केली.

           नाईक कुटुंबीय बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या चोरीची नोंद आजरा पोलिसात झाली आहे.

……………………………………………………

 

संबंधित पोस्ट

आज-यातील युवक अपघातात ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!