
मंगळवार दि.२२ सप्टेंबर २०२६

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीच्या वतीने विटे येथे आरोग्य तपासणी शिबिर ;१४२ नागरिकांचे आरोग्य तपासणी

विटे : प्रतिनिधी
पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा पोवार व विटेच्या सरपंच चव्हाण यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या वतीने व न्यू जय शिवराय गणेश मंडळ, विटे यांच्या सहकार्याने गणेशोत्सवानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‘माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आणि ‘तीशीचा पल्ला, तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त तपासणी ८२ व ई.सी.जी. २७ नागरिकांची करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव व डॉ. तनवर कुमार यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. रक्तदाब, रक्तातील साखर व इतर आवश्यक आरोग्य तपासण्यांसह नागरिकांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
वाढत्या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर उच्च रक्तदाब व मधुमेहाचे वेळीच निदान तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. विशेषतः वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीचे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांची नोंदणी, विविध तपासण्या व आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. न्यू जय शिवराय गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.

आजरा तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. आजरा या संस्थेची वार्षिक सभा चेअरमन श्री. राजाराम पोतनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
होते. दीप प्रज्वलन संस्थेचे संचालक श्री. अल्बर्ट डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन राजाराम पोतनीस यांनी केले, तर अहवाल वाचन संस्था सचिव श्री. दिनकर शिंदे यांनी केले.
फेडरेशनकडे या आर्थिक वर्षात १६ संस्थांची एकूण २,३९,७३,३७१ रुपयांची १०१ प्रकरणे आली. त्यातील २० प्रकरणे मंजूर झाली असून उर्वरित प्रकरणे अंतिम टप्प्यात असल्याचे वसुली अधिकाऱ्यांनी सांगितले. अंशदानाबाबत पालकमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांना भेटण्याचे ठरले. पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी यांचे प्रशिक्षण फेडरेशन मार्फत घेण्याचे ठरले.
शेवटी आभार संचालक श्री. आनंदा कुंभार यांनी मानले. यावेळी वशव्हा. चेअरमन सौ. राजश्री खोराटे, सुनील पाटील, भिवा जाधव, पांडुरंग ढवळे, अशोक तांबेकर, रमेश कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उत्तूर मॅरेथॉनमध्ये प्रतीक कलुरे व अर्पिता चौगुले अव्वल

उत्तूर : प्रतिनिधी
बाजारपेठ मित्र मंडळ, उत्तूर यांच्या वतीने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा रविवारी पार पडल्या. खुला, १७ वर्षांखालील व १४ वर्षांखालील अशा तीन गटांत झालेल्या स्पर्धेत विविध गावांतील धावपटूंनी सहभाग नोंदविला.
खुल्या गटात मुलांमध्ये प्रतीक कलुरे (कडाळ) यांनी प्रथम, शिवराज घोलराखे (कडगाव) द्वितीय, निरंजन पाटील (गडहिंग्लज) तृतीय, ओमकार चोथे (माध्याळ) चतुर्थ व प्रशांत पाटील (इचलकरंजी) पाचवा क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात अर्पिता चौगुले (कडगाव) प्रथम, वैष्णवी पाटील (मोदगे) द्वितीय व नंदिनी हनीमनाळे (गडहिंग्लज) तृतीय ठरल्या.
१७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये वेदांत पाटील (कार्वे), आर्यन सुतार (अत्याळ), संग्राम नाईक तर मुलींमध्ये स्वाती धबाले (बेकनाळ), अमृता खैरे (महागाव) व विभावरी सावंत यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. १४ वर्षांखालील गटात सोहम आजरेकर (अंकली), संकेत मोरे (राजगोळी), रोहन फडके (माध्याळ) तसेच मुलींमध्ये प्रांजली आगरकर (अंकली), अंकिता जाधव (मुतनाळ) व दिव्या दळवी (बेकनाळ) यांनी आघाडी घेतली.
स्पर्धेचे उद्घाटन शिवलिंग सन्ने यांच्या हस्ते झाले. डॉ. प्रकाश तौकरी, पांडुरंग बरगे, डॉ. भरत मोहिते, शिरीष ठाकूर, दशरथ धुरे, सुनील आमनगी आदी उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख म्हणून सुरेश धुरे यांनी काम पाहिले, तर परीक्षक म्हणून अनिल पाटील व सुभाष तुपे यांनी जबाबदारी पार पाडली. सर्व विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

बोलके वाडी येथे रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

बोलकेवाडी : प्रतिनिधी
रणरागिणी शेतकरी गट, बोलकेवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या शिबिरामध्ये रक्तदानासोबतच रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तसेच वजन व BMI तपासणी करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.
या कार्यक्रमास आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, सरपंच जी. एम. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, बोलकेवाडी गावचे सरपंच विलास जोशिलकर, ग्रामपंचायत सदस्य अमर डोंगरे, सरिता बोलके, रोहित शेंडे यांची उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक किशोर कातकर व नीता बोलके, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

गणेश दर्शन…
पोलीस स्टेशन आजरा

लिंगायत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आजरा

छाया वृत्त

आजरा येथे गौरी गणपती विसर्जन प्रसंगी घरगुती गणेश मुर्त्या चित्री नदी पात्रात विसर्जित करण्यात आल्या होत्या. दरम्यान पात्रातील पाणी कमी झाल्याने सदर मुर्त्या या पाण्याअभावी इतस्थता विखुरल्या होत्या. स्थानिक कार्यकर्त्यांनी पुन्हा त्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या.

उत्तूर : प्रतिनिधी
मौजे आरदाळ (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील निवारा शेड (बस थांबा) पूर्णपणे मोडकळीस आला आहे. छत, पत्रे तुटल्याने पावसात आणि उन्हात प्रवाशांना उभे राहण्याचीही सोय नाही. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आरदाळचे सरपंच व ग्रामसेवक, प्रवासी संघटना यांनी आजरा आगारप्रमुख बस थांबा लवकरात लवकर दुरुस्त करून मिळावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, रामदास मोरवाडकर, शिवाजी जाधव उपस्थित होते.

थोडक्यात महत्त्वाचे…
♦ आजरा नगरपंचायतीच्या नूतन कार्यालयाकरिता शिवाजीनगर प्रशासकीय इमारती समोरील तहसील कार्यालयाची जुनी ब्रिटिश कालीन इमारत वापरण्यास मंजुरी मिळाली आहे.
♦ भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज मंगळवार दिनांक २२ रोजी कै. दाजी टोपले नाट्यगृह येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. कुलदीप देसाई व डॉ. धीरज नाईक हे स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.

आजचे पंचांग
दिनांक : २२ सप्टेंबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी तिथी (रात्री ०९.४३ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (सकाळी ०७.०६ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (सायंकाळी ०४.२८ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०८.५५ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.३२ ते सायंकाळी ०५.०३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०७ ते दुपारी १२.५५
सूर्योदय : सकाळी ०६.२८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
