mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार 

८ जुलै २०२६

अनुदानाच्या नावाखाली पशुपालकांना गंडा 

आजरा तालुक्यातील प्रकार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

शासनाकडून कृषी अनुदान मिळवून दिले जात आहे असे सांगून तरुणींना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बुकिंगपोटी हजारो रुपये वसूल केले जात असल्याच्या घटना उघडकीस येत असून तालुक्यातील चितळे, जेऊर ,भावेवाडी या गावांमध्ये सदर प्रकार घडल्याचे स्पष्ट होत आहे कृषी विभागाने मात्र असे कोणतेही अनुदान नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

गेले दोन दिवस बाहेर गावच्या कार्पोरेट पोशाखातील महाविद्यालयीन तरुणी ग्रामीण भागात जाऊन शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विविध योजना सुरू आहेत असे सांगून सुमारे चार लाखापर्यंतचे अनुदान दिले जात असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. यासाठी हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या रकमा ऍडव्हान्स बुकिंग पोटी उचलण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधला असता अशा कोणत्याही योजना शासनाकडून दिल्या जात नसून ही निव्वळ फसवणूक आहे असे सांगितले जात आहे. विशेषता पशुपालकांना अशा योजनेचे आम्हीच दाखवले जात असल्याचे पुढे येत आहे.

पशुसंवर्धन विभागाचे नाव…

वसूल रकमापोटी दिल्या जाणाऱ्या पावत्यांवर पशुसंवर्धन इंडिया लिमिटेड /पशुसंवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर असे लिहिण्यात आले आहे. पावत्यांवर कोठेही शिक्का नाही परंतु वसुली करणाऱ्यांच्या सह्या दिसत आहेत.

पन्नासवर घरांची पडझड…
सलग चौथ्या दिवशीही आजऱ्यात मुसळधार… धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यासह संपूर्ण परिसरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे हिरण्यकेशी व चित्री नद्यांचे पाणी पात्रा बाहेर आले असून असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरांची पडझड आणि वीजवाहिन्यांचे नुकसान अशा घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यात आतापर्यंत ५० हून अधिक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
पावसामुळे शेतीला मोठा दिलासा मिळाला असला तरी काही भागांत शेतांमध्ये पाणी साचल्याने भातलावणी व अन्य शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वारंवार होणाऱ्या वीज खंडितचा परिणाम ग्रामीण पाणीपुरवठ्यावरही झाला असून अनेक गावांचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी सोहळे मार्गे वळविण्यात आली आहे.
धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. चित्री मध्यम प्रकल्प क्षेत्रात मंगळवारी काल दुपारी चार वाजेपर्यंतच्या ८ तासांत ७० मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ९१० मिमी झाले आहे. प्रकल्पात सध्या ४१.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. आंबेओहोळ मध्यम प्रकल्प क्षेत्रात १०५ मिमी पाऊस झाला असून प्रकल्प ७०.५८ टक्के भरला आहे. उचंगी लघु पाटबंधारे तलाव १७ टक्के, एरंडोल तलाव ८७ टक्के तर खानापूर तलाव ३२ टक्के भरला आहे. सर्फनाला प्रकल्प क्षेत्रात आठ तासात १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.७५.५९ टक्के इतका प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.
तालुक्यातील विविध प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असून हिरण्यकेशी व चित्री नद्यांच्या पाणीपातळीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दृष्टीक्षेपात नुकसान…

✓ अलका सिताराम पाटील रा. दाभिल यांच्या घराचे पत्रे उडून २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ खानापूर येथील संभाजी जाधव यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ बहिरेवाडी येथील कृष्णा पाटील यांच्या गोठ्याची भिंत कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ चाफवडे येथील दत्तात्रय गुरव यांच्या घराची भिंत पडून वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ शिरसंगी येथील आनंदा कुंभार यांच्या घराची भिंत कोसळून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ कोवाडे येथील बबन मेणे यांच्या घराची पडझड होऊन तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ गजरगाव येथील बाबुराव पाटील यांच्या राहत्या घराची पडझड होऊन २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ आजरा येथील गीता नंदकुमार कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून ५६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ मसोली येथील राजू तुकाराम पवार यांच्या घराची पडझड होऊन तीस हजार रुपयांचे तर श्रीरंग सुतार यांच्या घराची पडझड झाल्याने तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ दाभिल येथील अलका सिताराम पाटील यांच्या घराचे पत्रे उडून २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ खानापूर येथील संभाजी जाधव यांच्या राहत्या घराचे पत्र उडून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ लाकूडवाडी येथील प्राथमिक विद्यामंदिराचे संरक्षण भिंत पडून २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ पेरणोली येथील औदुंबर हवालदार यांच्या घराची भिंत कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

✓ चव्हाणवाडी येथील सुनील चोरगे, अळूबाई चोरगे, बापू चोरगे यांच्या घराची भिंत कोसळली आहे.

अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

वाटंगी येथील मारुतीराव डोंगरे यांचे निधन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी ता. आजारा येथील दानशूर व्यक्ती मारुतीराव रवळू डोंगरे ( मामा ) यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८८ वर्षे होते.

विठ्ठल रखुमाई मंदिर, महादेव मंदिर, नागोबा मंदिर, रवळनाथ मंदिर उभारणीत त्यांचा मोठा आर्थिक हातभार आहे. गावातील विविध सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार मुंबई येथे करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी द्या… पालकांचे तहसीलदारांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मागील पाच सहा दिवसापासून आजऱ्यात मुसळधार आणि संततधार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही सुरु असून झाडांची व घरांची पडझड सुरूच आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेसाठी प्रवास करावा लागतो. आणि हा प्रवास धोकादायक असल्याने अतिवृष्टीकाळात शाळांना सुट्ट्या द्याव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांनी आजरा तहसीलदार समीर माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आठवडाभर सातत्याने मुसळधार व संततधार पाऊस पडत असून तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या अतिवृष्टी झाल्याचे समजले जाते. पण सध्या आजऱ्याचा विशेषतः पश्चिम पट्ट्यांमध्ये जवळपास २०० मि.मी. पाऊस पडत असून नदी, ओढे तसेच नाल्यांना प्रचंड पूर आलेला आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली असून काही ठिकाणी दळणवळणाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळेसाठी परगावी किंवा आजऱ्यामध्ये येत असतात. अतिवृष्टीच्या या परिस्थितीमध्ये दळणवळण खंडित झाले असून वीत पुरवठाही पूर्णपणे खंडीत आहे. या संपर्क करणे अडचणीचे ठरत आहे.सुरक्षिततेच्या कारणास्तव सुट्टी द्यावी अशी मागणी पालकांनी निवेदनाद्वारे आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांच्याकडे करण्यात आली.

निवेदनावर सारिका कुकडे, रेश्मा वंजारे, सरिता इलगे, सानिका जाधव, तेजस्विनी देसाई, श्वेता सरदेसाई, विद्या निर्मळे, स्वप्नाली राणे, सारिका खांडेकर, रणजितकुमार सरदेसाई, धनाजी पोवार, विष्णू कुंभार, डॉ. धनाजी राणे आदींच्या सह्या आहेत.

मडिलगे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची बैठक.


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव ‘ या
आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सदर अभियान राबविण्यात येणार आहे. मडिलगे तालुका आजरा येथील आरोग्य उपकेंद्रात या अभियानातील कमिटीची दि. ७ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊंगरे होते. स्वागत विद्या भोसले यांनी केले.

प्रस्ताविक डॉ. अमोल चव्हाण यांनी केले यावेळी माहे जुलै मध्ये महिलांसाठी तज्ञांचे आरोग्य शिबिर आयोजित करणे,
लिंग आधारित हिंसाचार टाळण्यासाठी सामूहिक बैठक, कीटकजन्य आजार बाबत नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजना जनजागृती, जलजन्य आजार जनजागृती ,घरातील कचऱ्याचे वर्गीकरण जनजागृती ,जागतिक लोकसंख्या दिन निमित्त लोकसंख्या नियंत्रण समुपदेशन शिबिर अशा विविध विषयावरती चर्चा करून सदर अभियानात भाग घेऊन नाविन्यपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवण्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आले.

यावेळी बैठकीला गोविलकर, श्रीमती संगीता पाटील, सौ. वैशाली येसणे आशा स्वयंसेविका, शिक्षक प्रतिनिधी डॉ सामंत , स्थानिक पत्रकार संभाजी जाधव, महिला प्रतिनिधी सुप्रिया कातकर, मीनाक्षी कांबळे, सह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

आभार सौ गोविलकर यांनी मानले.

वन महोत्सवानिमित्त आदर्श हायस्कूल गवसे येथे व्याख्यान

गवसे : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वन महोत्सवानिमित्त दि. १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे येथे सामाजिक वनीकरण, चंदगड विभागाचे वनक्षेत्रपाल श्री. दत्तात्रय पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत सहज, साध्या व सोप्या भाषेत संवाद साधत विविध प्रेरणादायी कथा सांगितल्या. कष्ट, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जीवनातील ध्येय कसे साध्य करता येते, याचे मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज आणि निसर्गाशी जुळवून घेण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विशेष म्हणजे श्री. दत्तात्रय पाटील हे याच शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी विशेष प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल श्रीमती माणिक खोत यांची होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरणाचे महत्त्व, वृक्षलागवड व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. घुणे, श्रीमती एस. पी. ढेकळे, श्री. भालेकर सर, श्रीमती अंजना कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी श्री. संदीप वाटवे व विवियन मस्कारेन उपस्थित होते.

आजचे पंचांग

दिनांक : ८ जुलै २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (दुपारी १२.२१ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (दुपारी ०३.५९ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (दुपारी १२.३७ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : कौलव करण (दुपारी १२.२१ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मीन राशी (दुपारी ०३.५९ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४४ ते दुपारी ०२.२२ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता
सौ. लीलाबाई कांबळे

भादवण तालुका आजरा येथील सौ. लीलाबाई रामचंद्र कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील युवा कार्यकर्ते रुपेश व शैलेश कांबळे यांच्या त्या आई होत.

इंदुबाई कुंभार

वाटंगी गावच्या रहिवाशी श्रीमती इंदुबाई विष्णू कुंभार (वय ७० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात श्री जयसिंग व श्री पांडुरंग विष्णू कुंभार ही दोन मुले व दोन मुली सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाटंगी येथे आमदार खासदारांना रोखले…

mrityunjay mahanews

वझरे येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!