
सोमवार दि.२१ सप्टेंबर २०२६

‘मृत्युंजय महान्यूज’ ची बातमी अन्
गाडी भरून औषधे…

उत्तुर : प्रतिनिधी
उत्तर प्राथमिक आरोग्य केंद्राला वारंवार मागणी करून आवश्यक प्रमाणाच्या अवघ्या ५०% पेक्षाही कमी औषध पुरवठा होत असल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्या बाबतचे सविस्तर वृत्त ‘मृत्युंजय महान्यूज’ने दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मुबलक प्रमाणात तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत अर्दाळ, बहिरेवाडी, बेलेवाडी, चिमणे, वडकशीवाले , होन्याळी ही सहा उपकेंद्र कार्यरत आहे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रालाच पुरेसा साठा मिळत नसल्याने उपकेंद्रामध्येही औषधे उपलब्ध नाहीत अशी अवस्था निर्माण झाली होती. औषधे नाहीत, टेस्टिंग स्ट्रिप्स नाहीत अशी अवस्था तयार झाल्याने रुग्णांचे हाल होत होते.

वाटंगी सन्मित्र पतसंस्थेला २७ लाख ५९ हजारांचा नफा :अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा यांची माहिती…

आजरा : प्रतिनिधी
वाटंगी तालुका आजरा येथील सन्मित्र सह. पतसंस्थेला गत आर्थिक वर्षात २७ लाख ५९ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून पंधरा टक्के प्रमाणे सभासदांना डिव्हिडंट देत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा यांनी ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.
सभासद व ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर संस्थेची प्रगती सुरू असून असाच विश्वास कायम ठेवावा असे आवाहन डिसोजा यांनी केले.
परशराम गिलबिले यांनी उपस्थित त्यांचे स्वागत करून आरती पत्रकांचे वाचन केले. यावेळी सभेस आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल फडके, एम. के. देसाई, राजू मुरकुटे, रुपेश भोगले, मोतीराम बारदेसकर विश्वास कांबळे, विजय पोवार, उपाध्यक्ष भीमराव सुतार,दत्तात्रय डोंगरे, बाबुराव गिलबिले, मार्शल मीनिंजीस, केरोलीन नॉरेंज, संभाजी पाटील, पांडुरंग माने, बाबू चौगुले,केरोलीन डिसोजा, व्हायलेट डिसोजा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात अण्णा-भाऊ स्मृती पंधरवडा सुरू

आजरा : प्रतिनिधी
जनता एज्युकेशन सोसायटीच्या आजरा महाविद्यालयात दि. १८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान अण्णा-भाऊ स्मृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी कै. माधवराव देशपांडे आणि संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथअण्णा चराटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पंधरवडा आयोजित केला आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व कौशल्याधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पंधरवड्याची सुरुवात कै. माधवराव देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजनाने झाली. यामध्ये भित्तिपत्रिका, क्विझ, हिंदी मुहावरे लेखन, शुद्धलेखन, शेरोशायरी, शब्दकोश, लघुकथा कथन, गटचर्चा, वैज्ञानिक प्रयोग प्रात्यक्षिक यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
तसेच जागतिक बांबू दिनानिमित्त उपक्रम, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित केली आहेत. दि. ३ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, स्वच्छता मोहीम, पाककला स्पर्धा आणि कै. काशिनाथ चराटी स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धा होणार असून ५ ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरणाने पंधरवड्याची सांगता होणार आहे.
या पंधरवड्याचे संयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, डॉ. अविनाश वर्धन व डॉ. आनंद बल्लाळ करीत आहेत.

निधन वार्ता
सिंधू गाईंगडे

रवळनाथ कॉलनी येथील श्रीमती सिंधू मारुती गाईंगडे ( वय ८० वर्षे ) यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश गाईंगडे यांच्या त्या आई होत.

छायावृत्त ….

आजरा तालुक्यात आता भात पिक पोसावू लागले असून पावसाची गरज प्राधान्याने भासू लागली आहे. पावसाने ओढ दिल्यास पिके करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्पेवाडी मॅरेथॉनमध्ये प्रणय कसबेकर प्रथम…
बालकांपासून ज्येष्ठांपर्यंतचा उत्स्फूर्त सहभाग

उत्तूर : प्रतिनिधी
गणेश चतुर्थीचे औचित्य साधून कर्पेवाडी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालकांपासून सुमारे ९० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ महिला-पुरुषांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला सर्व वयोगटांचा रंग चढला.
खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रणय कसबेकर यांनी प्रथम, प्रणव मांडे यांनी द्वितीय, तर विराज कडगावकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब रामहरी सरवदे व उत्तूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कांबळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कर्पेवाडी स्पोर्ट्स अकॅडमीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आजचे पंचांग
दिनांक : २१ सप्टेंबर २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : दशमी तिथी (रात्री ०८.०० पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (२२ सप्टेंबर सकाळी ०७.०६ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : शोभन योग (सायंकाळी ०४.०५ पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : तैतुला करण (सकाळी ०६.५८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : धनु राशी (सकाळी ११.१४ पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५९ ते सकाळी ०९.३० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०७ ते दुपारी १२.५६
सूर्योदय : सकाळी ०६.२८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: २९४८ शक संवत

आजपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा धमाका… तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
आजरा : प्रतिनिधी
आजपासून सार्वजनिक गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असून तालुक्यातील सार्वजनिक मंडळांनी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचा धमाका उडवला आहे. तालुक्यातील प्रमुख मंडळांचे देखावे, विविध स्पर्धा,स्पर्धा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुणाईसाठी कराओके गायन स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, स्पर्धा, रक्तदान शिबिर,किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असणारा पैठणीचा खेळ – होम मिनिस्टर, झिम्मा फुगडी स्पर्धा हे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरत आहेत. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठीही वक्तृत्व, नृत्य, फनी गेम्स, रांगोळी स्पर्धांचे आयोजित करण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी भजन, मान्यवरांच्या उपस्थितीत आरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश दर्शन…
अवधूत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ इंदिरानगर ,उत्तूर

अध्यक्ष : कु. सौरभ यल्लपा हारळे
उपाध्यक्ष : श्री. ऋषिकेश कुंभोजकर
सचिव : श्री. सुरेश तिबिले
खजिनदार : कु. देवदत्त काळगे
कार्यध्यक्ष : श्री. दत्तात्रय केसरकर.
