mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार दि.२३ सप्टेंबर २०२६

आजरा शहर डाॅल्बीमुक्त…

बाप्पांची मिरवणूक पारंपारिक वाद्यात

आजरा : प्रतिनिधी 

जिल्हा पोलीस प्रमुख व स्थानिक पत्रकार बांधवांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजरा शहरातील सार्वजनिक गणपती मिरवणूका डाॅल्बीमुक्त करुन पारंपारिक वाद्यात करण्याचा निर्णय शहरातील सर्वच मंडळांनी जाहीर केला आहे.या निर्णयामुळे मिरवणूका डाॅल्बीमुक्त होणार आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल व स्थानिक पत्रकारांनी मिरवणूका डाॅल्बीमुक्त करण्याचे आवाहन केले होते.या अनुषंगाने आजरा शहरात देखील मिरवणूका डाॅल्बीमुक्त व्हाव्यात यासाठी आजऱ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी मंडळांचे प्रबोधन केले.याला आजरा शहरातील मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आजरा शहरातील श्री सार्वजनिग गणेश मंडळ, जय शिवराय मंडळ,भाजी मार्केट व्यापारी मंडळ,सुभाष चौक सार्वजनिक व लिंगायत गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांनी २५ रोजी होणाऱ्या मिरवणूका विना डॉल्बी व पारंपारीक वाद्यात विसर्जन करण्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे पत्र आजरा पोलिस स्टेशनला दिले आहे. मंडळांच्या या निर्णयाने सर्वत्र कौतुक होत आहे.

आजरा तालुका पत्रकार संघाचे आभार…

‘डाॅल्बी आहे तर बातमी नाही’ अशी  टॅगलाईन घेत पत्रकार संघाने यापुढे विविध मिरवणूकांमध्ये जी मंडळे डाॅल्बी व लेसरचा वापर करतील त्या मंडळाच्या बातम्या न छापण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची चर्चा या निमित्ताने झाली आहे. तर शहरवासीयांकडून पत्रकार बांधवांचे आभार मानले जात आहेत.

बेलेवाडी परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन

उत्तूर : प्रतिनिधी

बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथील भावेश्वरी मंदिर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील विठ्ठल चव्हाण हे जनावरे चारण्यासाठी मंदिर परिसरात गेले असता गवतात दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. चव्हाण यांची चाहूल लागताच बिबट्याने गुरगुरण्यास सुरुवात केली. त्यांनी तत्काळ तेथून सुरक्षित अंतर राखत गावात येऊन ही माहिती नागरिकांना दिली. गेल्या महिनाभरापासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी गणपती रामाणे यांच्या शेळ्यांचा पालवा बिबट्याने फस्त केला होता. तसेच जंगलातील विविध ठिकाणी मोर व रानडुक्कर यांची शिकार केल्याचे अवशेषही नागरिकांना आढळून आले आहेत. या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली असून परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण

आजरा : प्रतिनिधी

तहसीलदार कार्यालयाच्या जून्या इमारतीचे आज आजरा नगरपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात आले. तहसीलदार समीर माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हस्तांतरणाचे पत्र मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्याकडे दिले. जूनी इमारत वापरापूर्वी या इमारतीचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट ) करून घ्यावे. अशी सूचना तहसीलदार श्री. माने यांनी केली. तहसीलदारांच्या दालनात हस्तांतरणाची बैठक झाली.

आजरा नगरपंचायतीचा कारभार ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून चालतो. या इमारतीमधे नव्याने झालेल्या नगरपंचायतीच्या ११ विभागांसाठी पुरेशी जागा नसल्याने नागरीकांची गैरसोय होत होती. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना काम करतांना अडचण येत होती. ग्रामपंचायत इमारत शहराच्या मुख्य भागात असल्याने वहात्‌कीबरोबर वाहने पार्किंगचा प्रश्न होता. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नजीकच नगरपंचायतीचे कार्यालय स्थलांतरीत होणार असल्याने नागरीकांना एकाच ठिकाणी शासकीय कामासाठी चांगली सोय होणार आहे. याबाबत नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांन या प्रश्नात लक्ष घातल्याने इमारत उपलब्ध होण्यास मदत झाली. संबंधीत इमारत नगरपंचायतीला प्रशासकीय कामकाजासाठी वापराकरीता देण्याबाबतचे तात्पुरत्या स्वरुपात हस्तांतरीत करण्यास मान्यता मिळाली आहे.

पोलीसांच्या वापराकडील इमारत मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार झाला असून ही जागा देखील नगरपंचायतीला उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. या वेळी नगरसेवक परशुराम बामणे, अनिकेत चराटी, डॉ. स्मिता कुंभार, माजी नगरसेवक किरण कांबळे, अनिरुध्द केसरकर, समीर चांद, अरिफ खेडेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत, विजय थोरवत, जितेंद्र भोसले, रणजित सरदेसाई, काकासो देसाई, इंद्रजीत देसाई, संतोष भाटले, मंडल अधिकारी सुंदर जाधव आदी उपस्थित होते.

२०११ पूर्वीची तालुक्यातील निकषात बसणारी अतिक्रमणे नियमित करण्यास सुरुवात

आजरा : प्रतिनिधी 

राज्यातील ग्रामिण व शहरी भागातील शासकीय तसेच गायरान जमिनीवर गावोगावी अतिक्रमणे झाली आहेत. २०११ पूर्वीच्या पिवळ्या पट्ट्यातील अतिक्रमणांना शासनाने मान्यता देण्याचे धोरण हाती घेतले आहे. आजरा तालुक्यात १०५ अतिक्रमणे निदर्शनास आली असून ७५ जणांनी महसुल विभागाकडे अर्ज दिले आहेत. यापैकी २६ अतिक्रमणे शासनाच्या निकषानुसार पात्र ठरली आहे. उर्वरीत अर्जाची छाननी सुरु असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले.

बहुतांश अतिक्रमणे ही निवासासाठी झाली आहेत. या अतिक्रमणांचा विचार केला जाणार आहे. सन २०११ पूर्वीचे याबाबतचे महसुली पुरावे संबंधीताना सादर करावे लागणार आहेत. अतिक्रमण धारकांना अर्ज सादर करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी दिले आहे. ग्रामिण भागातील अर्ज ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आहेत. याबाबतची पुढील कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीकडून केली जाणार आहे. नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वन, धोकादायक क्षेत्र, भूस्खलन क्षेत्र, सीआरझेड आदी ठिकाणची अतिक्रमणे नियमीत केली जाणार नाहीत. गायरानातील अतिक्रमणांच्या बाबतीत घरकुल योजनेची परवानगी आवश्यक आहे. दीड हजार स्वेअरफ्टवरील केलेल्या अतिक्रमणांचा विचार केला जाणार नाही. पंधराशे स्वेअरफ्ट पैकी पाचशे स्वेअरफ्ट अतिक्रमावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. त्यावरील ज्याच्या क्षेत्रावर  रेडीरेकनर प्रमाणे नियमानुसार शुल्क आकारले जाणार आहे. हरीत पट्ट्यातील अतिक्रमणांचा विचार केला जाणार नाही. महसुल विभागाने तालुक्यात केलेल्या पाहणीनुसार १०५ अतिक्रमणे निदर्शनास आली आहेत. यापैकी ७५ अतिक्रमणधारकांचे अर्ज महसल विभागाकडे प्राप्त झाले असून यापैकी २६ अर्ज पात्र झाले आहेत.

आजरा महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन

आजरा : प्रतिनिधी

आजरा महाविद्यालय (कनिष्ठ विभाग) यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथ आण्णा चराटी व संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी कै. माधवरावजी तथा भाऊ देशपांडे यांच्या स्मृती पंधरवड्यानिमित्त आजरा तालुक्यातील माध्यमिक शाळांसाठी तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आजरा महाविद्यालय परिसरात होणार आहे.

या स्पर्धेत आजरा तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून नाव नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. सहभागी शाळांनी महाविद्यालयाशी संपर्क साधून आपल्या विद्यार्थ्यांची नावे २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदविणे आवश्यक आहे.

आजचे पंचांग

दिनांक : २३ सप्टेंबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (रात्री १०.५० पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (सकाळी ०९.०८ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : सुकर्मा योग (सायंकाळी ०४.२६ पर्यंत) त्यानंतर धृति योग
करण : भाव करण (सकाळी १०.२१ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मकर राशी (रात्री ०९.५६ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३१ ते दुपारी ०२.०१ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.२९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

छाया वृत्त

ह.भ.प.मोरजकर महाराज सप्ताहास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मोरजकर महाराजांच्या पोथीचे विठ्ठल मंदिरात प्रयाण  झाले. शिवाजीनगर घाट परिसरातील समाधी स्थळी  जाऊन भक्तांनी त्यांना सप्ताहाचे आमंत्रण दिले. सोमवार दिनांक २८ रोजी जागर मंगळवार दिनांक २९ रोजी दिंडी व बुधवारी दुपारी बारा ते चार या कालावधीत महाप्रसाद होणार आहे.

रायवाडा तालुका आजरा येथे हत्तीने धुमाकूळ घालत अमृत राणे, राजू राणे, अरुण राणे, गणपत लाड,विश्वनाथ पाटील, वसंत दोरुगडे बाळू दोरुगडे, महादेव जाधव, अमृत कुरळे आदींच्या भात पिकांचे मोठे नुकसान केले आहे.


शिवसेना प्रणित जय शिवराय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ह.भ.प. जयश्री ताई तिकांडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरवासीयांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

संबंधित पोस्ट

कोरीवडे सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र… आजऱ्यात ना. सतेज पाटील समर्थकांचा जल्‍लोष यासह आजरा स्थानिक बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शनिवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!