


जनता बँकेने नवउद्योजक निर्माण केले : खासदार संजय मंडलिक…
बालिंगा शाखेचे उद्घाटन

अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या व कृषीच्या योजना प्रभावीपणे राबवून जनता बँकेने नवीन उद्योजक निर्माण करण्याचे काम केले आहे. बँकेचा कारभार पारदर्शक व काटेकोर आहे. त्यामुळे बँकेने जिल्हयात आदर्श निर्माण केला आहे. असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. बालिंगा (ता. करवीर ) येथे जनता बँक लि. आजराच्या शाखेचे उदघाटन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते.
गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

ज्येष्ठ संचालक जयवंतराव शिंपी यांनी स्वागत केले. बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला.बँकेने ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या आहेत. ठेवीदार, कर्जदार यांच्या हिताच्या योजना राबविल्या आहेत.
खासदार मंडलिक म्हणाले, जनता बँकेने सर्वसामान्यांच्या हिताचा कारभार केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकष व नियमानुसार रेशो टिकवला आहे. कर्जदारांना आर्थिक शिस्त लावण्याचे काम केले आहे. संचालक, कर्मचारीही काटकसरीचे धोरण अवलंबून काम करत आहे. त्यामुळे बँक प्रगतीपथावर आहे.
गोकुळचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, करवीर तालुका हा समृध्द आहे. या तालुक्यात जनता बँकेने शाखा सुरु केल्याने या समृध्दीमध्ये भर पडली आहे. भागातील युवकांना उदयोग निर्मितीसाठी बँकेकडून आर्थिक सहकार्य मिळणार आहे असेही स्पष्ट केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी नाईक,रणजित देसाई,महादेव पोवार, संदीप कांबळे यांच्यासह सर्व संचालक,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी.पाटील यांच्यासाह अधिकारी, सभासद उपस्थित होते. आभार संचालक सुनील डोणकर यांनी मानले.

ओढ्याच्या पाण्यात पडून किटवडे येथील एकाचा मृत्यू
किटवडे (ता. आजरा) येथील एकनाथ नाना राणे (वय वर्षे 46) यांचा सुतारकी नावाच्या शेतातून जाणाऱ्या ओढ्यात लाकडे तोडत असताना पडून बुडून मृत्यू झाला.
याबाबतची वर्दी आनंदा सोमा राणे यांनी आजरा पोलिसात दिली आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदर घटना किटवडे येथे घडली.

पोळगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण
पोळगाव (ता. आजरा) येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 11 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. या बाबतची फिर्याद संबंधित मुलीच्या आईने आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास आजरा पोलिस करीत आहेत.





